
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Based Financing: शेतकऱ्यांची प्रगती साधायची असेल, तर शेतीला वेळेत पतपुरवठा करणाऱ्या प्रणालीची आवश्यकता आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी शेतीमाल कापणीनंतरचे गोदाम पावतीद्वारे कर्ज स्वरूपात अर्थसाह्य देणे, हा एक महत्त्वाचा घटक आहे. गोदाम पावतीद्वारे कर्जरुपाने वित्तपुरवठा, ही व्यवस्था शेतकऱ्यांना शेतीमाल काढणीनंतर जेव्हा किमती कमी होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने शेतीमालाची तत्काळ विक्री टाळण्याची संधी देते.
गोदाम पावतीमुळे संपूर्ण शेतीमाल पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता वाढवून शेतीमाल हाताळणीचा खर्च कमी करून, शेतमाल साठवणुकीला प्रोत्साहन देते, ज्यामुळे शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता कमी होते. शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याचे नवीन साधन उपलब्ध करून दिल्याने शेतीमाल उत्पादनात शेतकऱ्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता वाढवून त्यांना प्रोत्साहन देते.
जागतिक बँकेने गोदाम पावतीविषयक विविध बाबींवर कामकाज करून पूर्व युरोप आणि मध्य आशियातील (ECA) देशांमध्ये गोदाम पावतीशी निगडित वित्तपुरवठ्याची स्थिती आणि त्याचा वापर वाढविण्याच्या शक्यतांवर व त्यावरील उपाययोजनांवर अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालामध्ये गोदाम पावतीच्या कायदेशीर आणि नियामक समस्यांचे वर्णन करण्यात आले असून या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या प्रक्रियेत कशी मदत करू शकतो याचे वर्णन केले आहे.
गोदाम पावती वित्तपुरवठा हे शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार आणि निर्यातदार यांना गोदामात ठेवलेल्या वस्तूंवर सुरक्षितरीत्या अर्थसाह्य मिळविण्यास अनुमती देणारे एक साधन आहे. गोदाम ऑपरेटर गोदामात साठविलेल्या वस्तूंसाठी गोदाम पावती देतो, ज्याचा वित्तीय संस्थेकडून कर्ज देण्यासाठी तारण म्हणून वापर केला जाऊ शकतो. गोदाम पावती वित्तपुरवठा विशेषतः ग्रामीण लघू आणि मध्यम उद्योगांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पारंपरिक कर्जपुरवठ्यात तारण पावतीची तरतूद नसल्यामुळे लघू आणि मध्यम उद्योगांच्या कर्जाच्या गरजा पारंपरिक कर्ज पूर्ण करू शकत नाहीत.
जगाच्या काही भागांत अनेक पाश्चात्त्य आणि विकसनशील देशांमध्ये गोदाम पावती वित्तपुरवठा ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. परंतु पूर्व युरोप आणि मध्य आशियातील (ECA) देशांमध्ये सोव्हिएट युनियनच्या पतनानंतरच सुरू झाली आहे. आतापर्यंत, याचे वेगवेगळे परिणाम निदर्शनास आलेले असल्याने गोदाम पावती वित्तपुरवठा वाढविण्यासाठी मोठा वाव आहे. अनेक वित्तीय संस्थांद्वारे नावीन्यपूर्ण कायदेशीर चौकटीची व गोदाम पावतीच्या विविध घटकांची नव्याने ओळख करून देण्यात पुढाकार घेतला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध बँका आणि देशांतर्गत बँकांनी पूर्व युरोप आणि मध्य आशियातील (ECA) विविध देशांमध्ये शेतीमाल तारण अर्थसाह्य करण्याच्या व्यावहारिक छोट्या प्रयोगांची ओळख करून देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याबाबत काही प्रमाणात वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचा अनुभव, विविध देशांमधील सद्यःस्थिती याबाबत एकत्रित आणि अद्ययावत माहिती विविध माध्यमांद्वारे उपलब्ध होत आहे.
