Indrajeet Bhalerao : जाणिवांचं क्षितीज विस्तारणाऱ्या वाचनवाटा

Vachanwata Book : वाचनवाटा हे आदिनाथ चव्हाण यांचं पुस्तक मी नुकतच वाचलं. पुस्तकांवर लिहिलेल्या पुस्तकांची एक सुंदर मालिका गेल्या काही दिवसापासून मराठीत सुरू झालेली आहे.
Vavhanwata
Vavhanwata Agrowon

इंद्रजित भालेराव

वाचनवाटा हे आदिनाथ चव्हाण यांचं पुस्तक मी नुकतच वाचलं. पुस्तकांवर लिहिलेल्या पुस्तकांची एक सुंदर मालिका गेल्या काही दिवसापासून मराठीत सुरू झालेली आहे. त्या मालिकेतलं हे एक आणखी महत्त्वाचं पुस्तक. पुस्तकं हाच या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकात जागतिक साहित्याचे मानदंड ठरलेल्या काही पुस्तकांची निवड करून त्यावर लिहिलेले लेख आहेत.

लेखक ॲग्रोवन या सकाळ समूहातील शेतकरी विषयक दैनिकाचे संपादक आहेत. या दैनिकाच्या रविवार पुरवणीसाठी त्यांनी वर्षभर केलेलं हे सदरलेखन आहे. या लेखात जागतिक साहित्याचे मानदंड ठरलेल्या काही कलाकृतींच्या त्यांनी परिचय करून दिलेला आहे. ही समीक्षा नाही असं स्वतः आदिनाथ चव्हान यांनीच सांगितलेलं आहे.

जागतिक दर्जाच्या आणि जगभर कोट्यावधी वाचकांनी वाचलेल्या, जगभरातल्या विविध भाषांमध्ये अनुवादित झालेल्या, विचारवंतांनी उचलून धरलेल्या पुस्तकांची निवड या लेखमालेसाठी लेखकानं केलेली आहे. यात एकही भारतीय लेखक नाही. जागतिक दर्जाचा एकही भारतीय लेखक नाही का ? यातल्या बहुतेक पुस्तकांना नोबल प्राइज मिळालेलं आहे.

आपल्या रवींद्रनाथ टागोर यांनाही नोबल प्राइज मिळालेलं आहे. पण टागोरांविषयी सगळ्यांनाच सगळंच माहित आहे म्हणून कदाचित लेखकानं त्यांचं पुस्तक घेतलं नसावं. पण घ्यायला हरकत नव्हती. कारण या सर्व लेखांमध्ये एकही लेख कवितासंग्रहावर नाही आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या कवितासंग्रहाला नोबल पुरस्कार मिळालेला आहे.

Vavhanwata
Indrajit Bhalerao : शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल

हे सगळं लेखन करताना लेखकाच्या डोळ्यासमोर सामान्य वाचक आहे. त्यामुळं या सगळ्या लेखनामागं लेखकानं एक धोरण ठरवलेलं आहे. सुरुवातिला लेखक त्या पुस्तकाच्या लेखकाचा थोडक्यात परिचय करून देतो, पुस्तकाचं थोडक्यात कथानक सांगतो, त्यावर थोडंसं भाष्य करतो, त्याला समर्पक आणि सगळ्यांना माहीत असलेल्या कवितांच्या ओळी देतो,

काही ठिकाणी हिंदी चित्रपटगीत - गझलामधल्या ओळी देतो, त्यानंतर पुस्तकातल्या कथानकावर निघालेल्या चित्रपटाविषयी लेखक थोडक्यात सांगतो, ते चित्रपट समाज माध्यमावर कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील तेही सांगतो, त्या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या निर्मितीची काही कथा असेल तर तीही सांगितली जाते,

त्या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाचा इतिहासही थोडक्यात सांगितला जातो, त्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराविषयी सांगितलं जातं, पुस्तक ज्या विषयावर लिहिलय त्या विषयावर शेवटी लेखक साधक बाधक भाष्य करतो,

पुस्तकाच्या प्रकाशक, अनुवादाविषयी सांगितलं जातं, आवश्यकतेनुसार मूळ पुस्तकातला एखादा परिच्छेदही दिला जातो, त्या पुस्तकात लेखकानं शिकवलेल्या धड्याविषयी आणि त्यातून आपण घ्यावयाच्या बोधाविषयीही लिहिलं जातं, कारण लेखक संपादक आहेत आणि त्यांच्या डोळ्यासमोर सामान्य वाचक आहे.

