Water Conservation : कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंवर्धन

Agriculture Management : पावसाच्या बदलत्या प्रमाणामुळे कोरडवाहू शेतीत खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात शाश्‍वतता दिसून येत नाही. हे लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचे योग्यरीतीने व्यवस्थापन केल्यास कोरडवाहू शेतीमधील अडचणींवर मात करता येणे शक्य आहे.
Agriculture Conservation
Agriculture ConservationAgrowon

Soil and Water Conservation of Agriculture : भूसंवर्धनाचा उद्देश बांधबंदिस्ती करणे, जमिनीची धूप थांबविणे, पाणी जिरविणे असा होता. यासाठी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविला पाहिजे, जमिनीत जिरविला पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने मृद्‍ व जल या दोन नैसर्गिक संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील पाणी आणि माती आपल्याच शेतात राहील याची दक्षता घ्यावी.

कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता कोरडवाहू क्षेत्रात पावसाच्या पाण्याचे योग्य असे नियोजन करावे. या पद्धतीत उभ्या पिकांत ठरावीक ओळीनंतर सरी काढणे, आच्छादनाचा वापर, पिकावर रसायनांची फवारणी, रुंद वरंबा-सरी पद्धतीचा वापर, जैविक बांध, उताराला आडवी पेरणी आणि बंदिस्त सरी पाडणे यासारखे मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय करावेत.

उभ्या पिकात ठरावीक ओळींनंतर सरी

पीक पेरणी झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर, विविध पिकाच्या अंतरानुसार उभ्या पिकात २, ४ किंवा ६ ओळींनंतर कोळप्याच्या साह्याने किंवा बळीराम नांगराने सरी काढावी.

तूर, कापूस या पिकांमध्ये दोन ओळींनंतर आणि बाजरी, सोयाबीन, ज्वारीसारख्या कमी अंतरावरील पिकामध्ये ४ ते ६ ओळींनंतर सरी काढावी.

सऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीतील पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. त्याचा पिकाला अधिक फायदा होतो.

Agriculture Conservation
Water Conservation : जलसंधारणातून रुखनखेड्याला बळ

आच्छादनाचा वापर

आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवनामार्फत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येते.

आच्छादनासाठी सोयाबीन भुसा, ऊस पाचट, गव्हाचा भुसा, हरभऱ्याचा भुसा वापरावा.

उभ्या पिकात मशागतीची कामे झाल्यानंतर दोन ओळींत जमिनीवर समप्रमाणात आच्छादन करताना पसरावे. यासाठी भुशाचे प्रमाण २.५ ते ५ टन प्रति हेक्टरी ठेवावे.

आच्छादनामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

पिकावर रसायनाची फवारणी

पावसाचा खंड कालावधी ६ ते १२ दिवसांचा झाल्यावर लगेच पोटॅशिअम नायट्रेट २ टक्के किंवा डीएपी २ टक्के किंवा युरिया २ टक्के या प्रमाणात फवारणी करावी.

पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी केल्यामुळे बाष्पोत्सर्जन कमी होते. पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होतात. उत्पादनात ६ ते ८ टक्के वाढ होते.

Agriculture Conservation
Agriculture Conservation : नमामी सातपुड्यातून शेती, वृक्षराजीला बळ

रुंद वरंबा-सरी पद्धत

भारी जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे तसेच जमिनीतील जलसंधारण करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

रिजरच्या साह्याने किंवा बैलचलित नांगराने सऱ्या पाडून वरंब्यावर पिकांच्या ओळींच्या गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठरवावी. साधारणपणे दोन ओळींतील अंतर जास्त असणाऱ्या पिकात (कापूस, तूर) दोन ओळी आणि कमी अंतरावरील पिकांच्या (सोयाबीन, मूग, उडीद) चार ओळी वरंब्यावर येतील, त्यानंतर सरी असते.

अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कमी पाऊस झाल्यास सरीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरते. पिकांना ओलावा उपलब्ध होतो. उत्पादनामध्ये वाढ होते.

जैविक बांध

शेताच्या पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी समपातळी जैविक बांध घालावेत. विशेषत: जमिनीच्या उतारास आडवे खस गवताचे बांध किंवा सुबाभळीचे बांध तयार करावे. यामुळे पाण्यास अडथळा निर्माण होऊन जमिनीत मुरते. ओलावा टिकवून राहतो.

जैविक बांधात लावण्यात येणाऱ्या झाडाझुडपांची लागवड दोन फुटांवर करावी. झाडांची उंची दोन फुटांपर्यंत ठेवावी. जैविक बांधासाठी वापरात येणाऱ्या झाडांचा पालापाचोळा जमिनीवर पसरावा.

दोन जैविक बांधांतील अंतर १२ ते १५ मीटर ठेवावे. जैविक बांधाची रुंदी ३० सेंमी आणि उंची ३० ते ४५ सेंमी ठेवावी. यापेक्षा जास्त झाल्यास छाटणी करावी.

जल, मृद्‍संधारणाचे उपाय

पावसाळ्यापूर्वी लागवडीस अयोग्य जमिनीवरील मृद्‍ संधारणासाठी जलशोषक समतल चर, समपातळी सलग चर यांना प्राधान्य द्यावे.

वहितीखालील क्षेत्रात जागच्या जागी पावसाचे पाणी मुरविण्यासाठी वेगवेगळ्या मशागत पद्धतीचा अवलंब करावा.

कोरडवाहू शेतीत पावसाचे पाणी जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मुरविण्यासाठी खोल नांगरट करावी. खोल नांगरटीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी वाहण्याचे प्रमाण कमी होऊन शेतात पाणी जास्त मुरते. खोल मशागतीसाठी लोखंडी नांगराने २० ते २५ सेंमी खोल नांगरट करावी. म्हणजे पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते, जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.

पाऊस सुरू झाल्यानंतर विविध पिकांची पेरणी करावी. पेरणीनंतर ३० दिवसांनी उभ्या पिकांत खुरपणी आणि कोळपणी झाल्यानंतर जलसंधारण सरी करावी. सोयाबीन पिकामध्ये प्रत्येक ४ ओळींनंतर नांगराच्या साह्याने किंवा रिजरच्या साह्याने जलसंधारण सरी काढावी. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकतो. पावसाच्या खंडकाळात पिकांना पाण्याचा ताण बसत नाही. परिणामी, उत्पादनात स्थिरता दिसून येते. कापूस पिकामध्ये प्रत्येकी २ ओळींनंतर जलसंधारण सरी काढावी.

सोयाबीन पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास जलसंधारण चांगल्या प्रकारे होते. उत्पादनात वाढ होते.

तुरीमध्ये बंदिस्त सरी वरंबा पध्दतीचा जलसंधारणासाठी उपयोग करावा.

डॉ. एम. एस. पेंडके, ९८९०४३३८०३

(अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com