
Pune News: राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पाणी बचतीवर भर देण्यात येत आहे. मागील चार वर्षांपासून कृषी विभागाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात आला असून एक लाख ३२ हजार २०४ हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून तयार केलेल्या जलसुरक्षा आराखड्यातील मंजूर झालेल्या पाणी बचतीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर, मातीतील आर्द्रता टिकवून ठेवणारी प्रणाली, पाणी उपलब्धतेनुसार पिकांची संरचना इत्यादीद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात आहे. याअंतर्गत प्रकल्प कालावधीत सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.
प्रत्यक्षात लोकसहभाग घेऊन भूजल विभागाने कृषी विभागाला अधिकचा पूरक निधी दिला होता. त्यातून कृषी विभागाने जवळपास ७५ ते ८० टक्केपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे. पूर्वी ते ठिंबक सिंचनासाठी ४५ ते ५५ टक्के अनुदान दिले जात होते. या योजनेच्या पूरक निधीतून २५ ते ३० अनुदान दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी स्व खर्चातून सूक्ष्म सिंचन बसवून सहभाग नोंदवला आहे. त्यासाठी भूजल विभागाने प्रशिक्षणे, प्रचार प्रसिद्धी, शेतकरी मेळावे गावोगावी आयोजित केले होते.
सर्वसाधारणपणे गावास दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या निव्वळ भूजलापैकी बहुतांश पाणी आज शेतीसाठी वापरले जाते. तर उर्वरित पाणी हे पिण्यासाठी, इतर वापरासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी वापरले जात आहे. ही बाब विचारात घेता सर्वप्रथम शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणे ही काळाची गरज आहे. तसेच घरगुती व सार्वजनिक पातळीवर देखील पाण्याचा वापर काटकसरीने व अधिक कार्यक्षमपणे होणे गरजेचे आहे.
यासाठी गरज आहे ती भूजलाची निव्वळ उपलब्धता विचारात घेऊन पाणी बचतीची योग्य तंत्र, पर्यायांची निश्चिती सहभागीय पद्धतीने करुन तिच्या प्रभावी अंमलबजावणीची. यासोबतच शेतीतील पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी काही सामाजिक बंधनांची देखील निश्चिती करून अंमलबजावणी करावी. याद्वारे गावपातळीवर सातत्याने खाली जाणारी भूजल पातळी किमान स्थिरावणे व काही कालांतराने उंचावण्यास मदत होईल.
अटल भूजल योजनेत निवडलेल्या गावांमध्ये बहुतांश ठिकाणी जमिनीवरून (पाटामधून) पाणी वाहून दिले जात होते, नंतर ते सारा, वाफे आळे, सरी-वरंबा, इ. पद्धतीने पिकांना दिले जात होते. मात्र अशा परंपरागत चालत आलेल्या सिंचन पद्धतीमध्ये पाणी देण्याची कार्यक्षमता फक्त ३० ते ३५ टक्के असल्यामुळे साधारणतः कोणत्याही पिकास त्याच्या गरजेपेक्षा जास्त म्हणजे दुप्पट ते तिप्पट पाणी द्यावे लागते.
तसेच प्रवाही सिंचन पध्दतीचे अगदी चांगल्या पद्धतीने नियोजन आणि आरेखन केले, तरी प्रत्येक ठिकाणी किती खोलीपर्यंत पाणी मुरून द्यायचे हे आपल्या हातात नसल्यामुळे कार्यक्षमता जास्तीत जास्त ६० टक्केपर्यंत वाढविता येते. ही बाब विचारात घेता तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, त्यानुसार वाढणारी त्यांची अन्नधान्याची गरज, बदलते हवामान तसेच कृषी क्षेत्रासाठीची कमी होत जाणारी पाण्याची उपलब्धता, भविष्यात पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर काळजी पूर्वक करणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचे निदर्शनास आले.
एकंदरीत हवामानातील बदल व शेती क्षेत्रातील पाण्याचा वापर लक्षात घेता भविष्यात शेती क्षेत्रातील पाणी व्यवस्थापनाबाबत शेतक-यांची समज वाढवून त्यांना पाणी बचतीच्या तंत्राचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. म्हणून अटल भूजल योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने, गावाने भूजलाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून तयार केलेल्या जल सुरक्षा आराखड्यात मुख्यत्वे पुरवठा आधारीत उपाययोजनांसोबतच मागणी आधारीत व्यवस्थापनासाठीच्या कामाचा समावेश केला आहे.
पाण्याच्या कार्यक्षम वापरामुळे झालेले फायदे :
- शेतीमध्ये कमी पाण्यातून अधिक उत्पादन मिळाले.
- उत्पादन खर्चात बचत होऊन तसेच जमिनीचा कस टिकून राहण्यास मदत झाली.
- गावास शाश्वतपणे पाण्याची उपलब्धता झाली.
- अप्रत्यक्षपणे सातत्याने खाली जाणारी भूजल पातळी स्थिरावण्यास मदत झाली. तसेच काही कालांतराने पाण्याची पातळी उंचावण्यास मदत झाली.
- गावास पेयजलाच्या स्रोतातून वर्षभर नियमितपणे पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.