
Akola News : अकोला जिल्ह्यात बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यात असलेल्या गावांसाठी मंजूर झालेली ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) स्थगित केल्याने आता याविरोधात उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर नागपूरला मोर्चा (Protest) काढला जाणार आहे.
खारपाणपट्ट्यातील पाण्याचे टँकर (Water Tanker) अकोला ते नागपूर पायी दिंडी काढून नेले जाईल, अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली.
बाळापूर, अकोल्यातील गावांसाठी पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. मंजुरीनंतर कामही सुरू झाले.
योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले. ४३ किलोमीटर अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन होते.
त्यापैकी २७ किलोमीटरपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली. २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला. आता या योजनेला स्थगिती देण्यात आली, अशी टीका आमदार देशमुख यांनी केली.
या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, विकास पागृत, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ही पायी दिंडी सोमवारी (ता. १०) अकोल्यातील राजेश्वर मंदिरापासून सुरू होणार आहे.
राजेश्वराला जलाभिषेक करून दिंडी मार्गस्थ होईल. नागपूरपर्यंत नऊ ठिकाणी मुक्काम केला जाईल. शुक्रवारी (ता. २१) ही यात्रा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी दिंडी पोहोचणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.