गोदाम पावतीच्या वित्तपुरवठ्याचे व्यावहारिक उपयोग आणि मुद्दे
खासगी गोदामात उत्पादन आणि उत्पादनाची साठवणूक करणे, या सर्व बाबी एकाच छताखाली होतात आणि दोन्ही प्रक्रिया एकाच कंपनीद्वारे नियंत्रित केल्या जातात. गोदाम व्यवस्थापन हा कंपनीच्या उत्पादन, घाऊक विक्री किंवा किरकोळ विक्री अशा अनेक कामकाजापैकी फक्त एक भाग आहे. खासगी गोदामांमध्ये वस्तूंचा वापर कर्जासाठी तारण म्हणून करणे बँकांसाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण बँकेकडून धनादेशाव्यतिरिक्त, इतर वस्तू अथवा तारण ठेवलेल्या वस्तू खरोखर आहेत का? याची खात्री करण्यासाठी फारशी कोणतीही विश्वासार्ह व्यवस्था उपलब्ध नसते.
फिल्ड वेअरहाउस किंवा क्षेत्रीय गोदाम ही एक अशी गोदाम व्यवसायातील व्यवस्था आहे, जिथे तारणाचे व्यवस्थापन करणारी कंपनी (CMA) किंवा क्रेडिट सपोर्ट कंपनी ठेवीदाराचे गोदाम (उत्पादक/ ग्राहक) किंवा सार्वजनिक ठिकाणचे गोदाम (किंवा गोदामाचा काही भाग) नाममात्र शुल्काने भाड्याने घेते आणि तारण म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या नियंत्रणासाठी जबाबदार बनते किंवा तारणाचा व्यवसाय सुरू करते.
सार्वजनिक गोदाम हे सामान्यतः एक मोठे साठवण क्षेत्र असते, जेथे अनेक व्यवसायांना साठवणुकीच्या सेवा दिल्या जातात. उदाहरणार्थ, बंदर किंवा मालाचे प्रमुख संक्रमण केंद्र. राज्य वखार महामंडळ अथवा केंद्रीय वखार महामंडळ हे सुद्धा एक सार्वजनिक गोदाम व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. या व्यवस्थेत गोदाम हे स्वत:च्या मालकीचे किंवा दीर्घ काळासाठी भाड्याने घेतलेले असते आणि ते एका गोदाम ऑपरेटरद्वारे चालविले जाते.
यात सर्व प्रकारच्या ग्राहकांना शुल्क आकारून गोदामात वस्तू साठविण्याची मुभा देण्यात येते आणि वस्तूंचे संरक्षक म्हणून कामकाज केले जाते. सार्वजनिक गोदाम पुरस्कर्ते अनेकदा गोदाम पावत्या देतात. त्या पावत्या बँकांकडून तारण म्हणून स्वीकारल्या जातात. तथापि, तारण म्हणून पावतीची गुणवत्ता अनेक घटकांवर जसे, की गोदाम चालकांची आर्थिक स्थिती आणि अखंडता यावर अवलंबून असते. तसेच विशेषतः देशातील कायदेशीर आणि नियामक व्यवस्था हे घटक सुद्धा त्यास तितकेच जबाबदार असतात.वेगवेगळ्या गोदाम व्यवस्थांचे तुलनात्मक फायदे अनेक घटकांवर अवलंबून असतात.
ग्रामीण भागातील सार्वजनिक गोदामांची उपलब्धता आणि अखंडता.
खर्च संरचना.
व्यवहारांचे प्रकार आणि आकारमान.
कायदेशीर आणि नियामक वातावरणाची गुणवत्ता.
ग्रामीण भागाला फायदा
ज्या देशांमध्ये गोदाम व्यवस्थापन विषयक कायदेशीर आणि नियामक चौकट नाही आणि जिथे ग्रामीण भागात विश्वसनीय सार्वजनिक गोदामांची कमतरता आहे, तेथे क्षेत्रीय गोदाम व्यवस्थापन हे शेतीमाल तारण वित्तपुरवठ्यासाठी एक आकर्षक साधन असू शकते. गोदाम हे शेतातील शेतीमाल किंवा प्रक्रियादार कंपन्यांच्या जवळपासच्या परिसरात किंवा त्याच्या जवळ असल्याने, शेतीमालाची किंवा वस्तूंची साठवणूक करणे सोईस्कर होते. त्यामुळे प्रत्यक्षात, वस्तू गोदामात हलविण्याऐवजी, वस्तूंच्या जवळ गोदाम व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून, गोदाम पावती वित्तपुरवठा हा प्रकार विशेषतः अशा ठिकाणी उपयुक्त आहे, जिथे प्रक्रियादार व शेतीमाल एकाच ठिकाणी उपलब्ध असतील, कर्जदाराला वस्तू अथवा शेतमाल ठेवण्याची तरतूद उपलब्ध असेल.
