Millet Foods : अन्न म्हणूनच वापरा भरडधान्य‍

Millet Year 2023 : देशात शेतजमिनीचा उपयोग वाहनांच्या इंधनासाठी नव्हे, तर अन्ननिर्मितीसाठी करणेच समंजसपणाचे ठरेल. जैवइंधनासाठी शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात वापरल्याने मातीची धूप, जंगलतोड, खत वाहून जाणे, जमिनी क्षारयुक्त होण्याच्या समस्या वाढीस लागतील.
Millet
MilletAgrowon
Published on
Updated on

अनिल राजवंशी, नंदिनी निंबकर

Millet Crop Production : १९९० च्या दशकाच्या पूर्वार्धात ‘नारी’ने (निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) कर्नाटकातील मैसूर भागात गोड धाटाच्या ज्वारीपासून मद्यार्क निर्मितीसाठी दररोज १० हजार लिटर क्षमतेची आसवनी सुरू करायला मदत केली होती. यासाठी लागणारी सर्व प्राथमिक तयारी करण्यात आली होती, तसेच मधुरा या गोड धाटाच्या ज्वारीच्या संकरित जातीची मोठ्या प्रमाणावर लागवडही करण्यात आली होती.

परंतु १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला मद्यार्काचा राष्ट्रीय कार्यक्रम नसल्यामुळे त्याला मिळणारी किंमत अतिशय कमी होती. आम्ही काळाच्या जवळ जवळ ३० वर्षे आधी होतो. अशातऱ्हेने १९९० च्या उत्तरार्धात आम्ही टाटा केमिकल्स आणि इतर साखर उद्योगांना गोड धाटाच्या ज्वारीवर आधारित मद्यार्क निर्मितीचे संयंत्र उभारण्यासाठी मदत केली. परंतु मद्यार्काला मिळणाऱ्या कमी किमतीमुळे हे प्रयत्न आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरले.

याबरोबरच गोड धाटाच्या ज्वारीपासून गूळ आणि काकवी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम आम्ही चालू ठेवले. या दोन्हींसाठी धाटापासून हिरवी पाने सवळून काढणे हे आवश्यक होते. हे कंटाळवाणे आणि श्रमकेंद्रित काम गोड धाटाच्या ज्वारीपासून गूळ आणि काकवीचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यात सर्वांत मोठा अडसर आहे.

गूळ आणि काकवी बनविण्यासाठी आम्ही स्वयंचलित, बहुइंधन अशी गॅसिफिकेशन प्रणालीही विकसित केली. गोड धाटाच्या ज्वारीची चिपाडे, उसाचा पाला आणि इतर शेतीमालाचे अवशेष यांपासून हे संयंत्र १२० ते ५०० किलोवॉट औष्णिक ऊर्जा बनवू शकते. गोड धाटाच्या ज्वारीच्या सर्व घटकांचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

गोड धाटाच्या ज्वारीपासून काकवी गोड धाटाच्या ज्वारीच्या धाटांतील रसाचा ब्रिक्स १६ ते २१ म्हणजेच उसाच्या रसाइतकाच असल्यामुळे त्यापासून उत्तम काकवी बनवण्याला वाव आहे, असे आम्हाला वाटले. यासाठी आमच्या संस्थेमध्ये काकवी बनवण्यासाठी अर्ध-स्वयंचलित गुऱ्हाळ प्रस्थापित करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांत नारीमधून सुमारे ७ मे. टन काकवी अन्नपदार्थ आणि पोषक द्रव्यनिर्मिती उद्योगांना विकण्यात आली आहे. ही काकवी टिकाऊ असून तिच्यात अॅंटिऑक्सिडंट्स आणि रंगद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. मधाच्या तुलनेत तिच्यात अधिक प्रथिने, ब १, ब २ व क ही जीवनसत्त्वे, आणि कॅल्शिअम, लोह, पालाश आणि स्फुरद यांसारखी आवश्यक खनिजे जास्त प्रमाणात असतात.

सध्या खाद्य उद्योगात या काकवीचा वापर साखर व मध यांना पर्याय म्हणून केला जातो. गोड धाटाची ज्वारी हे बहुउद्देशीय पीक असून, त्याची लागवड मद्यार्क किंवा काकवी उत्पादनासाठी केली तरी शेतकऱ्यांना अन्नासाठी धान्य मिळेल आणि त्याचा पाला आणि चोथा जनावरांसाठी चारा किंवा भूसुधारक म्हणून वापरता येईल. त्यामुळे अन्न का इंधन हा पेचप्रसंग सुटण्यास मदत होईल.

Millet
Grain Storage : शास्त्रीय पद्धतीने धान्य साठवणूक

गोड धाटाची ज्वारी अन्नासाठी, इंधनासाठी नव्हे पेट्रोल आयातीचा खर्च आणि त्यावर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने मद्यार्काचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचा एक महत्त्वाचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू केला आहे. भारत त्याच्या गरजेच्या ८५ ते ९० टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात करतो आणि त्याचा वार्षिक खर्च सुमारे एक लाख कोटी रुपये इतका येतो.

