Water Conservation : जलस्रोतांचे करा संरक्षण

Water Resources Management : ज्या कालावधीमध्ये गावामध्ये पूर्वजांनी तलाव बांधण्यासाठी जागा दिलेली आहे आणि त्या जागेचे कुठलेही दस्तऐवज त्या वेळी केलेले नाहीत, अशा तलावांवर अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे.
Water Consetvation
Water Resources Agrowon
Published on
Updated on

Protection Of Water Resources : ज्या स्रोतातून आपल्याला पाणी उपलब्ध होते, त्याला आपण जलस्रोत म्हणतो. नदी, ओढा, नाला, झरा, विहीर, तलाव, बारव, कोंडी, डोह, धरण इत्यादी जलस्रोतांचे ढोबळमानाने प्रकार आहेत. जलस्रोत एक तर नैसर्गिक असतात किंवा मानव निर्मित. नदी, ओढा, नाला, झरा, डोह, काही तलावांचे प्रकार हे निसर्ग निर्मित आहेत तर बाकीचे मानव निर्मित आहेत.

तलाव बांधणे जेवढे महत्त्वाचे आणि दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत, ज्यामुळे कठीण काळामध्ये भूजल पातळी वाढते. पिण्यासाठी जनावरांसाठी आणि इतर वापरांसाठी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे या तलावाचे संरक्षण करणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

जुन्या तलावांचे संवर्धन

तलावाच्या निर्मितीचा कालखंड खूप जुना आहे अगदी शेकडो, हजारो वर्षे जुना आहे. आपल्या पूर्वजांनी तलाव बांधण्याची आणि ती राखण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केलेली होती. ज्यामुळे हजारो वर्षांपूर्वी बांधलेले तलाव काही ठिकाणी आजही सुस्थितीत आणि उपयुक्त आहेत.

‘आज भी खरे हे तालाब’ या अनुपम मिश्र यांच्या पुस्तकांमध्ये तलावांबाबत अत्यंत मार्मिक दूरगामी वर्णन केले आहे. देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लाखो तलाव बांधण्यात आले होते. त्यांचे रक्षण करण्यात येत असे. हेच तलाव सर्वांसाठी कठीण कालावधीमध्ये पाण्याचे स्रोत होते.

Water Consetvation
Water Conservation : जलक्षेत्रात फेरोक्रिट तंत्रज्ञानाचा व्यापक वापर

मध्य प्रदेश, राजस्थान, बुंदेलखंड, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात तलावांची बांधणी होत असे. त्याचा योग्य वापर समाजामार्फत होत असे. राजस्थान मधील जैसलमेरमध्ये गोड्या पाण्याचे तलाव, विहिरी या आजही उदाहरणादाखल आहेत. त्या काळी राजस्थानमार्गे विदेशातील व्यापार होत असे, त्या वेळी पशुधनांचा वापर मालवाहतुकीसाठी करत असल्याचे ऐतिहासिक दस्तऐवज सांगतात.

हजारो शेकडो उंट, बैल, घोडे, गाढव इत्यादी या सर्वांना पशुधन आणि व्यापाऱ्यांना लागणारे पाणी या जलस्रोतांमध्ये उपलब्ध होते. तत्कालीन विदेशाच्या व्यापारात त्याचा खूप महत्त्वाचा वाटा होता. तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे होणारा व्यापार देखील याच पद्धतीने होत असे.

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नगरात, प्रत्येक गावात असे अनेक तलाव होते. मुंबई तसेच ठाणे शहरांमध्ये देखील शेकडो तलाव अस्तित्वात होते. महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळग्रस्त विभाग म्हणून ओळखला जातो. तथापि मराठवाड्यातील पाण्याची समस्या या तलाव, विहिरी आणि बारव यांच्या माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचे स्पष्ट होते.

सातारा जिल्ह्यातील निंब येथील विहीर अथवा सेलू येथील बारव, या आजही आपल्या इतिहासाची साक्ष देतात. अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कालखंडाच्या राज्यव्यवस्थेच्या प्रमुख असताना तलाव, घाट आणि कुंडांची निर्मिती केली. त्यांच्या कालावधीमध्ये उभारण्यात आलेले घाट आजही दिमाखात उभे आहेत.

नांदेड जिल्ह्यातील काही जाणकारांनी सांगितले, की या जिल्ह्यात जवळपास प्रत्येक नगरात आणि गावात तलावांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली होती. देगलूर शहरांमध्ये किमान सात ते आठ गोड्या पाण्याचे तलाव अस्तित्वात होते.

हे सर्व तलाव बांधण्याच्या पद्धतीमध्ये एक सुसूत्रता होती. इच्छा शक्ती,अनुभव, नदी, प्रवाह आणि समाजाच्या गरजा या सर्व समजणारा शासक आणि समाज तलावांची निर्मिती करत असे.

नांदेड जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या येरगी ग्रामपंचायतीच्या जलस्रोतांच्या कॉफी टेबल बुकमध्ये सुमारे आठशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांचा लेखाजोखा मांडला आहे. होट्टल या गावी हेमाडपंती मंदिर आहे.

मराठवाड्यात आजही अनेक हेमाडपंती मंदिरे आढळतात. येरगी गावात आजही चालुक्यकालीन सुमारे आठ बारवा अस्तित्वात आहेत. गावच्या सरपंचांनी लोकज्ञान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

तलावांची गंभीर परिस्थिती

देशभरातील तलावांची आजची स्थिती दयनीय झाली आहे. एकेकाळी हे तलाव त्या गावाच्या, नगराच्या पाण्याची गरज भागवत असत. आज तेच तलाव अतिक्रमण झाल्याने, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अगदी जेजुरी नगरी देखील याला अपवाद नाही.

