Chiku Processing : साठीतील साठे यांचे प्रक्रिया मूल्यवर्धन

process value addition : आपल्या बागेतील चिकूला मिळणारे दर, काही कारणांनी होणारे नुकसान या बाबी अल्पभूधारक शेतकरी शिवमूर्ती साठे (काक्रंबा, जि. धाराशिव) यांनी लक्षात घेतल्या.
Chiku Processing
Chiku Processing Agrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार

Onion Processing : आपल्या बागेतील चिकूला मिळणारे दर, काही कारणांनी होणारे नुकसान या बाबी अल्पभूधारक शेतकरी शिवमूर्ती साठे (काक्रंबा, जि. धाराशिव) यांनी लक्षात घेतल्या. प्रयत्नवाद व हुशारी यांच्या जोरावर चिकूचे मूल्यवर्धन करीत सुकविलेले काप तयार केले. त्यास थेट ग्राहक बाजारपेठ मिळवण्यासह जास्तीचा फायदा मिळवण्यास सुरुवात केली आहे.

तुळजापूर-लातूर महामार्गावर तुळजापूरपासून पाच किलोमीटरवर काक्रंबा (जि. धाराशिव) गाव आहे. हंगरगा लघुतलाव आणि काक्रंबा तलावाच्या लाभक्षेत्रात असल्याने पाण्याचा चांगला स्रोत उपलब्ध आहे. तुळजापूरसारखे तीर्थक्षेत्र शेजारी असल्याने बाजारपेठेचाही फायदा गावाला होतो. गावात भाजीपाल्यांसह कांदा उत्पादन सर्वाधिक होते. दर्जेदार कांदा बीजोत्पादन वा रोपविक्रीसाठीही गावाची खास ओळख आहे.

साठे यांची चिकू शेती

गावात शिवमूर्ती साठे यांची महामार्गालगतच साडेचार एकरांपर्यंत शेती आहे. त्यात पावणेदोन एकर चिकू असून, अन्य क्षेत्रांत आंबा, लिंबू, कांदा, पालेभाज्या व फळभाज्या असतात. आई किसाबाई, पत्नी तेजाबाई, मुलगा कालिदास आणि सून अहिल्या, नातवंडे असे त्यांचे कुटुंब आहे. शिवमूर्ती स्वतः कमी शिकले असले, तरी मुलगा कालिदास आणि मुलगी गोकर्णा यांना कृषी पदवीचे शिक्षण त्यांनी दिले आहे. मुलगा गावात कृषी केंद्र चालवतो.

भाजीपाला थेट विक्रीचा अनुभव

शिवमूर्ती लहानपणापासून वडिलांच्या संस्कारातून शेतीचा अनुभव घेऊ लागले. एसटी महामंडळात ‘हेल्पर’ म्हणून नोकरी मिळाली. पण त्यात ते फार रमले नाहीत. वडील भाजीपाला पिकवायचे. दररोज तुळजापूरला मंडईत हातविक्री करायचे. शिवमूर्ती यांनीही त्यांचाच वारसा चालविला, तो आजगायत. आज ते वयाच्या साठीत असले तरी स्वतः दररोज मंडईत जाऊन भाज्यांची थेट विक्री करण्याचा शिरस्ता काही मोडलेला नाही. परिश्रम व गाढा अनुभव यातून ‘मार्केटिंग’चे उत्तम ज्ञान त्यांना आले आहे.

Chiku Processing
दिलीप माने, बळिराम साठे यांचे उमेदवारी अर्ज बाद

चिकू बागेची जोपासना

भाजीपाला पिकांपेक्षा नवे काही करण्याच्या विचारातून साठे २००५ मध्ये चिकू बागेकडे वळले. गावचे त्या वेळचे कृषी सहायक रमेश ढवळे यांनी त्याबाबत मार्गदर्शन केले. कालीपत्ती वाणाची
रोपे डहाणू (ठाणे) येथून आणून त्यांची लागवड केली. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बागेची चांगली जोपासना सुरू केली. सुरुवातीची सहा वर्षे उत्पादन घेतले नाही. त्यानंतर मात्र सेंद्रिय पद्धतीने म्हणजे १२ ते १३ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने दरवर्षी उत्पादन घेण्यात येत आहे.

चिकूपासून काप

मंडईत भाज्यांबरोबर चिकूचीही थेट विक्री होऊ लागली. पण पक्व चिकू झाडांवरून काढून बाजारात नेईपर्यंत खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले. त्या वेळी सुकविलेल्या कापांच्या रूपात
मूल्यवर्धन करण्याचा विचार त्यांनी केला, त्यातून फळाचे नुकसान कमी होणार होतेच. शिवाय नफाही वाढणार होता. साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी साठे तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आले. तेथील विषय विशेषज्ञ सौ. वर्षा मारवाळीकर यांच्यासह लातूरचे या विषयातील तज्ज्ञ प्रा. विकास कुलकर्णी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर प्रत्यक्षात काप तयार करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले आहे.

Chiku Processing
Food Processing : शेतीमालाचे प्रकिया उद्योगातून मूल्यवर्धन होईल ः प्रताप काळे

मूल्यवर्धनाचे साधे सोपे तंत्र

साठे कमीत कमी गुंतवणुकीत व साध्या सोप्या पद्धतीने मूल्यवर्धन करतात. पक्व फळे काढून ती तुरटीच्या पाण्यात स्वच्छ धुऊन घेतली जातात. प्रतवारी व छोट्या फोडी केल्या जातात. कृषी विज्ञान केंद्राने दिलेले सौर वाळवणी यंत्र साठे यांच्याकडे आहे. त्याची क्षमता कमी असल्याने अजून एका सोप्या तंत्राचा वापर होतो. बाजारातून जुने लोखंडी पत्रे आणले आहेत. थोड्या-थोड्या अंतरावर त्याला छिद्रे पाडली आहेत. एका बाजेवर पत्रा, त्यावर पातळ काळे कापड अंथरून त्यावर सुकविण्याची प्रक्रिया केली जाते.

मूल्यवर्धनातून नफा

साठे यांची एकूण १०८ झाडे आहेत. जानेवारी ते मे हा चिकूचा मुख्य फळहंगाम असतो.
संपूर्ण कालावधीत सरासरी नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळते. पैकी सहा टन चिकूची हातविक्री प्रति किलो ४० रुपये व कमाल ८० रुपये दराने होते. दोन टन चिकूपासून काप तयार केले जातात. शंभर ग्रॅम पाकिटे तयार करून प्रति पाकिट ३० रुपये दराने (प्रति किलो ३०० रुपये) विक्री होते. चिकूचे
सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत असल्याने चिकूला गोड चव तयार होते. काप तयार करतानाही रासायनिक वा अन्य घटक मिसळले जात नाहीत. मूल्यवर्धनाच्या रूपाने साठे यांची चिकू शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली आहे.

कांद्याचेही मूल्यवर्धन

कांद्यास किलोला २० रुपयांपुढे दर असतो त्या वेळी बाजारात विक्री होते. मात्र दर त्या खाली आल्यास त्याचा कीस तयार करून शंभर ग्रॅमचे पॅकिंग करून ५० रुपये दराने त्याची विक्री केली जाते. दहा किलो कांद्यापासून प्रत्यक्षात सुकविलेला ६०० ग्रॅम कांदा मिळतो. रेडी टू कुक प्रमाणे त्याचा वापर होत असल्याने तुळजापूर भागात हॉटेल व्यावसायिकांकडून त्यास खूप मागणी असते असे साठे सांगतात.

संपर्क ः शिवमूर्ती साठे, ७२१८११०९९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com