
Ahilyanagar News : मुळा कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोलमडले आहे. लोळेगाव, सामनगाव व मळेगावच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांचे भरणे बाकी असताना वरच्या भागातील मायनर उघडून टेलचे पाणी बंद करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असताना पैसे भरूनही हेडच्या शेतकऱ्यांची, पाटबंधारे अधिकाऱ्यांची व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची पाण्यासाठी विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने उन्हाळी कांदा, ऊस, भुईमूग, बाजरी व चारा पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थाकडे पैसे भरून मोठ्या प्रमाणात पाणी मागणी नोंदवली आहे. त्यानुसार संस्थांनी देखील पाणी मागणी पाटबंधारे विभागाकडे नोंदवली आहे.
मात्र नियमानुसार टेल टू हेड पद्धतीने संस्था व शेतकऱ्यांना पाणी मिळणे अपेक्षित असताना हेडच्या भागातील शेतकरी धनदांडगे शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कालव्याच्या क्षमतेएवढे आवश्यक पाणी खाली देत नाहीत. त्याचा परिणाम टेलच्या भागातील शेतकऱ्यांना आपसांत संघर्ष करावा लागत आहे.
शिवाय धरणात मुबलक पाणी असताना व रीतसर पाणीपट्टी भरूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. उन्हाळी पिके जळून चालली असताना बळी तो कान पिळी या पाणी वापर प्रवृत्तीपुढे टेलचे शेतकरी हतबल झाले आहेत. भातकुडगाव शाखा कालव्या अंतर्गत लोळेगाव, सामनगाव व मळेगावचे शेतकरी व स्वामी समर्थ पाणीवापर संस्थेचे ७०-८० एकर क्षेत्र पाण्यापासून वंचित असताना देडगाव भागातील मायनर उघडण्यात आले आहेत.
यामुळे संतप्त झालेल्या या भागातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गजानन तागड, गोकूळ पठाडे, सुरेश देशमुख, सचिन निकम, भाऊसाहेब घुगरे, सोमनाथ नवल, रामदास कुटे, बाजीराव कोकाटे, अनिल निकम आदी शेतकऱ्यांनी दाद मागितली आहे. मात्र अमरापूरचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील देशमुख उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांप्रतीची जबाबदारी झटकत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.