
Dharashiv News : धाराशिव, तुळजापूर आणि औसा तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाची पहिली निविदा जाहीर झाली आहे. यामुळे तीन तालुक्यातील २३ गावातील साधारणपणे ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.अशक्यप्राय वाटणाऱ्या या दुरुस्तीच्या कामासाठी निधीची तरतूद केली.
यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या योजनेतील स्थापत्य विभागाच्या कामाची निविदा निघाली असून प्रत्यक्ष कामासही लवकरच सुरवात होणार आहे. इतर कामाच्या निविदाही लवकरच निघणा असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी आपल्या मागणीवरून टोकन प्रोव्हिजन अर्थात लेखाशीर्षकात निधीची तरतूद करण्यात आली. त्यामुळे आज निविदा प्रक्रियेचा टप्पा गाठता आला. आता प्रत्यक्ष दुरुस्ती कामासही लवकरच सुरवात होईल.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच ११३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता व आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुरुस्ती प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली. पाच टप्प्याची असणारी ही योजना मागील अनेक वर्षे बंद असल्याने स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती.
या तिन्ही विभागांचा सुसमन्वय साधून या तिन्ही विभागांकडून एकत्रित अंदाजपत्रक तयार करून घेणे मोठे जिकिरीचे काम होते. अनेक त्रुटींची पूर्तता करून या तिन्ही विभागाच्या समन्वयाने योजनेच्या दुरुस्ती कामासाठी ११३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीच्या कामास तांत्रिक मान्यता मिळवून घेतली. आणि त्यानंतर सलग पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यताही मिळवून घेतली.
जलसंपदा विभागात कोणत्याही प्रकल्प दुरुस्तीसाठी एकूण तरतुदीच्या कमाल दहा टक्के निधी खर्च करता येतो. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी मात्र तब्बल ११३ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यामुळे या प्रस्तावास खास बाब म्हणून मंजुरी मिळवून घेण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.
पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या या महत्त्वपूर्ण योजनेला आपल्या सर्वांच्या पाठबळावर मोठी गती मिळाली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
योजनेसाठी ४२ दलघमी पाणी राखीव
माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे या योजनेला हक्काचे ४२ दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आलेले आहे. सध्या स्थापत्य विभागाच्या जीएसटी वगळून ३२ कोटी रुपयांच्या कामाची निविदा जाहीर झाली आहे.
पाच टप्प्यातील या योजनेत स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी आशा तिन्ही विभागाचे काम समाविष्ट आहे. स्थापत्य विभागासाठी ४० कोटी, यांत्रिकी विभागासाठी ४३ कोटी १७ लाख आणि विद्युत विभागातील दुरुस्तीसाठी ३० कोटी ३४ लाख अशा एकूण ११३ कोटी ५३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.