Agriculture Technology : परागीकरणासाठी रोबो, ध्वनिलहरींचा वापर

Experiments with Ultrasound Waves : ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठात हरितगृहातील टोमॅटो पिकामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या अल्ट्रासाउंड लहरींचे प्रयोग सुरू आहेत.
Greenhouse crops with Dr. Vinayak Patil
Greenhouse crops with Dr. Vinayak Patil Agrowon
Published on
Updated on

डॉ. विनायक पाटील, डॉ. प्रशांत बोडके

Agriculture Technology : सर्वच पिकांच्या उत्पादकतेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे परागीभवन. पुंकेसरातील परागकण स्त्रीकेसरातील कुक्षीवर पडण्याची ही प्रक्रिया. जितके जास्त परागीभवन तितकी जास्त फळधारणा आणि उत्पन्न हा साधा सरळ हिशेब आहे. प्रभावी परागीभवन झाल्यास फळांची संख्या तसेच आकार, गुणवत्ता, चव इत्यादी बाबीसुद्धा वृद्धिंगत होतात. अर्थात, त्यासाठी परागीभवन झाल्यानंतर घडणाऱ्या परागकणांचे अंकुरण, बीजांडाचे फलन, बीज आणि फळाचा विकास या सर्व प्रक्रिया पार पडाव्या लागतात.

पण मुळात परागीभवनच झाले नाही, तर पुढच्या प्रक्रिया कशा होणार? त्यामुळे परागीभवन वाढविण्याच्या उपायांवर संशोधन सुरू आहे. अशाच प्रकारचे संशोधन करणारा एक गट वेस्टर्न सिडनी विद्यापीठात आहे. या गटाचे प्रमुख आहेत डॉ. जेम्स कूक. ऑस्ट्रेलियामध्ये परागीभवन अभ्यासाची पायाभरणी डॉ. रॉबर्ट स्पूनर-हार्ट यांनी केली होती. आमच्या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यापीठातील विविध तज्ज्ञांसोबत भेटीगाठी झाल्या. त्यांचे विविध प्रयोग समजावून घेता आले.

Greenhouse crops with Dr. Vinayak Patil
Electricity : दिवाळी साजरी करा; पण वीजसुरक्षेची काळजी घ्या

गुंजन परागीभवनाचा प्रयोग

परागीभवनाची प्रक्रिया घडून येण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. परागकणांचे वहन करण्यात वाऱ्याची मुख्य भूमिका असते. पण त्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे कीटक आणि पक्षीसुद्धा परागीभवन करतात. मधमाश्‍या किंवा मुंग्यांच्या शरीरावर परागकण चिकटून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर पोचतात. परंतु अतिरेकी मानवी हस्तक्षेप आणि जागतिक हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर परागीभवन करणाऱ्या कीटकांची विविधता आणि विपुलता संकटात आली आहे.

त्यामुळे पर्यायी परागीभवक किंवा यांत्रिकी पद्धतीचा अभ्यास करण्यात येत आहे. परागीभवनाचा एक प्रकार म्हणजे गुंजन परागीभवन. काही प्रकारच्या माशा, गांधील माश्‍या, भुंगे प्रत्यक्षात परागकण वाहून नेत नाहीत. मात्र हे कीटक फुलांच्या अवतीभोवती गुंजारव करत असताना कंपने निर्माण होतात. फुलात खोलवर असलेल्या परागदाण्या फुटतात आणि मोकळे झालेले भरमसाठ परागकण त्याच फुलाच्या कुक्षीवर पडतात. अशा प्रकारचे परागीभवन टोमॅटो, वांगी यांसारख्या अनेक पिकात होत असते.

डंखहीन मधमाश्‍यांचा वापर

ऑस्ट्रेलियातील हरितगृहांमध्ये स्ट्रॉबेरी लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या पिकात परागीभवनासाठी विद्यापीठात सुरू असलेल्या प्रयोगात डंखहीन मधमाशी आणि ब्ल्यू बँडेड बी असे दोन प्रकारचे पर्यायी परागीभवनास उपयुक्त कीटक वापरले जात आहेत. डंखहीन मधमाशी म्हणजे घरमाशीपेक्षा लहान असणाऱ्या आणि समूहाने राहणाऱ्या माश्यांचा एक गट. त्यांच्या शेकडो प्रजाती जगभरात आढळतात.

