Pomegranate Food : डाळिंबाचा जॅम, जेली, अनारदाणा

Pomegranate : डाळिंबापासुन कोणकोणत्या खाण्यायुक्त गोष्टी बनवता येतात त्याबद्दलची माहिती आणि बनविण्याच्या योग्य पद्धती कश्या आहेत पाहुयात...
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

राधा लोलगे, डॉ. विजया पवार

रस :

तयार फळे स्वच्छ करून दाणे हाताने काढणे किंवा यंत्राच्या साह्याने दाणे वेगळे करून घ्यावेत. ज्यूस ७९ ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला तापवावा, उकळलेला ज्यूस थंड करून २४ तास स्थिर ठेवावा.

त्यानंतर रस गाळणीने गाळून घनपदार्थ वेगळा करावा.

वेगळा केलेला रस आणखी एकदा गाळणीतून गाळून स्वच्छ बाटल्यामध्ये भरावा. हा रस जास्त दिवस टिकविण्यासाठी या बाटल्या बंद करून उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे बुडवून थंड कराव्यात किंवा बाटल्या बंद करण्यापूर्वी रसात ०.०६ टक्‍का सोडिअम बेंझोइट मिसळून बाटल्या बंद केल्यास हा रस पुष्कळ दिवस टिकविता येतो.

जॅम :

जॅम बनविण्यासाठी डाळिंबाच्या १ किलो गरामध्ये १ किलो साखर, ४ ग्रॅम सायट्रिक ॲसिड व ४ ग्रॅम

पेक्टीन मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.

जॅम करताना स्टीलची भांडी वापरावीत.

स्टीलच्या पळीने सतत हलवावे याने गर करपत नाही व जॅम चांगल्या प्रतीचा तयार होतो. मिश्रणाचा ६८ ते ७० डिग्री ब्रिक्स आल्यास जॅम तयार झाला असे समजावे. तयार झालेला जॅम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बरणीत भरावा.

Pomegranate
Pomegranate Farming : आंबिया बहरात राखले सातत्य

जेली :

जेली तयार करण्याकरिता डाळिंबाचे दाणे काढून त्याचा रस काढावा. काढलेला रस पातळ सुती कापडाने गाळून घ्यावा.

५० टक्के फळाचा रस पाण्यात एकजीव करून १५ ते २० मिनिटे गरम करावा. गाळलेल्या रसात समप्रमाणात साखर, ०.७ टक्का सायट्रिक ॲसिड आणि पेक्टीन मिसळून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे ११० अंश सेल्सिअस ठेवावे.

तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स असते. जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी.

अनारदाणा :

अनारदाणामध्ये ५.४ ते १४.७ टक्के पाणी, ७.८ ते १५.४ टक्के आम्लता, २.०४ ते ४.४ टक्के खनिजे आणि ४.७४ ते ६.२५ टक्के प्रथिने असतात. हा पदार्थ अन्न शिजवताना चिंचऐवजी अनेक अन्नपदार्थात वापरता येतो. त्यामुळे अन्नाची चव सुधारते, अन्न स्वादिष्ट, रुचकर व पौष्टिक बनते.

डाळिंब फळे निवडून ती स्वच्छ धुऊन, साल काढून, दाणे वेगळे करावेत. नंतर १ किलो डाळिंबाच्या दाण्यात ५० ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ते सूर्यप्रकाशात ३ ते ४ दिवस सुकवावेत किंवा कॅबिनेट ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १४ ते १६ तास सुकवावेत. तयार झालेला अनारदाणा प्लॅस्टिक पिशव्यात भरून त्याची साठवण करावी.

Pomegranate
Pomegranate Market : परराज्यातील आवकेमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबास दराचा झटका

स्क्वॅश :

फळांच्या गरयुक्त रसामध्ये गोडी आणण्यासाठी साखर मिसळून तयार केलेल्या पदार्थास स्क्वॅश असे म्हणतात. चांगली चव यावी, म्हणून साखर व आम्ल यांचे योग्य प्रमाण राखले जाते. स्क्वॅश वापरण्यापूर्वी पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून पिण्यासाठी वापरतात.

स्क्वॅश तयार करण्यासाठी २५ टक्‍के डाळिंबाचा रस, ४५ टक्‍के साखर व २ टक्‍के सायट्रिक ॲसिड यानुसार पदार्थाचे प्रमाण वापरावेत.

फळे स्वच्छ धुऊन सोलून घ्यावीत. दाणे वेगळे काढून त्यापासून रस काढावा. त्यामध्ये १.५ किलो साखर, २५-३० ग्रॅम सायट्रिक ॲसिड आणि १ लिटर पाणी मिसळावे.

सर्व मिश्रण एक किंवा दोन वेळा उकळून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात डाळिंबाचा तयार रस मिसळावा. सर्व मिश्रण एकजीव करून मलमलच्या कापडातून काढून घ्यावा. तयार स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावे आणि कॅपने सील करावे. थंड कोरड्या जागी साठवण करावी.

सालीपासून पावडर :

साल अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपाय आहे. सालीची पावडर घसादुखी, खोकला, पोटाच्या समस्या आणि हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बाकी फळांच्या सालींपेक्षा भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.

अनारदाणा, ज्यूस, स्कॅश निर्मितीतील शिल्लक सालीचा उपयोग पावडर तयार करण्यासाठी होऊ शकतो.

फळाच्या सालीचे प्रमाण २० टक्के असते. सालीत ३० टक्के टॅनिन असते. यास वाळवून पावडर बनवता येते. साल उन्हामध्ये किंवा ड्रायरमध्ये ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला वाळवून घ्यावी. नंतर त्याची दळण यंत्राच्या साहाय्याने पावडर तयार करून ६० मेसच्या चाळणीने चाळून घ्यावे. चाळून घेतलेली पावडर हवा बंद पिशव्यांत पॅक करून ठेवावी.

राधा लोलगे, ९३७०४२७२९२ (अन्न उद्योग व्यवस्थापन विभाग,अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com