त्यातली बहुतेक आयात ही वाहतूक व परिवहन क्षेत्रासाठी असून, भारताच्या एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी ती २० टक्के इतकी आहे. मद्यार्कात पेट्रोलमधील ऊर्जेच्या सुमारे ६० टक्के ऊर्जा असल्यामुळे त्याच्या पेट्रोलमधील मिश्रणाने इंजिनाचे कार्य आणि ऊर्जा यात घट होते. तसेच वाहनाने आक्रमलेले एकूण अंतरही कमी होते. शिवाय विद्यमान इंजिने अशा विविध इंधनांवर चालण्यासाठी बनवली नसल्यामुळे या मिश्रइंधनांच्या वापराने त्यांचे आयुष्यमान कमी होते, ती खराब होतात.

वाहनाच्या इंधनपुरवठा करणाऱ्या नलिकांमध्येही समस्या निर्माण होतात. तसे पाहिले तर मद्यार्काच्या पेट्रोलमधील २० टक्के मिश्रणाने प्रदूषणाच्या पातळीत विशेष काही फरक पडणार नाही. कारण हवेचे प्रदूषण प्रामुख्याने डिझेल वाहने, शेतात जाळले जाणारे पिकांचे अवशेष आणि बांधकाम उद्योग यांमुळे घडते. तेव्हा पेट्रोलमध्ये मद्यार्काचे मिश्रण करणे हा खनिज तेल आयातीचा खर्च आणि प्रदूषण कमी करणे या दोन्ही कारणांसाठी चुकीचा पर्याय आहे.

जवळच्या पुंजीवादी मित्रांना आणि साखरसम्राटांच्या दबाव गटांना मदत व्हावी, हा त्याचा मुख्य हेतू असून देशाला मदत व्हावी हा नाही. यामुळे उसासारख्या भरपूर पाणी लागणाऱ्या पिकाची लागवड आणखी वाढून पाण्याची समस्या अधिक गहन होईल. यामुळे अन्नासाठी वापरात येणारी भरडधान्ये इंधननिर्मितीकडे वळवण्यात येतील.

Millet
Millets Rate: भरडधान्य पिकांच्या बाजूने अनुकूल धोरण का नाही ?

देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचा उपयोग वाहनांच्या इंधनासाठी नव्हे, तर अन्ननिर्मितीसाठी करणेच समंजसपणाचे होईल. शिवाय जैवइंधनासाठी शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आणण्याने मातीची धूप, जंगलतोड, खत वाहून जाणे आणि जमिनी क्षारयुक्त होण्याच्या समस्या वाढीस लागतील. एका ठरावीक अंतरावर ठरावीक वेगाने एक देह वाहून नेण्यासाठी ऊर्जेच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर मोटारगाडी हे दोन टक्के कार्यक्षमता असलेले यंत्र आहे.

मद्यार्कासारखे महत्त्वाचे रसायन या अकार्यक्षम यंत्रासाठी वापरणे हे अतिशय अनुत्पादक आहे. गतिशीलतेसाठी नवीकरणीय विजेवर चालणारी विद्युतवाहने वापरणे हे अधिक सयुक्तिक आहे. त्यामुळे प्रदूषणही कमी होईल आणि आपल्या आयात खर्चात घट होईल. परंतु मद्यार्काचा वापर रसायन उद्योगात केला पाहिजे. सध्या तो सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीसाठी, औषधनिर्माण, अन्न उद्योगात आणि मद्यार्कयुक्त पेये बनवण्यासाठी वापरला जातो.

याशिवाय आपल्या प्लॅस्टिक व इतर रसायन उद्योगांत खनिज तेलांना पर्याय म्हणूनही मद्यार्काचा वापर करता येईल. इतिहास आणि आहाराच्या स्वरूपावरून असे समजून येते, की भरडधान्ये ही मानवाला ज्ञात असलेली सगळ्यात प्राचीन अन्नपिके असून हजारो वर्षे त्यांची लागवड करण्यात येत आहे.जगभरात ज्वारी हे पाचवे सर्वाधिक उत्पादित धान्य पीक असून, भारतात ते चौथ्या क्रमांकावर येते.

त्याच्या धान्यात बीटा कॅरोटीन, फोलिक अॅसिड, तंतुमय पदार्थ, थायामिन व रिबोफ्लेविन असल्यामुळे ते भातापेक्षा पोषणमूल्यांच्या दृष्टीने अधिक चांगले आहे. भविष्यात पौष्टिक धान्य आणि काकवी या दोन्हींचा पुरवठा करू शकेल, अशी गोड धाटाची ज्वारी ही मानवी अन्नासाठी वापरली जावी आणि इंधनासाठी नव्हे.

(अनिल राजवंशी ‘नारी’चे संचालक, तर नंदिनी निंबकर अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com