Ahilynagar News : जिल्ह्यात बुधवारी (ता. २०) विधानसभेसाठी झालेल्या बारा मतदार संघांत मतदान सुरळीत पार पडले. दुपारी बारानंतर मतदानाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. जिल्हा प्रशासनाने पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ५ वाजेपर्यंत ६१.९५ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान नेवासा मतदार संघात ७०.४९ टक्के झाले.
जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, शेवगाव- पाथर्डी, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, शिर्डी, नेवासा या १२ मतदार संघांत ३ हजार ७६५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. अहिल्यानगर, विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) होत असलेल्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार असून, ३ हजार ७६५ मतदान केंद्रे असणार आहेत. त्यापैकी २ हजार ८५ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग (थेट प्रेक्षपण) केले.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अहिल्यानगर शहरासह जिल्हाभर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच तीन हजार ६०० होमगार्ड तैनात होते. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवण्यात आली होती. मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा देण्यात आल्या होत्या.
सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. नऊ वाजेपर्यंत साधारण सव्वासहा टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी सव्वा अठरा टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे ३६ टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजता ४७.८५ टक्के, दुपारी पाच वाजेपर्यंत ६१.९५ टक्के मतदान जिल्ह्यात झाले, अशी जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास किंवा किती टक्के मतदान झाले. याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवावा लागतो. अकोले मतदार संघात ३०७ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १९ मतदान केंद्रांवर मोबाईल व दूरध्वनी फोनसाठी रेंज नाही. संगमनेर तालुक्यातील ३ मतदान केंद्रांची परिस्थितीही अशीच आहे.
या दोन्ही तालुक्यांतील २२ मतदान केंद्रांवरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी रनर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. श्रीरामपूर येथे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर रात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याचा प्रकार व गाव पातळीवरील किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.