Indrajit Bhalerao in Sangola: सांगोल्याचा संतोष जगताप म्हणजे रानकुशीतला लेखक

सांगोल्यात पाच वाजता पोहोचताच हॉटेलमधली रूम ताब्यात घेऊन आम्ही हातपाय धुतले, प्रवासाचा थकवा घालवला, आणि लगेच संतोषच्या लोणविर्‍याला जाण्यासाठी निघालो. निघता निघता कडूसं पडलंच.
Indrajit Bhalerao In Sangola
Indrajit Bhalerao In SangolaAgrowon
Published on
Updated on

इंद्रजित भालेराव

Indrajit Bhalerao Article : आपण एखाद्या लेखकाला खूप दिवसापासून ओळखत असतो, भेटत असतो, त्याच्याशी बोलत असतो, त्याने लिहिलेलं साहित्य वाचत असतो. त्यावरून त्याच्या घराची, गावाची आपण एक कल्पना आपल्या डोक्यात तयार करत असतो. पण प्रत्यक्ष आपण जेव्हा त्याचं घर, गाव, घरातली माणसं पाहतो तेव्हा ते आपल्या कल्पनेप्रमाणे असतंच असं नाही. परवा सांगोल्याला ग्रामीण साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून गेलो तेव्हा २७ वर्षापासून ज्याच्याशी माझी मैत्री आहे असा नव्या पिढीचा एक समर्थ कवी आणि लेखक संतोष जगताप याच्या लोणविरे या गावी जाऊन आलो तेव्हा असंच काहीसं घडलं.

संतोष जगताप या दोन शब्दानंतर लोणविरे हे त्याच्या गावाचं नाव तो नेहमीच लिहितो. त्यामुळे बऱ्याचदा तेच त्याचं आडनाव आहे की काय असं वाटत राहतं. पण लोणविरे हे संतोषचं गाव आहे. ते सांगोल्यापासून नवुदहा किलोमीटर पूर्वेला आहे. सांगोल्याच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो. संमेलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे सात तारखेलाच संतोषच्या गावी जायचं ठरवलं.

सांगोल्यात पाच वाजता पोहोचताच हॉटेलमधली रूम ताब्यात घेऊन आम्ही हातपाय धुतले, प्रवासाचा थकवा घालवला, आणि लगेच संतोषच्या लोणविर्‍याला जाण्यासाठी निघालो. निघता निघता कडूसं पडलंच.

Indrajit Bhalerao In Sangola
Indrajeet Bhalerao: पाठीवरून फिरणारा मायचा हात कायम आधाराचा का वाटतो?

इतक्या दिवसानंतर इतक्या नवसासायासानं आपण संतोषच्या गावाला चाललो आहोत तर उजेडी जावं. त्याचं शेत, घर, माणसं सूर्यप्रकाशात डोळा भरून पहावीत म्हणून मी धडपड केली पण नेमकं आभाळ आल्यामुळं आम्ही जाईपर्यंत अंधारून आलेलं होतं.

संतोष सांगोल्याला न्यायला येतो म्हणाला होता पण आजकाल लोकेशन वरून ते गाव, ती जागा गाठनं सहज शक्य आहे. रस्त्यात विचारपूस सुद्धा करावी लागत नाही. त्यामुळे संतोषला लोकेशन पाठवायला सांगून निश्चिंत राहायला सांगितलं होतं.

Indrajit Bhalerao In Sangola
Indrajit Bhalerao : शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल

जत रोड वरून संतोषच्या गावाकडं रस्ता वळल्यानंतर केकताडाची पांदण सुरू झाली. संतोष गावात राहतच नाही. तो शेतातच घर बांधून राहतो. त्या केकताडाच्या पांदणीतून जाताना खरंच आपण एखाद्या आदिम गावाकडं निघालो आहोत असं वाटत होतं. म्हणून संतोष पेडगावकर यांना उतरून काही फोटो काढायला सांगितले.

त्या पांदणीतून गाडी चालवतानाचं चित्रीकरणही त्यांनी केलं. ते चित्रीकरण दुसऱ्या दिवशी माझ्या फेसबुक स्टोरीला टाकलं तर महाराष्ट्रातल्या सात हजार लोकांनी मोठ्या कौतुकानं ते पाहिलं.

पण तिथं स्टोरीला ही कुठली पांदण ? हे कोणतं गाव ? हा कुणाकडं जाणारा रस्ता ? हे काहीच टाकलेलं नसतं. त्यामुळे थोडसं गुढच राहिलं. ते आज या निवेदनानंतर लोकांच्या लक्षात येईल की तो संतोष जगताप लोणविरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता होता.