यांचे वैशिष्ट्य म्हणजे मधमाश्यांप्रमाणेच फुलांतील मकरंद आणि पराग गोळा करून त्यापासून मध तयार करतात. हा मध अतिशय औषधी असतो. या मधाला चांगला दर मिळतो. अर्थात, या माशा लहान असल्याने त्यांची पोळीदेखील लहान असतात आणि मधही कमी मिळतो. यांची पोळी शक्यतो झाडांची पोकळी तसेच दगडांच्या खोबणीतसुद्धा असतात. आजकाल या माश्‍यांची पोळी आपल्याला इमारतींच्या भिंती, इतकेच काय रस्त्यावरच्या दिव्यांचे पोकळ खांबामध्येही सापडतात.

अशी ही पोळी अतिशय कुशलतेने पोकळ बांबू किंवा लाकडी खोक्यात काढून घेता येतात. योग्य पद्धतीने काढलेली पोळी आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी ठेवू शकतो. पिकांच्या फुलोरा येण्याच्या कालावधीत ती शेतात ठेवली, तर अर्थातच परागीभवन अधिक प्रमाणात होते. अशी पोळी ऑस्ट्रेलियातील हरितगृहामध्ये वापरली जातात. स्ट्रॉबेरीसारख्या पिकात या डंखहीन मधमाश्‍या खूपच प्रभावशाली आढळून आल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या मकॅडमिया या फळपिकात डंखहीन मधमाश्‍यांची पोळी वापरली जातात. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात आंबा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या बागांमध्ये परागीभवन चांगले होण्यासाठी डंखहीन मधमाश्‍यांचा वापर केला जातो. अर्थात, या बागांमध्ये पारंपरिक मधमाश्‍यांचा उपयोग खूप आधीपासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण त्यासोबतच या डंखहीन मधमाश्‍या कशी भूमिका बजावतात, त्यावर अधिक संशोधन सुरू आहे.

डॉ. विनायक पाटील ९४२३८७७२०६

(डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी) ध्वनिलहरींच्या माध्यमातून परागीकरण

Greenhouse crops with Dr. Vinayak Patil
Agriculture Technology : सूर्यफूल लागवडीचे सुधारित शाश्‍वत तंत्रज्ञान

परागीकरणाचे काम ध्वनिलहरींचा वापर करून करता येईल का? यावर वेस्टर्न सिडनी विद्यापीठात संशोधन चालू आहे. लहरी म्हणजे कंपन. पिकातील फुलोऱ्याचे कंपन झाल्यास परागदाणी फुटण्याची आणि तिच्यातून परागकण मोकळे होण्याची आणि ते त्याच फुलाच्या किंवा इतर फुलांच्या कुक्षीवर पडण्याची प्रक्रिया गतिमान होऊ शकते.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठात टोमॅटो पिकामध्ये निरनिराळ्या प्रकारचे संगीत तसेच अल्ट्रासाउंड लहरींचे प्रयोग सुरू आहेत. ऑस्ट्रेलियात हरितगृहामधील टोमॅटोची उत्पादकता पारंपरिक शेतीपेक्षा सुमारे पाच पट जास्त मिळते. गेल्या काही वर्षांत हरितगृह शेती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने तिथे गुंजन परागीभवन करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. कारण यामुळे खर्चात खूपच बचत होऊ शकते.

दापोली कृषी विद्यापीठातील संशोधन...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये डंखहीन मधमाशांचा वापर हरितगृहातील काकडी तसेच आंबा,काजू पिकात अधिक प्रमाणात परागीभवन होण्यासाठी केला जात आहे. या प्रयोगातील प्राथमिक निष्कर्ष आशादायी असून, सेंद्रिय फळपीक उत्पादनात अशा प्रकारचे नवीन प्रयोग आवश्यक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com