मालगुजारी तलाव

मराठवाडा, पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील विशेषतः नांदेड, चंद्रपूर, भंडारा हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यात मालगुजारी तलावांची निर्मिती शेकडो वर्षांपूर्वी झाली. राज्यात सर्वाधिक मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी या तलावांची निर्मिती करण्यात आली होती. स्वातंत्र्योत्तर काळात या तलावांकडे दुर्लक्ष झाले. त्यावर अतिक्रमण आणि मानवी वस्त्या वाढल्या. त्यामुळे या तलाव संपले, शिल्लक राहिले त्यांची सिंचनक्षमता घटली. देखभालीचा खर्च वाढला.

सध्या प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत एकूण ५,९५७ माजी मालगुजारी तलाव आहेत. हे तलाव नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद या गोदावरी खोऱ्यातील तालुक्यामध्ये अस्तित्वात होते. आज बहुतांशी तलावांवर अतिक्रमण होऊन त्या ठिकाणी वस्त्या झाल्याचे चित्र दिसते. आकारमानाने मोठे असलेले मालगुजारी तलाव तांत्रिकतेचा उत्कृष्ट नमुना म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तलाव बांधताना कारागिरांची कल्पकता आणि त्याची उपयोगिता लक्षात येते.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झाली. विशेषतः १९७२ च्या दुष्काळाच्या नंतर राज्याने धोरणात्मक निर्णय घेऊन प्रत्येक गावागावात तलाव बांधण्यासाठी आवाहन केले. त्या जनतेने त्याला सहकार्य करून जेथे शक्य आहे अशा सर्व ठिकाणी छोट्या मध्यम आणि मोठ्या तलावांची लोकसहभागाने निर्मिती केली.

याला तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डाने देखील सहकार्य केले होते. लोकांनी आपली जागा यासाठी दान केली. असे शेकडो तलाव निर्माण झाले. नुकत्याच झालेल्या केंद्रशासनाच्या जलस्रोतांच्या गणना अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये सुमारे सुमारे एक लाख सात हजार तलाव अस्तित्वात आहेत.

Water Consetvation
Water Conservation : यशस्वी जलसंधारणासाठी ‘मनसंधारण’

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियान

महाराष्ट्र शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे अभियान कायमस्वरूपी सुरू केले आहे. याला प्रतिसाद आहे आणि फलश्रुती देखील चांगली आहे. तथापि जुन्या तलावाच्या रक्षण आणि संरक्षणासाठी राज्याला निश्‍चित अशी नीती हवी आहे. तेलंगणा राज्याच्या ‘मिशन काकतीय’च्या धर्तीवर राज्यात देखील विशेष अभियान राबविले आवश्यक ठरते.

स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीसाठी निश्‍चित संहिता

ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या वेळेस कुठलेही जलस्रोत उभारण्यात येतात, त्या वेळी जलस्रोताची नोंद, स्थान त्याचे अक्षांश, रेखांश त्यांची लांबी, रुंदी, खोली, झालेला खर्च, साठविण्यात येणारे पाणी इत्यादी सर्व तपशील असलेल्या नोंदी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या नोंदवहीमध्ये नोंदवून घेणे कायद्याने बंधनकारक आहेत.

गाव नमुना १४

महसूल विभागाचा ग्रामपंचायत स्तरावरचा शासकीय कर्मचारी म्हणजेच तलाठी यांनी प्रत्येक गाव नमुना १४ नुसार नागरिक आणि जनावरांना पाणीपुरवठा करणाऱ्या साधनांची आणि शेतीसाठी जलसिंचन संबंधित आकडेवारीची नोंद आहे. ही आकडेवारी दरवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या शेवटी घेऊन त्याचा वार्षिक गोषवारा तहसीलदार यांना मे महिन्यांच्या शेवटी सादर करावा लागतो. तथापि, यांचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून येते. काही चांगल्या गोष्टी यासाठी अपवाद आहेत. परंतु बहुतांशी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या बाबी पाळल्या जात नाहीत, हा दैवदुर्विलास आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्याची बिकट स्थिती

कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाल्याचे दिसते. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती खरे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये जलसंधारणाच्या कृतीमधील एक महत्त्वाचे पाऊल होते. त्याच धर्तीवर राज्यभरामध्ये तलाव उभारण्यात आले. आज या तलावांची स्थिती चिंता करण्याजोगी आहे. ‘चला जाणू या नदीला’ या अभियानाच्या माध्यमातून नदीप्रहरींनी आपल्या कार्यक्षेत्रातील नद्या आणि प्रवाहांच्या क्षेत्राचा अभ्यास केला असता जवळपास शतप्रतिशत कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची उपयुक्तता शिल्लक राहिली नाही असे लक्षात येते.

दुर्लक्षाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये त्यांच्या स्थानाची निवड, सांडव्यांची स्थिती, पावसाळा असताना त्याची झाकणे काढणे आणि पावसाळा संपल्यानंतर झाकणे लावणे, हा साधा आणि सोपा कार्यक्रम या माध्यमातून दिलेला होता. पण ना ग्रामपंचायतीने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली ना त्यांच्या वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या प्रशासनाने त्याची दखल घेतली. परिणामी, ऐन पावसाळ्यामध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे झाकणे किंवा दरवाजे न काढल्याने त्याच्या बाजूची जमीन ही नदी किंवा त्या नाल्याने कोरल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. हे बंधारे गाळाने भरले आहेत.

डॉ. सुमंत पांडे, ९७६४००६६८३

(माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com