Pune News : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. एकट्या अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटापेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात एकूण २३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील दोन निवडणुका रद्द झाल्या, तर ४९ ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. जिल्ह्यात मतदान झालेल्या १८६ ग्रामपंचायतींपैकी १०२ ठिकाणी अजित पवार गटाचा विजय झाला, तर भाजपने ४५ आणि शिंदे गटाने दहा जागा जिंकल्या.
पवार गटाला २१, काँग्रेसला २८ आणि ठाकरे गटाला आठ जागा मिळाल्या. दुसरीकडे मनसेनेही पुणे जिल्ह्यात एक जागा जिंकत खाते उघडले आहे. तर १४ अपक्षांनीही पुणे जिल्ह्यात झेंडा रोवला आहे.
बारामती शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षातच फूट पडली आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली.
या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात पहिलीच निवडणूक पार पडली. राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. बारामतीतील परिस्थिती काय आहे, बारामती शरद पवाराची की अजित पवारांची, या प्रश्नाचे उत्तर बारामतीतील ग्रामीण भागातील जनतेने या ग्रामपंचायत निवडणुकीत दिले आहे.
बारामतीत २४ जागांवर राष्ट्रवादीचा विजय
बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. बारामती तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, २६ पैकी २४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर, दोन ग्रामपंचायतींवर भाजपचा सरपंच निवडून आला आहे.
पुरंदर तालुक्यातही अजित पवार गटाची सरशी
पुरंदर तालुक्यातील १३ पैकी ७ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून आले, तर चार ठिकाणी शिवसेना-भाजप, ३ ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. पुरंदरचे आमदार संजय जगताप आपले वर्चस्व सिद्ध करतील असे म्हटले जात होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अनपेक्षितपणे ७ ग्रामपंचायतींवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर, दौंड, इंदापूर, हवेली, खेड, भोर, मावळ, मुळशी, जुन्नर तालुक्यांतही धक्कादायक निकाल लागले आहेत.
दिलीप वळसे पाटील यांना धक्का
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाचे रविंद्र वळसे पाटील विजयी झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सरपंचपद असलेली सत्ता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हातून प्रथमच गेली असल्याने हा राज्यात मोठा धक्का मानला जात आहे.
निरगुडसर येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे रविंद्र वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संतोष बबन टाव्हरे यांचा १३५ मतांनी पराभव केला आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्वतःच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्याने हा वळसे पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. सरपंचपदासाठी धर्मराज पॅनेलचे रविंद्र वळसे पाटील, निरगुडेश्वर ग्रामविकास पॅनेलचे संतोष टाव्हरे आणि अपक्ष म्हणून नीलेश वळसे पाटील हे तीन उमेदवार रिंगणात होते.
त्यामध्ये रवींद्र वळसे पाटील यांना १४८३ मते मिळाली, तर संतोष टाव्हरे यांना १३४८ मते मिळाली. यामध्ये टाव्हरे यांचा १३५ मतांनी पराभव झाला, तर अपक्ष उमेदवार नीलेश वळसे पाटील यांना अवघी १८४ मते मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.