Indrajit Bhalerao: `तुमची आमची माय` पुस्तकाचे शेतात प्रकाशन; रानावनातली माय रानावनाला अर्पण...

रानावनात आयुष्य घालवलेल्या माझ्या मायचा काल दहावा स्मृतिदिन होता. त्यानिमित्तानं मी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या 'तुमची आमची माय' या ग्रंथाचं प्रकाशन रानावनातच करण्यात आलं.
Indrajit Bhalerao
Indrajit BhaleraoAgrowon

इंद्रजित भालेराव

रानावनात आयुष्य घालवलेल्या माझ्या मायचा काल दहावा स्मृतिदिन होता. त्यानिमित्तानं मी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या 'तुमची आमची माय' (Tumachi Aamchi May Book) या ग्रंथाचं प्रकाशन रानावनातच करण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माझ्या रिधोरा गावाच्या पश्चिमेला अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या कौडगावात माझ्या दोन बहिणी दिलेल्या आहेत. एकीचं नाव वत्सलाबाई आणि एकीचं नाव सरस्वतीबाई.

पण या नावानं त्यांना कुणीच हाक मारीत नाही. किंबहुना त्यांची ही मूळ नावं आहेत हेही त्यांना माहीत नाही. वछुबाई आणि सरसूबाई असंच सगळेजण त्या दोघींना म्हणतात. (Agriculture Rural Story)

खरं तर या दोघी चुलत बहिणी. पण साठसत्तर वर्षांपूर्वी आमच्या संयुक्त कुटुंबात सगळे एकत्रित असताना त्यांचे विवाह झाले. त्या आधीचं त्यांचं बालपणही संगमंगच गेलं.

आणि पुढं एकाच गावात दोघींना दिलं. आमचे मोठे चुलते किशनराव यांची सरसूबाई ही सगळ्यात मोठी मुलगी. सरसूबाई आता ८० वर्षाची आहे आणि वछुबाई ७५ वर्षाची आहे.

दोघीजणी त्या गावात इतक्या एकजीवानं राहतात की दररोज एकमेकींना दिल्याशिवाय कुठलाही पदार्थ खात नाहीत. टरबुजाची एक फोड असेल तर दोघी अर्धीअर्धी करून खातात. इतक्या त्या एकजिवानं त्या गावात राहतात. दिसायलाही दोघी जवळजवळ सारख्याच. एकापेक्षा एक सुंदर.

Indrajit Bhalerao
Maharashtra Rural Story : गावपुढाऱ्यांची गावगुंडी

जेव्हा मी संपादित केलेलं पुस्तक तयार झालं तेव्हा नियोजन असं होतं की परभणीत मोठा कार्यक्रम करायचा. गेल्या अनेक दिवसापासून मी परभणीत काही कार्यक्रम केलेला नव्हता. म्हणून प्रकर्षानं तो करावा असं वाटत होतं.

पण काही अडचणी येत गेल्या आणि मी तो कार्यक्रम रद्द केला. पण अरुण चव्हाळ या माझ्या मित्रानं आग्रह धरला की कार्यक्रम तर झालाच पाहिजे. आणि मग त्याच्याच डोक्यातून विचार पुढे आला की आपण वछुबाईकडं जाऊन तिच्याच शिवारात, तिच्याच हस्ते या पुस्तकाचं अनौपचारिक प्रकाशन करूयात.

मलाही ही कल्पना आवडली. काल अरुण चव्हाळ, त्र्यंबक वडस्कर, बबन आव्हाड, हर्षवर्धन आणि मी कौडगावात गेलो आणि हा अनौपचारिक कार्यक्रम केला. वसमतहुन राजा कदमही आला होता. छगा, अमर, दाजी तर होतेच. जास्त लोक आम्हाला जमवायचे नव्हते.

Indrajit Bhalerao
Indrajit Bhalerao : शेतकरी कीर्तन महोत्सव हे क्रांतिकारी पाऊल

कार्यक्रम अनौपचारिक आहे म्हणून मी कुठलाही उपचार ठेवलेला नव्हता. पण अरुण कुठलाच कार्यक्रम सरळ, साधा होऊ देत नाही.

त्याला जेव्हा कल्पना दिली की माझ्या दोन बहिणी तिथं आहेत आणि दोघींच्याही हस्ते प्रकाशन करूयात, तर त्यानं त्यांच्यासाठी खूप भारीचे दोन जोहड घेतले.

Indrajit Bhalerao
Rural Story : शिवारातले ऋतुचांदणे रक्तात हळुवार उतरत जाण्याइतके दुसरे सुख नाही

दोन सुंदर हारही घेतले. पेढ्यांचा पुडाही घेतला. बऱ्याच दिवसापासून बहिणीचा दिवाळीत प्रचंड व्हायरल झालेला फोटो माझ्या कवितेसह तिला अर्पण करायचा असाही एक उप कार्यक्रम त्र्यंबक वडस्कर आणि बबन यांनी ठरवलेला होता.

