Rural Water Crisis: ग्रामीण भागातील पाणी शुद्ध आहे का?

Water Pollution: दूषित पाण्यामुळे ‘जीबीएस’ अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम सारख्या दुर्मीळ आजाराची लागण होत आहे. पुण्यालगतच्या गावांत पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. अशावेळी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची अवस्था काय आहे, याचा घेतलेला हा आढावा...
Water Stock
Water StockAgrowon
Published on
Updated on

मयूर बागूल

Health Risks: भूजल ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून राज्यातील भूजलाची उपलब्धता मर्यादित आहे. शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणांसाठी भूजलाचा वारेमाप व बेसुमार वापर होत असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही वाढलेली भूजल पातळी फार काळ राहत नाही. राज्याच्या कृषी-अर्थ व्यवस्थेचा भूजल हा कणा आहे.

परंतु राज्यातील भूजल उपलब्धतेचा आढावा घेतला असता, अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्राची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. माझ्या जमिनीखालील पाण्यावर माझीच मालकी या विचाराने पर्यावरणविषयक बाबींचा फारसा विचार न करता भूजलाचा उपसा करण्याची मानसिकता त्याला जबाबदार आहे. नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील सिंचन विहिरींच्या अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ वाहण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे.

त्याचा पर्यावरण व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही विपरीत परिणाम झाला आहे. दरवर्षी पावसाद्वारे निर्माण होणाऱ्या भूजल उपलब्धतेचा विचार न करता निव्वळ अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या स्पर्धेमुळे अतिखोल विंधण विहिरी मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असून, त्याचा भूजल पातळीवर विपरीत परिणाम होत आहे.

Water Stock
Water Conservation : जलस्रोतांचे करा संरक्षण

अशा परिस्थितीत चांगला पाऊस होऊनही भूजल भरणा म्हणजेच पुनर्भरण पुरेसे होत नसल्याने पाणी टंचाईसारख्या संकटाला आपल्याला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे अति रासायनिक खताचा वापर शेतात केला जात असल्याने रसायन हे भूगर्भात जात असते आणि अखेर ते भूगर्भातील पाण्यात मिसळते.

नायट्रेटचे वाढते प्रमाण

आज ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी मुबलक नसल्याने अनेक जण भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत. भूगर्भातील पाणी किती शुद्ध हे पाणी परीक्षणावरून लक्षात येईल. केंदीय भूजल विभागाने ‘केंद्रीय भूजल गुणवत्ता अहवाल - २०२४’ हा नुकताच सादर केला. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक वास्तव पुढे आले.

महाराष्ट्रातील वर्धा, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या सात जिल्ह्यांतील भूजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचे धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झाले आहे. या सातही जिल्ह्यांत भूजलात नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण धोकादायक पात्रतेपेक्षा अधिक प्रमाणात आढळले असून ते आरोग्यासाठी अतिघातक आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानक ब्यूरो यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५ मिलिग्रॅम प्रतिलिटर निश्‍चित केली आहे. मात्र देशातील ४४० जिल्ह्यांमध्ये पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळले आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल - २०२४ मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार अभ्यासलेल्या नमुन्यांपैकी २० टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले.

केंद्रीय भूजल विभागाने देशातील १५ हजार २५९ ठिकाणी परीक्षण केले असून या परीक्षणामध्ये २५ टक्के विहिरींचा (बीआयएस १०५०० नुसार सर्वाधिक धोकादायक) सविस्तर अभ्यास करण्यात आला. पुनर्भरणामुळे गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाची माहिती घेण्यासाठी मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून नंतर ४१८२ ठिकाणचे भूजलाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. भारतातील भूजलामधील नायट्रेट प्रदूषणाच्या स्थितीचा अंदाज अमेरिकन केमिकल सोसायटीच्या अहवालातही वर्तवला आहे.

Water Stock
Water Conservation : यशस्वी जलसंधारणासाठी ‘मनसंधारण’

या अंदाजानुसार भारताच्या ३७ टक्के भूभाग आणि ६८ कोटी लोक नायट्रेटच्या धोक्याच्या कक्षेत आहेत. महाराष्ट्रात ३५.७४ टक्के भूगर्भातील पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. भूगर्भात नायट्रेट कुठून येते तर ते सांडपाण्याचे गैरव्यवस्थापन, वॉटर ट्रिटमेंट प्लांटची योग्य देखभाल न करणे, रासायनिक खतांचा अतिवापर अशा विविध स्रोतांतून नायट्रेटचे प्रमाण हे भूगर्भात पाण्यात मिसळते.

विविध आराजांना आमंत्रण

भूजलात नायट्रेटची वाढती पातळी अत्याधिक सिंचनाच्या परिणाम असू शकतो. खतांमधील नायट्रेट जमिनीवर खोलवर जाऊन ते पाण्यात मिसळले जाते. पाण्यात नायट्रेट मिसळल्यामुळे नेमकी धोकादायक परिस्थिती म्हणजे नायट्रेट पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते. ते तोंड आणि आतड्यांमध्ये असलेल्या जिवाणू मार्फत ऑक्सिडायझर असलेला नायट्रेटमध्ये रूपांतर होते. पुढे नायट्रेटचे रूपांतर नायट्राइटमध्ये होते.

नायट्राइटची प्रक्रिया रक्तातील हिमोग्लोबिनसोबत होऊन मिथिमोग्लोबीन तयार होते. अशा परिस्थितीमध्ये रक्त आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता गमावते. यामुळे विविध आजार होतात. पोटाचा कर्करोग, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिड्रेम, जन्मदोष, जन्मजात व्यंग, न्यूरल ट्यूब दोष असे आजार सध्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये दिसतात. आता तर दूषित पाण्यामुळे जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम) सारखा दुर्मीळ आजार पसरत आहे. पिण्यायोग्य शुद्ध पाणी नसल्याने अतिगंभीर आजारांना आपण आमंत्रित करीत आहोत. ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याचे परीक्षण केल्यास अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील.

भूजलातील पाणी शुद्ध ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील बाटली बंद पाणी पिणे बंद करणे, शेतीमध्ये कमी रसायनाचा वापर करून पीक नियोजन करणे, दरवर्षी विहीर व बोअरवेल मधील पाणी परीक्षण करणे, ग्रामीण भागातील वाहून जाणारे घरातील पाणी ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून एसटीपी प्रकल्प उभे करणे गरजेचे आहे.

पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे गरम उकळून पिणे, आपण ‘जुनं ते सोनं’ असे म्हणतो, त्यामुळे मातीच्या रांजणामध्ये पाणी ठेवून पिणे गरजेचे आहे. भूजलाचा कमीत कमी वापर करून पाणी अडवून पाणी भूजलात पुनर्भरण करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वारेमाप पाणी उपसा करून बाटली बंद व्यवसाय अनधिकृतपणे केला जात आहे.

हे पाणी शुद्ध म्हणून लोक विश्वासने घेत असतात पण हे पाणी देखील पिण्यायोग्य नाही. त्यासाठी गावातील पारंपरिक पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे. सरकार काही करेल, या आशेवर जनतेने राहून चालणार नाही. आपले आरोग्य ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याने आपल्या गावातील आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असल्यास सर्वांनी मिळून काम केले तर निश्‍चित त्यांचा फायदा होईल. आणि जीबीएस सारखे आजार गावात पसरणार नाहीत.

(लेखक सहज जलबोध अभियानचे राज्य समन्वयक आहेत.)

- ९०९६२१०६६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com