संतोषच्या गावाकडं आम्ही निघालो तेव्हा सांगोला ओलांडून पाच-सहा किलोमीटर पुढं गेलं की निव्वळ उघडीबोडखी रानं, केकताडाचे बांध आणि निव्वळ कुसळी गवत दिसू लागलं.

ते संतोषच्या शेता, घरापर्यंत तसंच होतं. त्याच्या कवितेत हे सगळं आलेलं आहेच. संतोष वाटच पाहत होता. आम्ही गेलो तेव्हा जो काही थोडाफार उजेड होता त्या उजेडात संतोषच्या घराचे फोटो काढायला आमच्या संतोषला सांगितलं.

आता इथं दोन संतोष झाले, एक आमचे चक्रधारी संतोष पेडगावकर आणि दुसरा संतोष जगताप. आम्ही संतोषच्या आई-वडिलांना बोलत शेतातल्या घराच्या दारात तुळशी वृंदावनाजवळ बाजेवर बसलो.

पाणी घेतल्यानंतर चहा घ्यायचा नाही, लगेच जेवायचय असं सांगितल्यामुळे ताटं वाढेपर्यंत, आहे तेवढ्या उजेडात संतोषचं शेत पाहायचं असं आम्ही ठरवलं. इथं साडेचार एकर शेतात संतोषचा पसारा आहे.

ही सगळी वडिलोपार्जित जमीन संतोषचे वडील कसत आलेले आहेत. सोबत संतोषही रानात राबलेला आहे. हे त्याच्या लिहिण्यातून कळतच. शक्यतो झाडझाडोराच लावलेला आहे. थोडं फार हंगामी पीक घेतलं जातं. हुलगा, कांदा, गहू असं आहे तेवढ्या पाण्यावर थोडं फार पीक घेतलं जातं. बाकी झाडं लावून टाकलीत.

संतोषच्या वडिलांनी शेतात बांधलेलं जुनं घर पडायला आलय. ते घर आता शेतमाल आणि शेतीचे अवजार ठेवण्यासाठी केलय. त्या जुन्या घरासमोरच्या झाडाला सुंदर पार बांधलेला आहे. ते जुनं घर, ते झाड आणि तो पार मला खूप रोमँटिक वाटला. संतोषला विचारलं तर तो म्हणाला दुपारी मी इथंच वाचत बसलेला असतो.

मी स्वप्नात जे जगायचं ठरवलं होतं ते संतोष प्रत्यक्ष जगत आहे. शेतातल्या झाडाखाली बसून तो अजूनही पुस्तक वाचततोय. तो शिक्षक झाल्यानंतर कर्ज घेऊन त्यानं आता नवं एक आधुनिक घर बांधलय. ते नुकतच पूर्ण झालय. त्याच्या अवतीभोवती ही त्यानं झाडं लावलेली आहेत.

Indrajit Bhalerao In Sangola
Indrajit Bhalerao: `तुमची आमची माय` पुस्तकाचे शेतात प्रकाशन; रानावनातली माय रानावनाला अर्पण...

आभाळ आल्यामुळे दारासमोरच्या लाईटला भयंकर किडे जमा झाले होते. त्यामुळे लाईट असूनही आम्हाला सगळे लाईट बंद करून थोडावेळ अंधारात बसावं लागलं. ते सगळे किडे पलीकडच्या शेतातल्या लाईटवर गेल्यावर सगळ्या खिडक्या बंद करून घरातले लाईट लावून आम्हाला जेवावं लागलं.

सोबत वारंवावधानही सुरूच होतं. कितीही नाही म्हटलं तरी संतोषनं आम्हा सगळ्यांचे औपचारिक सत्कार वगैरे केलेच. संतोषचं शेतातलं सुंदर ग्रंथालयही मी आवर्जून पाहिलं. त्यानं मराठी, हिंदीतली सगळी चांगली पुस्तकं विकत घेतलेली आहेत.

बहुतेक सगळी वाचलेलीही आहेत. तो माझ्यासारखा व्यासपीठावर फारसा रमत नाही. कवी असूनही तो काव्यवाचनाच्या नादी लागला नाही. त्यामुळं त्याला फारशी फिरस्ती करावी लागत नाही. म्हणून वाचायला वेळही मिळतो. तो त्या वेळेचा सदुपयोगही करतो. माझं प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक त्याच्याजवळ आहे.

त्यानं ते प्रेमानं जपून ठेवलेलं आहे. कुठं, कधी घेतलं त्याची नोंद प्रत्येक पुस्तकावर त्यानं आवर्जून केलेली आहे. तो सगळा गठ्ठा माझ्यासमोर ठेवून तो म्हणाला, तुम्ही घरी येऊन गेल्याची खूण म्हणून या सगळ्यांवर आता सह्या करा.