ग्रामीण भागात विश्वासार्ह सार्वजनिक गोदामांच्या जाळ्याचे अस्तित्व लक्षणीय फायदे मिळवून देते. सार्वजनिक गोदामांमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे नाव प्राधान्याने घेण्यास हरकत नाही. क्षेत्रीय गोदामांमध्ये वित्तपुरवठा हा एक स्वतंत्र व्यवहार असून यामध्ये तुलनेने जास्त बँकिंग शुल्क असते. बँकांना स्वीकृत असलेली सार्वजनिक गोदामे विविध शेतीमाल पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अर्थसाह्य करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
एक विकसित सार्वजनिक गोदाम प्रणाली देखील व्यापक शेतीमाल आणि ग्रामीण आर्थिक बाजार विकासात योगदान देते. उदाहरणार्थ, सार्वजनिक गोदामांच्या वापरामध्ये वेअरहाऊस ऑपरेटरद्वारे साठविलेल्या वस्तूंची स्वतंत्र प्रतवारी आणि गुणवत्ता प्रमाणपत्र समाविष्ट असते, ज्यामुळे शेतीमाल विक्री व्यवस्थापनात पारदर्शक व्यवहारास चालना मिळण्यास मदत होऊ शकते. व्यापार करण्यायोग्य वेअरहाउस पावत्यांसह, शेतीमालाचे व्यवहार सोपे आणि जलद होतात. गोदाम पावत्यांची एक चांगली व्यवस्था कमोडिटी एक्स्चेंजेसच्या विकासास देखील साहाय्य करते, ज्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र आणि वितरण यंत्रणा आवश्यक असतात. वित्तीय संस्थांसाठी, गोदाम पावती किमान एक मालकी हक्काची तारण व्यवस्था असते, जी कर्जदाराच्या ताब्यातील मालमत्तेच्या तारणापेक्षा श्रेष्ठ असते.
वित्तपुरवठा प्रणालीचे घटक
सार्वजनिक गोदामांवर आधारित एक सुव्यवस्थित गोदाम पावती वित्तपुरवठा प्रणालीमध्ये जोखीम आणि व्यवहार खर्च कमी करण्याची क्षमता आहे. तथापि, हे साध्य करण्यासाठी, वित्तपुरवठादार आणि कमोडिटी मार्केटमध्ये सहभागी होणाऱ्या घटकांमध्ये या प्रणालीवर विश्वास निर्माण करण्यासाठी आणि तिची अखंडता जपण्यासाठी एक सक्षम कायदेशीर वातावरण आणि संस्थात्मक सेटअप असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा वित्तीय पुरवठा करणाऱ्या घटकांना या प्रणालीवर मोठ्या प्रमाणावर विश्वास निर्माण होईल, तेव्हाच ते गोदाम पावतीकरिता कर्ज देतील. ते या कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी करतील.
गोदाम पावती प्रणालीच्या मुख्य घटकांमधील बाबी
एक सक्षम कायदेशीर आणि नियामक चौकट.
एक नियामक आणि पर्यवेक्षण करणारी एजन्सी.
परवानाधारक आणि पर्यवेक्षित सार्वजनिक गोदाम.
विमा संरक्षण आणि आर्थिक कामगिरीची हमी.
गोदाम पावतीच्या वापराशी परिचित बँका.
विविध देशांमधील कायदेशीर परंपरा व अनेक घटकांमध्ये फरक असूनही, सक्षम कायदेशीर चौकटीत खालील मुद्यांच्या आधारे गोदाम पावतीशी संबंधित नियम आणि प्रक्रिया स्पष्टपणे मांडणे अत्यंत आवश्यक आहे.
मालकी हक्क किंवा तारण दस्तऐवज म्हणून गोदाम पावतीची कायदेशीर स्थिती.
ठेवीदार आणि गोदाम ऑपरेटरचे हक्क आणि दायित्व.
सुरक्षा हितसंबंधांची परिपूर्णता (गोदाम पावती किंवा तारण नोंदणी).
फसवणूक आणि आर्थिक कामगिरी हमीपासून गोदाम पावतीचे संरक्षण.
कर्जदाराच्या बाबतीत गोदाम पावती धारकाच्या दाव्यांना प्राधान्य, दिवाळखोरीची व्याख्या.
दिवाळखोरीच्या बाबतीत वेअरहाउस ऑपरेटर आणि आर्थिक कामगिरीबाबत तारण हमीची सुस्पष्ट प्रक्रिया.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.