डॉ. प्रशांत उंबरकर, डॉ. उषा.आर. डोंगरवार
Scientific Method of Grains Storage : आपल्याकडे साठवलेल्या धान्याचे किडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. धान्य साठवणुकीत होणाऱ्या नुकसानीपैकी मुख्य नुकसान किडी आणि उंदरामुळे होते. किडींच्या प्रादुर्भावाची सुरुवात कणसांवर किडींनी दिलेल्या अंड्यापासून, खळ्यापासून, साठविलेल्या जुन्या धान्यापासून, वाहनाद्वारे आणि पोत्यातून होतो.
या मध्ये प्रामुख्याने भुंगे वर्गीय व पतंग वर्गीय किडींचा समावेश होतो. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रभावीपणे नियंत्रण होते.
भुंगेवर्गीय किडी
सोंडे
ही कीड गहू, मका, ज्वारी, तांदूळ इत्यादी तृणधान्यातील प्रमुख कीड आहे. किडींचा प्रौढ (सोंडा) आणि अळी दाणे पोखरून नुकसान करते. प्रौढ गर्द तपकिरी किंवा काळा असून त्याचे तोंड लांबट निमुळते असते. त्याला सोंड असे म्हणतात. सोंड्याची लांबी १ ते ३ मिमी असते.
अळी काळसर किंवा पांढऱ्या रंगाची असून, पाठीवर चार फिक्कट पिवळे पट्टे असतात. किडीचा जीवनक्रम एक ते दीड महिन्यात पूर्ण होतो. या किडीचा प्रादुर्भाव शेतातून म्हणजेच पक्व होणाऱ्या दाण्यातून सुरू होतो.
खपरा भुंगा
ही कीड प्रामुख्याने साठवलेल्या गव्हात आढळून येते. या किडीची अळी दाण्याचे नुकसान करून बियाण्याचा अंकुर खाते. त्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
प्रौढ २ ते ३ मिमी लांब असून त्याचा रंग पांढुरका बदामी असतो. अंगावर लालसर केसाचे झुपके असतात. किडीचा जीवनक्रम २ ते ९ महिन्यांत पूर्ण होतो.
कडधान्यावरील भुंगेरा
ही कीड मुख्यतः तूर, मूग, उडीद, चवळी, हरभरा इत्यादी कडधान्यामध्ये आढळते. या भुंगेऱ्याची अळी दाणे पोखरून उपजीविका करते.
भुंगेरे ४.५ मिमी लांब असून हृदयासारख्या आकाराचे असतात. भुंगेऱ्याच्या पाठीवरील मध्यभागी दोन फिक्कट पांढरे ठिपके असतात. ही कीड २५ ते ४० दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करते.
किडीचा प्रादुर्भाव शेतातून सुरू होत असल्याने साठविलेले कडधान्य आणि बियाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
दातेरी भुंगा
ही कीड गहू, बाजरी, इत्यादी तृणधान्यांचे फुटके दाणे व पिठावर जागते.
प्रौढ किडीच्या शरीरावर दोन्ही बाजूंनी दाता सारखी रांग असून हिचा रंग पांढरा असतो. ही कीड ४० ते १२० दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करते.
पतंगवर्गीय किडी
दाण्यावरील पतंग
ही कीड प्रामुख्याने भात, ज्वारी तर कधी कधी गव्हात आढळते. या किडीचा रंग पिवळसर तपकिरी, पंख लांबट व लांबी १ ते २ सेंमी. असते. अळीचे डोके पिवळे असून रंग पांढुरका असतो.
अळी दाण्यात राहून धान्य पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव शेतातून होतो. किडीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यात पूर्ण होतो.
तांदळावरील सुरसा/पतंग
या किडीचा प्रौढ करड्या तपकिरी रंगाचा असून लांबी २ ते ३ सेंमी असते. पूर्ण वाढ झालेली अळी मळकट पांढऱ्या रंगाची असते.
सुरुवातीस लहान आळी फुटके दाणे व पीठ खाते. मोठी आळी अखंड दाण्याचे भक्षण करते. ही आळी तोंडाद्वारे धागे काढून फुटके दाणे किंवा पिठाच्या भोवती जाळे तयार करून त्यातच कोषावस्थेत जाते.
किडीचा जीवनक्रम ६० ते ८० दिवसात पूर्ण होतो. ही कीड तांदूळ, ज्वारी, बाजरी, पीठ, रवा,मैदा इत्यादीवर उपजीविका करून नुकसान करते.
कोळी
कोळी ओल्या धान्यावर उपजीविका करतो. याच्या प्रादुर्भावामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
उंदीर
उंदीर मोठ्या प्रमाणात धान्याचे नुकसान करतात. उंदीर हे खाण्यापेक्षा अकरा पटीने धान्याचे नुकसान करतात.