संतोष म्हणाला, सांगोल्यासारखं बकऱ्याचं मटण महाराष्ट्रात कुठंच मिळत नाही. मी महानुभाव असल्यामुळं त्याची इच्छा असूनही खास सांगोल्याच्या बकऱ्याचं मटन त्याला करता आलं नाही. त्यामुळं सोबतच्या बबन आणि संतोषवर तसा अन्यायच झाला. तो त्यानं शेवटच्या दिवशी भरून काढला.

संतोषचे वडील या साडेचार एकरात शेती करून आपलं कुटुंब पोसत होते. संतोष नोकरीला लागला आणि याचा घराला मोठा आधार मिळाला. नाहीतर बदलत्या ऋतुमानात या शेतावर एक कुटुंब जगणं मोठी अवघड गोष्ट होती. संतोष एकटाच आहे.

त्याला भाऊ नाही. तीन बहिणी आहेत. तिघिचीही लग्न झालेली आहेत. एका बहिणीचा मुलगा सध्या इथंच आहे. संतोषला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव ओवी आहे.

तेच नाव त्यानं घरालाही ठेवलेलं आहे. संतोषचं कविता लिहिणं बंद असलं तरी कविता वाचनं आणि कविता जगणं बंद नाही. संतोषची मुलगी म्हणजे संत मुक्ताबाई वाटते.

संतोषची आणि माझी भेट २७ वर्षांपूर्वी कोकणात रत्नागिरीला झाली. प्रतिभा संगम या विद्यार्थी साहित्य संमेलनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मी गेलो होतो. संतोष खूप सुंदर कविता लिहायचा. त्याच्या कविता मला खूप आवडायच्या.

तो लिहिलेल्या कविता मला पाठवत राहायचा. त्यातल्या काही ओळी मी सतत माझ्या कार्यक्रमातून सादर करायचो. त्या ऐकणारे त्याचे कोणी मित्र त्याला ते सांगायचे.

पुढं साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानानं त्याचा रानकुस हा कवितासंग्रह निघाला. नंतर त्याला नोकरी लागली आणि तो गुंतला. कविता लेखन कमी झालं.

सात-आठ वर्षांपूर्वी त्यानं मला सांगितलं की सर मी कादंबरी लिहिलेली आहे. त्यानं मला कादंबरीचं हस्तलिखित पाठवलं. ते वाचून मला जमेल तशा सूचना मी त्याला केल्या.

पण कुण्या चांगल्या मार्गदर्शकाला ते दाखव अशी विनंतीही केली. त्याचे मामा शिक्षणतज्ञ नामदेव माळी यांच्यामुळं योगायोगानं राजन गवस याचा आणि संतोषचा संबंध आला.

आणि राजननं त्याला खूप चांगलं मार्गदर्शन करून त्याच्याकडून ती कादंबरी पुन्हा लिहून घेतली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर असलेल्या वीजप्रश्नभोवती ही कादंबरी गुंफलेली होती.

संतोषनं तो प्रश्न त्या कादंबरीत फार चांगल्या पद्धतीने मांडलेला होता. शेतकऱ्यांसमोरचा वीज प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शेजारची राज्य २४ तास मोफत वीज शेतकऱ्यांना देत असताना महाराष्ट्रात मात्र अजूनही काही तास आणि तीही रात्रीच्या वेळीच शेतकऱ्यांना वीज मिळते.

कुणीच न हाताळलेला हा शेतकऱ्यांचा वीजप्रश्न संतोषनं फार ताकतीनं त्याच्या या कादंबरीत हाताळाला. 'विजेनं चोरलेले दिवस' या नावानं तीन वर्षांपूर्वी ती कादंबरी प्रकाशित झाली. तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चांगल्या संस्थांचे दहा-बारा पुरस्कार मिळाले. तीन विद्यापीठानं ती अभ्यासक्रमाला लावली.

आता तिची दुसरी आवृत्ती देखील आलेली आहे. अलीकडच्या काळात नव्या कादंबरीकारांना हे असं भाग्य कमी लाभतं. त्यामुळे आपल्या वाचनात आणि लेखनात संयम आणि सातत्य ठेवून संतोषनं जे कमावलं तसं नव्या लेखकानी करायला हवं, अशी आपली अपेक्षा असते.

संतोष त्याप्रमाणे ते करत गेला. आता नव्या कादंबरीची त्याची जुळवाजुळवा सुरू आहे. सांगोल्याच्या संमेलनाच्या निमित्तानं माझ्या नंतरच्या पिढीचा एक आवडता लेखक, कवी मला आतून बाहेरून पाहता आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com