लेखकानं निवडलेली सगळी पुस्तकं ही मराठीत अनुवाद झालेलीच आहेत. अनुवाद उपलब्ध नसलेल्या एकाही पुस्तकाविषयी लेखकानं लिहिलेलं नाही. कदाचित लेखकानं मूळ इंग्रजी पुस्तकंही वाचली असावीत. पण सामान्य वाचकाच्या सोयीसाठी मराठी अनुवाद सुचवले असावेत. कारण पुस्तकाविषयी इतर माहिती लिहिताना लेखकाला पुष्कळ इंग्रजी साधनं हाताळावी लागली असणार.

वृत्तपत्रीय मर्यादा आणि समोरचा सामान्य वाचक लक्षात घेऊन हे सगळं चार-सहा पानात बसवलेलं आहे. त्यामुळं हा मजकुर सुटसुटीत आणि चटपटीत, गंभीर आणि गमतीदारही झालेला आहे. म्हणुनच खलील जिब्रानच्या प्रॉफिटवरचा लेख मोठा होतो आहे असं लक्षात आल्यावर त्याचे दोन भाग करावे लागले आहेत.

Vavhanwata
Indrajit Bhalerao Book : 'तुमची आमची माय' ; शेतशिवारात रंगला अनोखा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा

काही लेखांसाठी त्यांनी निवडलेल्या अनुवादापेक्षा त्या पुस्तकाचे उपलब्ध असलेले दुसरे मराठी अनुवाद जास्त चांगले आहेत. थोरोच्या वाॅल्डन या पुस्तकाचा जयंत कुलकर्णी यांनी केलेल्या अनुवादापेक्षा दुर्गाबाईंचा अनुवाद जास्त चांगला वाटतो. द गुड अर्थ या पर्ल बक यांच्या कादंबरीचा भारती पांडे यांनी केलेल्या अनुवादापेक्षा गोमंतक या गोव्यातील दैनिकाचे पहिले संपादक बा. द. सातोसकर यांनी केलेला अनुवाद जास्त चांगला आहे. कदाचित लेखकाला ते अनुवाद उपलब्ध झाले नसतील. कारण ते दूर्मिळ आहेत. वॉल्डनचा दुर्गाबाईंचा अनुवाद आता नव्यानं उपलब्ध झालेला आहे.

पर्ल बक यांच्या द गुड अर्थ या कादंबरीवर लिहिताना जगातील इतर भाषांमध्ये या पुस्तकातल्या कथेवर निर्माण झालेल्या चित्रपटाचे संदर्भ आदिनाथ चव्हाण आवर्जून देतात पण या कथेवर आधारित भारतातही एक चित्रपट निघाला होता आणि तो तुफान चालला होता, चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्याने उलथा - पालथ घडवली होती, हे लिहायला मात्र ते विसरतात. तो चित्रपट म्हणजे मदर इंडिया.

या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक महबूब खान यांनी स्वतःच हे सांगितलेलं आहे, की पर्ल बक यांची द गुड अर्थ ही कादंबरी वाचून मी माझ्या चित्रपट निर्मितीच्या टीममधील कथा लेखकाला या कथेवर आधारित पटकथा लिही असं सांगितलं होतं. तेव्हा औरत हा चित्रपट त्यांनी काढला होता.

रंगीत चित्रपटाचा जमाना आल्यावर त्याच कथेवर त्यांनी मदर इंडिया हा चित्रपट काढला आणि त्याला इतका भारतीय साज चढवला की तो कुठल्या परकीय कादंबरीवर आधारित आहे हे आपल्या लक्षातही येऊ नये.

त्याचप्रमाणे लिओ टॉलेस्टाय यांच्या ॲना कॅरनिना या कादंबरीवर शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेला माया मेमसाब नावाचा एक हिंदी चित्रपट निघाला होता. त्याचाही उल्लेख या पुस्तकातील ॲना कारनिना या कादंबरीवरील लेखात नाही.

या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं त्यामुळं या चित्रपटाची ध्वनिमुद्रिका मी घेतलेली होती. चित्रपट पाहिला नव्हता. पण त्या चित्रपटाच्या वृत्तपत्रीय समालोचनात हा चित्रपट लिवो टॉलेस्टाई यांच्या ॲना कॅरनिना या कादंबरीच्या कथानकावर आधारित आहे असा उल्लेख होता. कदाचित ही सगळी माहिती आदिनाथ चव्हाण यांना नेटवर उपलब्ध झालेली नसावी.

