Pune News : राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी (ता. २०) चुरशीने मतदान झाले. यंदा लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान चांगले झाले. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात ६५. ०२ टक्के मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून सर्वात कमी मतदान मुंबईत झाले आहे.
राज्यात सध्या थंडीचा जोर वाढत असून याचा मतदानावर बुधवारी सकाळी परिणाम दिसून आला. सकाळी ९ वाजेपर्यंत अनेक मतदार संघात जेमतेम ८ ते १० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. मात्र १० नंतर मतदानाला चांगला जोर वाढला. दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान झाले होते. यावेळी सर्वाधिक गडचिरोलीत ६२.९९ टक्के आणि सर्वात कमी ठाण्यात ३८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
यामुळे दुपारनंतर सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून मतदारांना बाहेर काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ५८.२२ मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी ६ वाजता मतदार संपल्याने मतदान प्रक्रिया थांबण्यात आली. तर अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला. रात्री ११.४५ वाजता निवडणूक आयोगाने मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी जारी केली.
राज्यात उच्चांकी मतदान
कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदार संघात यंदा पहिल्यांदाच मोठी चुरस झाली. यातील कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीर मतदारसंघाकडे अख्या राज्याचे लक्ष लागले आहे. यामुळे येथील लढती प्रतिष्ठेच्या झाल्याने राज्यात उच्चांकी मतदानाची नोंद झाली. कोल्हापुरमध्ये ७६.२५ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान करवीर मतदार संघात झाले आहे. करवीरमध्ये ८४.७९ टक्के मतदान झाले आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक कमी मतदान कोल्हापूर उत्तर मतदार संघात झाले असून येथे ६५.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४ हजारांहून अधिक उमेदवार मैदानात उतरले होते. तर प्रमुख सहा पक्ष एकमेकांच्या समोर उभे होते. यामुळे राज्यात यंदा चुसर पाहायला मिळाली. राज्यात ९ वाजेपर्यंत मतदान पार पडले. तर यंदा गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच मतदानाची टक्केवारी वाढली असून या आधी १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
राज्यातील मतदार संघ निहाय आकडेवारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.