साठवणुकीतील धान्याचे संरक्षण
बियाणे मळणी करण्यासाठीचे खळे कोठारपासून लांब अंतरावर असावे.
बियाणे साठवणुकीपूर्वी कडक उन्हात वाळवावे.
बियाणे साठविण्यापूर्वी रिकामी पोती, कणग्या, साठविण्याची जागा व्यवस्थित साफ करून कीड विरहित करावी.
साठवणुकीच्या जागेतील भिंतीचे छिद्रे व भेगा सिमेंटच्या साहाय्याने बुजवून घ्याव्यात.
साठवणुकीच्या जागेतील उंदराची बिळे सिमेंटच्या साहाय्याने बुजवून घ्यावीत.
खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या लावाव्यात.
बियाणे साठविण्यासाठी शक्यतो नवीन गोण्या /पोते वापरावे.
गोण्या /पोते गरम पाण्यात ५० अंश सेल्सिअस तापमानापेक्षा अधिक १५ मिनिटे भिजवून नंतर सुकवून वापरावे.
उघड्या धान्यावर कीटकनाशकाची फवारणी करू नये.
धान्याची पोते लाकडी फळ्या किंवा बांबूच्या काठ्यावर भिंतीपासून ३ फूट लांब अंतरावर ठेवावेत.
साठवणुकीच्या जागेतील परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
पावसाळ्यात बियाणे हवाबंद ठिकाणी ठेवावे.
उन्हाळ्यात बियाणे मोकळी हवा मिळेल असे ठेवावे.
पावसाचे पाणी साठवणुकीच्या जागेमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी.
कडुनिंबाचा पाला, बियांची पावडर आणि तेलाचा उपयोग किडींना प्रतिबंधात्मक आणि खाण्यास विरोध करणारा आहे.
कडधान्यातील भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी पावडरीची (५ टक्के) बीज प्रक्रिया उपयुक्त आहे.
सोंडे या किडीसाठी हळदीची पावडर ३.२५ ग्रॅम किंवा वेखंड पावडर १० ग्रॅम प्रती किलो बियाणे प्रक्रिया फायदेशीर ठरते. (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस.)
बियाणे साठवणुकीस उत्तम पर्याय म्हणजे धातूच्या पत्र्याच्या कोठ्यांचा वापर करावा.
धुरीजन्य औषधे :
अॅल्युमिनियम फॉस्फाईडच्या ३ ग्रॅम वजनाच्या ३ गोळ्या प्रती टन कोठारातील बियाण्यास किंवा १५० ग्रॅम पावडर १०० घन मिटर जागेसाठी किंवा १० ग्रॅम पाऊच प्रति टन बियाण्यासाठी किंवा १५० ग्रॅम पावडर प्रति १०० घन मिटर जागेसाठी ५ ते ७ दिवस संपर्कात ठेवल्यास किडी नष्ट होतात. (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस.)
टीप : धुरीजन्य कीटकनाशके वापरताना योग्य काळजी घेऊनच वापर करावा.
धान्य आणि बियाणे सुरक्षित साठविण्यासाठी उपाय :
बियाणे/ धान्य उन्हामध्ये वाळवून (ओलावा ८ टक्के पेक्षा कमी) ते हवेशीर साठवावे.
धान्य आणि बियाणे साठविण्यासाठी बांबू किंवा पॉलिथीनच्या तळवटाचा वापर करावा.
धान्य आणि बियाणे साठविण्यासाठी आधुनिक हवाबंद कोठ्यांचा वापर करावा.
कीड नियंत्रणासाठी धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा.
शेतातील उंदरांच्या नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करावा. याकरिता ३८० ग्रॅम भरडलेले गहू/ज्वारी/ मका धान्य अधिक १० मिलि गोडेतेल (शेंगदाणा किंवा जवस तेल) अधिक १० ग्रॅम झिंक फॉस्फाइड (८०%) पावडर मडक्यात घालून काडीने चांगले ढवळावे.
अशा विषारी आमिषाच्या लहान प्रत्येकी १० ग्रॅमच्या गोळ्या तयार कराव्यात. गोळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून त्या सीलबंद करून एक प्लॅस्टिकची १० ग्रॅमची आमिषाची पिशवी एका बिळात ठेवावी. शेतामध्ये साधारणतः १० ग्रॅम झिंक फॉस्फाइड पावडरपासून बनविलेले आमिष ४० बिळांना पुरेसे आहे. (डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस.)
डॉ. प्रशांत उंबरकर, ८२०८३७९५०१
(कृषी विज्ञान केंद्र, साकोली, जि.भंडारा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.