गॉर्कीच्या आई या जगप्रसिद्ध कादंबरीवरही लेखकानं लिहिलेलं आहे. त्या संदर्भातली मराठीतलीही काही उदाहरणं दिलेली आहेत. पण साने गुरुजींची श्यामची आई आणि पुढच्या सगळ्या मराठी आया या प्रामुख्यानं गॉर्कीच्या आईच्या प्रभावातूनच लिहिलेल्या आहेत. याची नोंद मात्र चव्हाण यांनी केलेली नाही.

गाॅर्कीची आई १९१७ साली आली आणि साने गुरुजींची शामची आई १९३६ साली आली. तोपर्यंत गॉर्कीची आई जगभर गाजत होती. साने गुरुजींनी गॉर्की वाचला नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्यांचं जागतिक वाङ्मयाचं वाचन फार अद्ययावत होतं, हे त्यांनी केलेल्या अनुवादावरून आपल्या लक्षात येतं. गाॅर्कीच्या आईचा मराठी अनुवाद प्रभाकर उर्ध्वरेषे यांनी केलेला आहे.

'हरवलेले दिवस - एका माजी कम्युनिस्टाचे आत्मकथन' या गाजलेल्या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विदर्भात अकोल्याकडं ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांचे बंधू बाळ उर्ध्वरेषे हे पत्रकार होते. एकदा इंदूरला त्यांची माझी भेटही झाली होती. तेव्हा या विषयावर आमची बरीच चर्चा झाली होती.

Vavhanwata
Indrajit Bhalerao: `तुमची आमची माय` पुस्तकाचे शेतात प्रकाशन; रानावनातली माय रानावनाला अर्पण...

या पुस्तकातले बहुतेक अनुवाद मेहता आणि मधुश्री या प्रकाशनांनी प्रकाशित केलेले आहेत. या लेखमालेसाठी हेमिंग्वेची दोन पुस्तकं निवडण्यात आलेली आहेत. ते भाग्य अन्य कुठल्याही लेखकाला लाभलेलं नाही. पू. ल. देशपांडे, शांताबाई शेळके, राम पटवर्धन, दि. बा. मोकाशी, त्र्यं. वि. सरदेशमुख, रवींद्र गुर्जर यांच्यासारख्या जुन्या पिढीतील आणि प्रणव सखदेव, अवधूत डोंगरे यांच्यासारख्या नव्या पिढीतील महत्त्वाच्या लेखकांनी यातले काही अनुवाद केलेले आहेत. या जुन्या-नव्या जाणत्या लोकांनी अनुवाद खूप मेहनतीनं केलेले आहेत. बाकी इतर अनुवाद करणारे अनुवादक हे प्रामुख्यानं व्यावसायिक अनुवादक आहेत.

या पुस्तकाचे एकूण चार भाग करण्यात आलेले आहेत. पहिल्या भागाला, 'दो लफ्जों की है दिल की कहानी' असं नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं जागतिक दर्जाच्या प्रेमकथेवर आधारित पुस्तकांचा समावेश आहे.

दुसऱ्या भागाला, 'जिंदगी एक सफर है सुहाना' असं नाव देण्यात आलेलं आहे. यात प्रामुख्यानं जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या कहाण्या सांगण्यात आलेल्या आहेत.

तिसऱ्या भागाला, 'कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता' असं नाव दिलेलं आहे. यात दोन्ही महायुद्धात होरपळलेल्या दुर्दैवी माणसांच्या कहाण्या आहेत. यात प्रामुख्यान दुर्दैव वाट्याला आलेल्या, जगताना येणाऱ्या अडचणीवर मात करून, जगण्यासारखी परिस्थिती नसतानाही जगणं यशस्वी करून दाखवणाऱ्या नायकांच्या कहाण्या सांगण्यात आलेल्या आहेत.

चौथ्या भागाला, 'तोरा मन दर्पण कहलाये' असं नाव देण्यात आलेलं आहे. या भागात प्रामुख्यानं संशोधनात्मक शास्त्रीय पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही मन आणि मानसशास्त्र या विषयावरचा पुस्तकांचा समावेश जास्त आहे.

शेवटच्या पाचव्या भागाला, 'निसर्ग राजा ऐक सांगतो' असं नाव देण्यात आलेलं आहे. यात प्रामुख्यानं निसर्गविषयक पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. फक्त शेवटच्या विभागाला मराठी शीर्षक देण्यात आलेलं आहे. आधीची सगळी शीर्षकं लोकप्रिय हिंदी गीतांची आहेत.

