Water Conservation : यशस्वी जलसंधारणासाठी ‘मनसंधारण’

Mansandharan : एक दोघांच्या पातळीवर काम करून पाण्याच्या संदर्भातील समस्या संपणाऱ्या नाहीत. त्यामुळे ग्रामपातळीवर असो की शहर, लोकांनी एकत्रितरीत्या काम करण्याशिवाय मार्ग निघणार नाही. लोकांना एकत्र आणण्यासाठी खऱ्या अर्थाने मनांच्या संधारणाचे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे. हे ओळखून पाणी फाऊंडेशन अनेक उपक्रम राबवले.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Water Management : गेल्या फेब्रुवारीत पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात माझ्यासह अनेकांचे डोळे किमान तीन- चार वेळा तरी भरून आले. हे गहिवरून येणे आनंदाचे होते. खरेतर हा कार्यक्रम शेतकरी गटांनी साध्य केलेल्या उत्पादकतेच्या गौरवासाठी होता. उत्साहाने सळसळणारे हजारो शेतकरी, शेती आणि पाणी विषयावर प्रेम करणारे लोकाच्या डोळ्यातून पाणी येण्यास कारणीभूत ठरले होते,

ते गटागटातील लोकांचे झालेले ‘मनसंधारण’! मुळात लोक एकत्र येणे, तेही चांगल्या कामासाठी हे फारच आव्हानात्मक असते. हे आव्हान पेलल्यानंतर गटांतर्गंत वाढलेले परस्पर सामंजस्य, प्रेम, एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याची भावना आणि त्यातून मिळालेली विविध प्रकारची समृद्धी हे पाहणे संस्मरणीय होते.

लोक सहभागातून जलसंधारण यासाठी गेली काही दशके वेगवेगळ्या स्थानिक ते राज्यव्यापी चळवळी सुरू आहेत. त्यात पानी फाउंडेशन, आर्ट ऑफ लिविंग, नाम फाउंडेशन, खान्देशीतील ‘पाच पाटील मिशन ५०० चळवळ’ ही काही ठळक नावे. या चळवळी लोकांना संघटीत होण्यासाठी प्रेरित करत, त्यांची मोट बांधत त्यांचा जलसंधारणाच्या कामांमध्ये थेट सहभाग मिळविण्यासाठी काम करतात. पानी फाउंडेशनसह वरील सर्वांनीच ही मनसंधारणाची चळवळ केवळ एक दोन गावातच नव्हे, तर चक्क हजारो गावात राबवून यशस्वी केली आहे. या प्रकारे जल संधारणापलीकडे जात ग्रामविकासातही मोलाची भर घालणारे अनेक उपक्रम आज सुरू आहेत.

‘पानी फाउंडेशन’ चे जलस्रोत, जलसाठे वाढविण्याबरोबरच जल व्यवस्थापनासाठी चालवलेले उपक्रम शाश्‍वत विकासाकडे नेणारे आहेत.

त्यातून पाणी हे सार्वजनिक संसाधन असून, त्याचे अधिकाधिक न्याय्य वाटपातून समाजातील सर्वाधिक घटकांपर्यंत त्याचे फायदा पोहोचविण्याचे खास उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी ‘मनसंधारण’ हे जीवनमूल्य मानून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्याचाच फायदा आज शेकडो शेतकऱ्यांच्या, गटांच्या, गावांच्या यशोगाथांमधून दिसून येतो.

Water Conservation
Water Conservation : सह्याद्रीतील महिलांचे कष्ट कमी करणारे ‘कुंड प्रकल्प’

दहा वर्षांपूर्वी चित्रपट अभिनेता आमीर खान आणि सत्यजित भटकळ यांनी ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम टीव्हीवर सादर केला. त्यात अनेक गंभीर सामाजिक विषयांवर चर्चा झाली. पण केवळ चर्चा घडवूनच थांबण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजात काम करण्याची ऊर्मीही जागवली.

या दोघांनी त्यासाठी निवडला तो ‘गाव पातळीवरील पाणी सुरक्षा’ हा विषय. कारण तो अनेक सामाजिक प्रश्‍नांच्या मुळाशी असल्याची खात्री त्यांना पटली होती. त्यांनी डॉ. अविनाश पोळ, किरण राव, रीना दत्ता, लॅन्सी फर्नांडिस या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यातून दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी लोक चळवळ उभारण्याच्या कल्पनेवर एकमत झाले.

आपापल्या गावात लोक जलसंधारणासाठी काम करतील आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून भरघोस बक्षीस देण्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ आयोजित करण्याचे ठरले. या स्पर्धेसाठी निकष ठरवले गेले. प्रत्येक गोष्टीसाठी काही गुण ठेवले गेले. त्यात सर्वात पहीला टप्पा होता गावांची निवड.

२०१६ मध्ये पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर मराठवाड्यातील आंबेजोगाई, विदर्भातील वरुड आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरेगाव या तीन तालुक्यांची निवड केली गेली. या तालुक्यातील सर्व सरपंचांना आवाहन केल्यानंतर ११६ गावांनी या स्पर्धेत नाव नोंदवले.

