
Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आलेले कपाशीचे सरळ वाण एनएच २२०३७ आणि एनएच २२०३८ हे बीजी २ (BG-II) मध्ये परिवर्तित करण्यात आले आहेत.
या दोन बीजी २ (BG-II) सरळ वाणांची भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत केंद्रीय वाण निवड समितीच्या १९ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत मध्य भारत विभागातील महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरडवाहू क्षेत्रात सघन लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कपाशीचे सरळ वाण बीजी २ (BG-II) मध्ये परिवर्तित करणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे. कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनात हे वाण विकसित करण्यामध्ये संशोधन संचालक तथा कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, सहयोगी पैदासकार डॉ. विजयकुमार चिंचाणे, सहायक पैदासकार डॉ. अरुण गायकवाड आदींसह कापूस संशोधन केंद्रातील इतर शास्त्रज्ञ व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
सरळ वाण असल्यामुळे या दोन वाणांचे बियाणे घरचे बियाणे शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन वर्षे वापरता येईल. त्यामुळे बियाण्यांवरील खर्च कमी करता येऊ शकतो, असे या वाणाच्या विकासातील प्रमुख शास्त्रज्ञ यांनी सांगितले. या उल्लेखनीय संशोधनाबद्दल कुलगुरू डॉ. मिश्रा यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
कपाशीच्या वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये
एनएच २२०३७ (बीजी २) ः हा वाण सघन लागवडीस योग्य आहे. झाडांची उंची ९० ते ९५ सेंमी आहे. बोंडाचे वजन ४.५ ते ४.७ ग्रॅम आहे. कापूस धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी आहे. धाग्याची मजबुती व तलमपणा विशेष चांगला आहे. हा वाण रसशोषक कीड व विविध रोगास सहनशील आहे.
एनएच २२०३८ (बीजी २) ः हा वाण सुमारे १६० ते १७० दिवसांत तयार होतो. हेक्टरी १८ ते १९ क्विंटल उत्पादन क्षमता आहे. सघन लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कापूस धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी असून धाग्याची मजबुती २८ ते २९ ग्रॅम/टेक्स आहे. बोंडाचे वजन ४.८ ते ५.० ग्रॅम आहे. रसशोषक कीड, जिवाणूजन्य करपा व पानावरील ठिपक्यांच्या रोगास सहनशील आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.