यातल्या बऱ्याच पुस्तकांविषयी मी आधी समीक्षा वाचलेली होती. बऱ्याच पुस्तकांविषयी ईथं नव्यानं वाचायला मिळालं. उदाहरणार्थ या पुस्तकातला पहिलाच लेख रॉबर्ट जेम्स वाॅलर यांच्या मराठीत अनुवादित झालेल्या अद्वैत या प्रेमकथेविषयी आहे. मेहता प्रकाशनानं प्रकाशित केलेला हा ग्रंथ अनिल कुमार मेहता यांनी एकदा कोल्हापूरला त्यांच्या दुकानात गेलो असताना मला आवर्जून दिलेला होता. खूप चांगलं पुस्तक आहे वाचा, असं ते म्हणाले होते. शिवाय ग्रामीण पार्श्वभूमी आहे म्हणून तुम्हाला देतोय, असंही ते म्हणाले होते.

Vavhanwata
Indrajit Bhalerao in Sangola: सांगोल्याचा संतोष जगताप म्हणजे रानकुशीतला लेखक

पण ती कादंबरी माझी शेवटपर्यंत वाचून झालीच नाही. या पुस्तकात त्या कादंबरीविषयी वाचल्यावर मला फार हुरहुर वाटली. मार्जोरी कॅनन यांचं राम पटवर्धन यांनी अनुवादित केलेलं पाडस हे पुस्तक वाचायचं म्हणून मी पाच वेळा विकत घेतलं. पण प्रत्येक वेळी कोणालातरी भेट दिलं. माझं मात्र वाचायचं राहूनच गेलं. त्याची नुकतीच नवी कोरीकरकरीत आवृत्ती मी पुन्हा विकत घेतलेली आहे. पण अजून वाचणं झालेलं नाही. अशा यातल्या अनेक पुस्तकांविषयी सांगता येईल.

या पुस्तकाचे लेखक आदिनाथ चव्हाण हे तसे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळचे बहुदा राजू शेट्टी यांचं हेच गाव असावं. गेल्या पस्तीस वर्षांपासून ते सकाळ समूहाच्या वृत्तपत्रांमधून काम करतात. बातमीदारीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास संपादकापर्यंत झालेला आहे. १९८६ साली साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं कोल्हापूर जवळच्या पन्हाळगडावर झालेल्या नवलेखक शिबिरात आम्ही दोघं तीन दिवस सोबत होतो. त्या शिबिराचा उल्लेख या पुस्तकातही आलेला आहे. मी हे सगळं विसरलो होतो.

मध्यंतरी त्यांनी मला या गोष्टीची आठवण करून दिली. मी लेखन करत राहिलो आणि ते तिकडं वृत्तपत्रसृष्टीत गेले. त्यांचं बहुदा हे पहिलंच पुस्तक असावं. त्यांच्या वाचनाचा आवाका या पुस्तकावरून आपल्या सहज लक्षात येतो. त्या शिबिरात मार्गदर्शन करताना रा. रं. बोराडे सर म्हणाले होते, 'एक वेळ तुम्ही लेखक नाही झालात तरी चालेल पण तुम्ही उत्तम वाचक व्हा' आदिनाथ चव्हाण यांनी बोराडे सरांचं म्हणणं खरं केलं. ते उत्तम नव्हे उत्कृष्ट वाचक झाले. या पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी सांगितलेला त्यांच्या वाचनवाटांचा प्रवास खूपच वाचनीय झालेला आहे. त्यावरून त्यांना सुरुवातीपासून असलेलं वाचनवेडही आपल्या लक्षात येतं.

वृत्तपत्रातल्या लेखनाचा चटपटीतपणा आणि भाषेचा मधुर गोडवा या लेखनात पाहायला मिळतो. वाचनवाटामध्ये ज्या अडतीस पुस्तकांवर आदिनाथ चव्हाण यांनी लिहिलेलं आहे ती सगळी पुस्तकं तर आपण वाचू शकत नाही. पण या एका पुस्तकामुळं आपणाला साहित्यातल्या जागतिक मानदंडाचा परिचय होतो. त्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं. कुणी आपणाला 'गागरमे सागर' आणून देत असेल तर त्याचं आपण नक्कीच स्वागत करायला पाहिजे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com