Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी बळाचा वापर

Land Acquisition Protest: भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी राज्यभरात भूसंपादन सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असून, सरकारने पोलिस बंदोबस्त आणि बिनतारी आदेशांद्वारे प्रतिकार मोडून काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर संघर्ष पेटला आहे.
Land Acquisition
Land AcquisitionAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गाचे राज्यात ठिकठिकाणी भूसंपादन सुरू आहे. मात्र त्याला शेतकरी विरोध करत असून तो मोडून काढण्यासाठी महसूल विभागाच्या दिमतीला पोलिसांची कुमक दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा रोष असून पोलिसांकरवी हा विरोध मोडून काढण्याचे आदेशच दिले आहेत. शक्तिपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी असा ८०२.५९२ किलोमीटर लांबीचा देवस्थानांना जोडणारा महामार्ग हा भाजप सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते विकास महामंडळ हा प्रकल्प राबवीत असले तरी वर्ल्ड बँकेकडून ८६ हजार कोटींच्या कर्जाऊ रकमेतून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

मात्र प्रति किलोमीटर येणारा खर्च हा अव्वाच्या सव्वा असल्यााचा आरोप विरोधक करत आहेत. पहिल्या टप्प्यात भूसंपादनासाठी १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चात प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्याने या मार्गाचे भूसंपादन होण्याचा मार्ग खुला झाला आहे. बाधित शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या किती पट भाव मिळणार या बाबत अद्याप निर्णय झाला नसला, तरी भूसंपादन कायद्यानुसार पाच पट मोबदला दिला जाईल, असे सांगितले जात आहे.

सध्या तरी हा मार्ग पवनारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत करायचाच असा सरकारचा हट्ट आहे. त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. या महामार्गात येणाऱ्या १२ जिल्ह्यांतील ३७० गावांपैकी ३०० गावांतील जमिनींच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे फी भरण्यात आली आहे. १११ गावांमधील जमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून तारखा निश्‍चित केल्या आहेत. यानुसार भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३७० गावांपैकी ८२ गावांतील भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. आता उर्वरित ठिकाणी शेतकऱ्यांनी कडवा विरोध केला आहे. मात्र जेथे भूसंपादनाच्या तारखा दिल्या आहेत तेथे पोलिस बंदोबस्त पुरवावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यभरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Land Acquisition
Shaktipeeth Highway Funding: शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठी १२ हजार कोटींची तरतूद करा

बंदोबस्तासाठी बिनतारी संदेश

शक्तिपीठ महामार्गासाठी जेथे मोजणी व सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे तेथे बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे. त्यानुसार बिनतारी संदेश देत बंदोबस्त पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा बंदोबस्त पुरविण्याआधी मोजणी क्षेत्राची पाहणी करून संबंधित विभागाकडून कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे का हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जर कामास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन समजूत काढावी, असेही आदेशात म्हटले आहे.

गृह विभागाने कुमक उपलब्ध करून दिल्याने ठिकठिकाणी शेतकरी विरुद्ध पोलिस असा संघर्ष सुरू झाला आहे. बुधवारी (ता. २५) धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला तर काही शेतकऱ्यांची धरपकडही केली. राज्य सरकार कोल्हापूर आणि सांगली जिल्हा वगळता अन्य ठिकाणी विरोध नाही, असे सांगत असले तरी शेतकऱ्यांचा सर्वच जिल्ह्यांत विरोध तीव्र झाला आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद तोकडी

राज्यात सध्या सर्वत्र बांधकामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात रस्ते विकास महामंडळाकरिता १४५७ कोटी, राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकरिता १००० कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकरिता १७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. सध्या हाती घेतलेले प्रकल्पांसाठी घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड हा विभाग अर्थसंकल्पीय तरतुदीत करू शकणार नाही, असे वित्त नियोजन विभागाने वेळोवेळी कळविले आहे. या प्रकल्पांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून इक्विटीसाठी निधीची मागणी वाढणार आहे. तसेच कर्जाच्या मुद्दल व व्याजाच्या परतफेडीकरिता राज्यावर मोठा आर्थिक भार येणार असल्याचेही वित्त विभागाचे म्हणणे आहे.

Land Acquisition
Shaktipeeth Highway: पवनार ते कोल्हापूर पर्यंतच्या ‘शक्तिपीठ’वर शिक्कामोर्तब

भूसंपादन बंद पाडले

शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणची भूसंपादन बंद पाडले आहे. धाराशीव, नांदेड, सांगलीसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची धरपकड केली असून काहींना ताब्यात घेतले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना विनंती करत मोजणीस मज्जाव केला. काही ग्रामपंचायतींनी ठराव करून विरोध दर्शविला आहे.

काहीही झाले तरी संयुक्त मोजणीला आमचा विरोध कायम राहील. सरकार विरोध नसल्याचे सांगत असले तरी आम्ही एक इंचही जमीन मोजू दिलेली नाही. पोलिस बाळाचा वापर करून जेलमध्ये टाकतील, मारहाण करतील पण शेतकऱ्याची एकी आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत एका जिद्दीने लढा देऊ.
संतोष ब्याळे, जवळा, लातूर (बाधित शेतकरी)
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पोलिसांना घाबरू नये. मोजणीला येणारे अधिकारी सोबत पोलिस आणतात ते त्यांच्या स्वसंरक्षणासाठी. शेतकऱ्यांवर कुठलाही दमदाटी करण्याचा, दबावाखाली घेण्याचा, जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही. मतभेद विसरून विरोध करत राहू.
गजेंद्र येळकर, शेतकरी
शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ थोपवणे अन्यायी आहे. शेतकऱ्यांचा विरोध नाही असे सांगून भूसंपादन रेटणे चुकीचे आहे. या महामार्गाला विरोध कायम राहील.
सतेज पाटील, विधानपरिषद गटनेते, काँग्रेस
मराठवाड्यातील रझाकार गेले असे वाटत होते. मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी नवे रझाकार आले आहेत. या महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च पाहिला तर कुणाच्या हट्टासाठी आणि पोटासाठी तो केला जात आहे हा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि तो कायम राहील.
ओमराजे निंबाळकर, खासदार, धाराशिव
शेतीमाल वाहतूक आणि निर्यातीसाठी हा महामार्ग गरजेचा आहे. माझ्या मतदारसंघातील महागाव या गावातील शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. शेतकरी बाजूने आहेत. केवळ त्यांच्याशी सरकारी प्रतिनिधीने चर्चा करावी इतकीच त्यांची इच्छा आहे.
इंद्रनील नाईक, राज्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com