Chiku Cultivation Success Story : सहा एकर चिकू बागेतून भरभरून गोडवा

Success Story Of Chankhore Brothers : बुलडाणा जिल्ह्यातील बोरी (ता. मेहकर) येथील चनखोरे बंधूंनी सहा एकरांत सुमारे २३ वर्षांपासून चिकू बागेची कष्टपूर्वक जोपासना केली आहे. परराज्यांत त्यास बाजारपेठही तयार केली आहे.
Chiku Cultivation
Chiku CultivationAgrowon
Published on
Updated on

गोपाल हागे

Success विदर्भात चिकूची फळबागशेती फारशी पाहण्यास मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील बोरी (ता. मेहकर) येथील चनखोरे बंधू सहा एकरांत सुमारे २३ वर्षांपासून चिकू बागेची अत्यंत काळजीपूर्वक जोपासना करीत आहेत. सविस्तर सांगायचे तर धोंडू कुंडलिक चनखोरे यांची वडिलोपार्जित ४५ एकर शेती आहे. नदी व विहिरींचे पाठबळ आहे. खरीप व रब्बीत पारंपरिक पिके घेण्यात येतात. मात्र कमी खर्चात व देखभालीत शाश्‍वत उत्पन्न सुरू राहावे यादृष्टीने चनखोरे यांनी विविध पिकांचे पर्याय शोधले. त्यातून चिकूचे पीक अधिक फायदेशीर वाटले.

लागवडीची तयारी

मेहकरच्या भागात चिकू हे तसे नवे पीक होते. त्यामुळे धोंडू यांचा मुलगा गजानन यांनी काही शेतकऱ्यांसह सन २००० मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाला भेट देत अधिक माहिती घेतली. प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभवही जाणून घेतले. तत्कालीन कृषी सहायक मोहन पवार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून कलमे आणून ३३ बाय ३३ फूट अंतरावर लागवड केली.

Chiku Cultivation
Paddy Crop : भाताच्या पेंढ्याचा शेतकऱ्यांना हातभार

व्यवस्थापनातील बाबी

सन २००० मध्ये लागवड केलेली कालीपती वाणाची चिकूबाग आज सहा एकरांत उभी आहे. सुमारे २३ वर्षांपासून सुयोग्य व्यवस्थापनातून मोठे कैलास, मधले गजानन व लहान प्रवीण या तीन बंधूंनी या बागेची काळजीपूर्वक जोपासना केली आहे. झाडे १० वर्षांची होईपर्यंत बागेत आंतरपीक घेतले. आज मोठी झाडे डेरेदार झाली असून, वाढ एकसमान आहे. शेणखत व गांडूळ खताचाच अधिकाधिक वापर करतात. फूल पोखरणारी अळी ही प्रमुख समस्या असून, जुलै ते सप्टेंबर या काळात ती अधिक सक्रिय राहते. फुलावस्था सुरू असताना ती जास्त नुकसान देते. धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर करून अळीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न असतो. तापमान वाढल्यास फुलगळीचाही धोका असतो. हिवाळ्यापासून ते मे महिन्यापर्यंत पाटपाणी देण्यात येते.

बाग देतेय भरभरून उत्पादन

सुरुवातीला सहा ते सात वर्षे झाडांवर फळ धरले नाही. त्यानंतर फळ घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रति झाड ५० किलोपर्यंत फळे मिळायची. आज प्रति झाड ३०० ते ४०० किलोपर्यंत फळे मिळत आहेत. दरवर्षी त्यात अंदाजे १५ किलो प्रति झाड या प्रमाणे भर पडत आहे. वर्षातून एक वेळेस बहार नियोजन केले जाते. त्याची फळे फेब्रुवारी- मार्चमध्ये काढणीस येतात. मजुरांच्या साह्याने तोडणी झालेली फळे एक दिवस तशीच जमिनीवर पडू दिली जातात. कारण त्यांच्या देठाजवळून चिकट द्रव बाहेर येतो. तो सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळे गोळा करून त्यांची प्रतवारी होते व क्रेट गाड्यांमध्ये भरून मालाची पाठवणी होते. सुमारे तीन महिने तोडणी हंगाम चालतो.

Chiku Cultivation
Cotton Crop : पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात

परराज्यांत मिळवली बाजारपेठ

काढणी हंगामात दररोज काही टन माल हाती येतो. एवढ्या मालाला बुलडाणा किंवा परिसरात मागणीही नसते. शिवाय दरही प्रति किलो १५ ते २० रुपयांपेक्षा जास्त मिळत नाही. अशावेळी चनखोरे यांनी मध्य प्रदेशातील रायपूर, जबलपूर, बिलासपूर या बाजारपेठा शोधल्या. तेथे चिकूला मोठ्या प्रमाणात मागणी असते. तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक वर्षांपासूनचे संबंध तयार झाले आहेत. या बाजारपेठांमध्ये किलोला ३० ते ४० रुपयांदरम्यान दर मिळतो. सन २०२० मध्ये बागेतून एकूण झाडांमधून ४० टन, २०२१ मध्ये ४५ टन व २०२२ मध्ये ५० टनांपर्यंत उत्पादन मिळाले.

फळ तोडणी व वाहतूक खर्चाचा विचार करता प्रति फळ १० रुपये खर्च येतो. गजानन सांगतात, की मध्य प्रदेशची बाजारपेठ आम्हाला दूर आहे. मात्र दर ३० ते ४० रुपये मिळाला व प्रति किलो फळ पाठवण्याचा खर्च १० रुपये गृहीत धरला, तरी २० रुपये दराने ते परवडू शकते. याच चिकूच्या बागेचा आम्हाला मोठा आर्थिक आधार आहे. त्यातील उत्पन्नाच्या बळावर दहा एकर जागा घेऊ शकलो. गावात आज दोन घरे घेतली असल्याचे गजानन सांगतात. उत्पन्नाचे स्रोत विस्तृत करण्यासाठी गजानन सोयाबीन मळणीसाठी ‘हार्वेस्टर’ पुरवण्याचा व्यवसाय करतात. अन्य राज्यांतील यासंबंधीच्या व्यावसायिकांसाठी स्थानिक भागात ते काम करतात.

गजानन चनखोरे ९५४५८२७८५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com