दोनही कार्यक्रम पार पाडून बहिणीच्या घरचं रुचकर जेवण करून, तितक्याच रुचकर गुजगोष्टी करून आम्ही परत निघालो.

निघताना बाईनं आमचे दाजी बापूराव भोंग यांचा एक किस्सा आम्हाला सांगितला. अर्थातच तो तिच्या विनोदी स्वभावाचा भाग आहे. पोरांमध्ये उद्या काही कार्यक्रम आहे अशी चर्चा सुरू झाली तेव्हा ते ऐकून दाजींनी बाईला विचारलं की काय कार्यक्रम आहे उद्या ? बाई म्हणाली, 'इंद्रजीत वकिलांना घेऊन यायलाय.

आपल्या फारकतीचं ठरलेलं आहे. तुम्ही तयार राहा. आपणाला उद्या फारकत घ्यायची आहे ?' दाजी म्हणाले, तू तर कवाच खरं बोलत नाहीस. त्यांनी नाद सोडून दिला. आम्ही जेव्हा बाईच्या गावावरून परत निघालो तेव्हा बाई म्हणाली सगळे कार्यक्रम झाले पण मुख्य कार्यक्रम तर राहिलाच !

तेव्हा लगेच दाजी म्हणाले, हो आमची फारकत राहिलीच की. आणि लगेच राजा कदम म्हणाला, मी वकीलपत्र घेऊन आलो होतो. आणि मग सगळ्यांनीच हसून त्याला दाद दिली.

निघताना बाईनं मायची एक आठवण सांगितली. सगळ्या बहिणी शेवटच्या काळात मायजवळ जमा झाल्या तेव्हा, 'माय हाय म्हणून आपण सगळ्या जमतो. नंतर काय खरं ?' असं बहिणींना वाटायचं.

धाकटा हैदराबादला राहतो, मोठा हे जग सोडून गेलेला आणि सगळ्यात मोठा कशाशी काही देणंघेणं नसलेला. म्हणून सगळ्या बहिणी आपापसात चर्चा करत होत्या. ती आईच्या कानावर गेल्यावर आई त्यांना म्हणाली होती, 'तुम्ही काही काळजी करू नका.

माझा इंद्रजीत तुमचं सगळं माहेरपण माझ्यापेक्षाही जास्त चांगलं करील. बाईला आज असं वाटतं की मी मायचा शब्द खरा केला. माझ्यासाठी तो सगळ्यात मोठा आशीर्वाद होता. तेव्हा मायनं दिलेला आणि आता बहिणीनं दिलेला.

मायनंतर आमच्या सगळ्या कुटुंबासाठी ही मोठी बहीणच आता आम्हाला मायच्या जागी आहे. तिचे मायविषयीचे अनुभव सांगायला लावून, त्याचं शब्दांकन करून एक लेख मी या पुस्तकात घेतलेला आहे.

'खोंगा खोंगा साखर' या नावाचा तो लेख मी याआधी फेसबुकवर टाकलाच होता. तो लोकांना प्रचंड आवडलाही होता. विद्यापीठातल्या अभ्यास मंडळांनीही, हा आम्ही पाठ्यपुस्तकात घेऊ का अशी विचारणा केली.

राजा म्हणाला बाई थोड्या शिकल्या असत्या तर त्या नक्कीच सरांपेक्षा कितीतरी मोठ्या झाल्या असत्या. हे खरंच आहे. दिवाळीत तिचा कुंकू लावतानाचा फोटो ज्या प्रचंड गतीनं व्हायरल झाला, महाराष्ट्रातल्या सगळ्या व्हीआयपींनी तो शेअर केला,

तेव्हा माझा कुरुंद्याचा लहाना भाचा विजय त्याच्या आईला म्हणाला होता की, 'मामानं आयुष्यभर लेखनी घासली तरी त्यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी एका रात्रीत मावशीला मिळाली. एका रात्रीत माय महाराष्ट्राची सुपरस्टार झाली' खरंच आहे. बाईमध्ये ती गुणवत्ता होतीच. पण हेही खरं आहे की तिला तेव्हाच्या वातावरणात शिक्षणाची संधी मिळाली नाही.

आजही ती बोलू लागली की कथा किंवा कविताच बोलत असते. तिनं सांगितलेली एका लमान तरुण स्त्रीची कथा माझ्या युट्युब वर मी दोन वर्षांपूर्वी टाकली होती. ती आतापर्यंत पाच लाख लोकांनी पाहिलेली आहे.

माझा स्वतःचा एकही व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला नाही. त्यामुळे राजा कदम म्हणाला ते खरंच आहे की तिला शिक्षणाची संधी मिळाली असती तर ती मोठी कलावंत किंवा लेखक नक्कीच झाली असती.

त्यामुळे मी कितीही मोठ्या माणसाच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं असतं तरी बाईच्या हाताची सर कुणाच्या हाताला आली नसती याची मला खात्री वाटते. त्यामुळे तिच्या हस्ते गावच्या शिवारात माझ्या मायवरच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ही गोष्ट मला कायमच आनंद देत राहील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com