संयोजकांनी या सहभागी गावांतील किमान चार लोकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या गावातल्या पाणी समस्या, त्याची कारणे आणि त्यावर उपाय यावर गटचर्चा घडवून आणली. त्यांच्या गावात पाणलोट विकासाची कोणती कामे आवश्यक आहेत, हे ठरविण्यासाठीही त्यांना वाव दिला.

या प्रशिक्षणाने काय केले असेल, तर मनसंधारणाची जादू केली. समूहशक्तीसाठी आवश्यक मनाची उत्तम मशागत या प्रशिक्षणातून केली गेली. या प्रशिक्षित लोकांनी गावातील लोकांना प्रेरित करण्याचे काम केले.

त्यातून पाणलोट विकासाची स्वयंप्रेरणा निर्माण झाली. विकास कामात प्रमुख भर श्रमदानावरच ठेवला असला तरी अत्यावश्यक ठिकाणी मशिनरी वापराला जागा ठेवली. प्रत्येकाचे श्रम लागल्यामुळे ‘आपले गाव, आपले पाणी’ ‘पाणी सर्वांचे’ ‘आपले श्रम, आपले यश’ हे संस्कार आपोआप रुजले.

बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे यांनी या उपक्रमासाठी प्राधान्याने वेळ दिलाच, पण त्यांच्या शासकीय यंत्रणेला प्रेरणा दिली. त्यामुळे प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले.

योगायोगाने त्यानंतरच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला आणि शिवार पाण्याने भरले हिरवाईने नटले. दुसऱ्या वर्षी तालुक्यांची आणि सहभागी गावांची संख्या वाढली. गावागावातील लोकांच्या मनात जलसंधारणाचा स्फुल्लिंग पेटला.

दुसऱ्या वर्षातील गाव प्रशिक्षणात गेल्या वर्षी यशस्वी झालेल्या गावकऱ्यांना म्हणणे मांडू दिले. त्यांनी त्यांच्या गावात घडलेल्या ‘परिवर्तनाची गोष्ट’ सांगायची होती. याचा खूप छान परिणाम साधला गेला.

चार वर्षे ही चळवळ यशस्वीपणे सुरू असल्याने गावात पाण्याची उपलब्धता वाढली. त्यातून पीक पद्धती बदल घडू लागला. शेतकरी पाण्याचा अधिक वापर करून नगदी पिके घेऊ लागली. पानी फाउंडेशनच्या संयोजकांना साठवलेले पुरणार कसे ही पुढे उद्‌भवणारी समस्या स्पष्ट दिसू लागली.

असेच सुरू राहिले तर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ म्हणजेच पाणी टंचाई. त्यावर मार्ग काढण्यासाठी पुढील वर्षी ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धे’चे आयोजन झाले. यात मुख्य भर होता जलव्यवस्थापनावर!

भूजल नियंत्रण, मृदा आरोग्य आणि मृदा संवर्धनावर, गावातील जैवविविधता आणि पर्यावरण जपण्यावर भर दिला होता. त्यातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याचा उद्देश होता. या उपक्रमात वॉटर कपमध्ये पूर्वी भाग घेतलेल्या गावांनाच प्रवेश होता.

तरीही ९७० गावात कोविडचे थैमान अगदी ऐनभरात असताना गावांचे समृद्धी उपक्रम चालू ठेवले गेले. या स्पर्धेत मुख्य भर पाऊस मोजणे, विहिरींच्या पाण्याची पातळी वेळोवेळी मोजणे, कंपोस्ट खत बनवणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन यातून शेती शाश्‍वत करण्यावर होता.

Water Conservation
Water Conservation : जलसंधारणातून समृद्धीकडे वाटचाल

फार्मर कप :

या उपक्रमाचा पुढील टप्पा २०२२-२३ ला ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ च्या रूपात आला. त्यात मनसंवर्धनाइतकेच ज्ञान संधारणाला महत्त्व दिले गेले. गेल्या सहा वर्षांच्या अनुभवातून जाणवलेली बाब अशी - पाणी साठवूनही अज्ञान किंवा चुकीच्या ज्ञानामुळे दुष्काळ, दारिद्र्य आणि समस्या पूर्णपणे हटत नाहीत.

त्यावर ‘ज्ञान संधारण’ हाच उपाय दिसत होता. महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत घेत कोविडमध्ये सोयाबीनसाठी डिजिटल शेती शाळा सुरू झाली होतीच. यू-ट्यूब व अन्य माध्यमातून लोकांना घरबसल्या विविध पिकांची लागवडीपासून काढणीपर्यंतची सर्व शास्त्रीय माहिती पोचविण्याचा प्रयत्न सुरू झाला.

४७ हजार पेक्षा अधिक लोकांनी या डिजिटल शाळेचा लाभ घेतला. यातून शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत अधिक शास्त्रशुद्ध झाल्याने चांगले परिणाम दिसून आले. आता याच्या पुढील पुढील टप्पा ‘सहकार आणि सहकार्य संधारण’ म्हणजेच त्यात गावातील लोकांचे पीकनिहाय गट या स्पर्धेत उतरणार होते. उदा.सोयाबीनचा गट, कापसाचा गट, भाजीपाला गट असे सुमारे ३६ पिकांचे गट तयार झाले.

