Pune News : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीला जिल्ह्यात मतदारांनी स्वीकारल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्याने मतदार नाराज होऊन, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील असे बोलले जात होते.
मात्र जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मतदारांनी तरुणांच्या हातात ग्रामपंचायतींच्या चाव्या दिल्या आहेत. तर अजित पवारच ‘दादा’ असल्याचे स्पष्ट झाल्याने, आगामी निवडणुकांमध्ये हेच चित्र कायम राहण्याचे संकेत जरी मिळत असले, तरी प्रत्यक्षात जागा वाटपात मोठी चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या राजकारणातील महायुतीच्या समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपापले गट बदलले असले, तरी या दोन्ही नेत्यांना आपापल्या गावची सत्ता पुन्हा मिळविण्यात यश आले आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीची सत्ता अजित पवार राखण्यात यश आले असले, तरी या ठिकाणी भाजपने चंचुप्रवेश केला आहे. भविष्यात या चंचुप्रवेशाचा धोका पवार गटाला आहे. तर इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीची सत्ता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कायम राहिली आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका थेट पक्षाच्या चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्या तरी विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी निवडणुकांमध्ये पॅनेल उभी केली होती. यामध्ये आपापली सत्ता राखण्याची खबरदारी घेतली होती. मात्र या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांना बसला. त्यांच्या निरगुडसर गावात शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वळसे विजयी झाले आहेत.
यामुळे गेले ४० वर्षे ताब्यात असलेली निरगुडसर ग्रामपंचायत मंत्री वळसे पाटील यांच्या हातातून गेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाचे खासदार आणि स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात शिवसेना (ठाकरे) गटाचे १७ पैकी १६ सदस्य विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी वळसे पाटील आणि डॉ. कोल्हे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
१५८ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा दावा
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात उपमुख्यमंत्री अजित पवार हेच ‘दादा’ असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील २२९ पैकी सर्वाधिक १५८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सत्ता मिळविल्याचा दावा या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निकालानंतर केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर एक असल्याचा दावा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी केला आहे.
दक्षिण पुणे जिल्ह्यात भाजपचा दावा
भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असून, आम्हीच नंबर एक पक्ष असून, पक्षाने २७ ग्रामपंचायतींत सत्ता मिळविली असल्याचा दावा भाजपचे पुणे ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला आहे. या दाव्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आगामी लढती रंजक होण्याची चिन्हे आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.