यात जिरायती शेती असलेल्या गावांतीलच गटांना प्रवेश होता. यातून तज्ज्ञांच्या मदतीने ज्ञानाचे संधारण करत पिकाची उत्पादकता वाढवण्याचा उद्देश साध्य झाला. गटांमुळे माणसांमध्ये वाढलेली भावनाप्रधानता, सहकार्याची भावना, गट एक कुटुंब असल्याची भावना आणि यातून शेती, पाणी, उत्पन्न या पलीकडे असलेल्या जीवनातल्या दुःखद प्रसंगामध्ये एकमेकांना भक्कम आधार दिला गेला.

गटाला कुटुंबपण आले, तर गावाला खऱ्या अर्थाने गावपण आले. ‘सत्यमेव जयते फार्मर कप’चे हे २०२४ हे तिसरे वर्ष असून एकूण सहभागी गटांची संख्या ४ हजारापेक्षा अधिक आहे. त्यातही महिला गटांची संख्या अधिक असून, या महिला गटांचे यश लक्षणीय आहे. त्यांच्या संघर्षाच्या तीव्र आणि तितक्याच उजळ अशा यशकथा पाहून गहिवरणार नाही, तो माणूसच कसा?

तक्ता १ : वॉटर कप स्पर्धेचा प्रवास, २०१६-२०१९

तपशील २०१६ २०१७ २०१८ २०१९

जिल्हे ३ १० २४ २४

तालुके ३ ३० ७५ ७६

सहभागी गावे ११६ १३२१ ४०२५ ४७०६

प्रशिक्षणार्थी ८५० ६,००० २०,०८४ २५,१७७

श्रमदान उपस्थिती १०,००० ६,५०,००० २,२५,००० २,७५,०००

पाणी साठा,

कोटी लिटर १३५८ ८२६१ २२२६९ २७५००

किंमत कोटी रु. २८२ १६५२ ९६७५ ४२५४

प्रशिक्षण केंद्र २ २२ ६० ६१

विजेता वेळू काकडदरा टाकेवाडी सुरडी

२०१९ मध्ये एकदिवसीय प्रशिक्षणे ६६०४ गावात

१,७२,९६५ उपस्थिती

निसर्गाची धमाल शाळा ११७४, विद्यार्थी संख्या ४१००९, एनएसएस विद्यार्थी तांत्रिक माहिती ७६ महाविद्यालये, ३८०० विद्यार्थी

तक्ता २ : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा

तपशील २०२२ २०२३ २०२४

जिल्हे १८ १८ १८

तालुके ३९ ३९ ४६

स्पर्धेत सहभागी शेतकरी गट १५१६ ३०२७ ४३६०

गटातील शेतकरी सदस्य ३९००५ ३९८९२ ५४५०६

निकषांपलीकडे जाऊन अफाट कामे

स्पर्धा जिंकण्यासाठी निकष असले तरी स्पर्धेच्या निकषांच्या ही पलीकडे जाऊन काही गावांनी अफाट कामे केली.

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथील लोकांनी अखंड हरिनाम सप्ताहाप्रमाणे ‘अखंड श्रमदान’ स्पर्धेदरम्यान केले. चक्क लोक रात्रंदिवस आळीपाळीने श्रमदान करत होती.

वर्षानुवर्षे दारू गाळण्याचा व्यवसाय चालणाऱ्या खापरटोन या गावातील लोकांनी गावातले दोन तलावच श्रमदानाने जोडले.

एका गावात एका दिवसात बाराशे खड्डे वृक्षारोपणासाठी खोदले गेले.

त्याच वर्षी वॉटर कप स्पर्धेत पूर्ण महाराष्ट्रातील सहभागी सर्व गावांनी मिळून एकाच दिवशी दहा हजार शोषखड्डे खोदले.

देणाऱ्याचे हात हजारो....

या सर्व चळवळीची, त्यातल्या उपक्रमांची कल्पना डॉ. पोळ, आमीर खान, सत्यजित भटकळ, किरण राव व त्यांची सर्व गटाची होती. त्यासाठी तांत्रिक सल्ला व कामाचा दर्जा राखण्यासंदर्भातील मार्गदर्शन पुणे येथील ‘WOTR’ ही संस्थेने केले. याच दरम्यान शासनाची जलयुक्त शिवार योजना सुरू असल्याने त्यातील अनेक तरतुदींचा पुरेपूर वापर गावांनी केला. भारतीय जैन संघटनेने अनेक गावांना खोदकामांची मशिनरी पुरवली. त्या त्या भागातील मानवलोकसारख्या अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्थांनीही यात मोठे योगदान दिले. चांगल्या कामासाठी हजारो हात मदतीला येत असल्याची प्रचिती गावकऱ्यांना सतत येत होती.

सतीश खाडे ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com