
सुनील चावके
India-Pakistan Tension: पहलगाममध्ये सव्वीस निरपराध पर्यटकांची बावीस एप्रिलच्या दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली, या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले. या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा परिणाम देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या कोट्यवधी पर्यटकांच्या मानसिकतेवर झाला. काश्मीर खोऱ्यात आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पर्यटकांना क्वचितच लक्ष्य केले गेले होते. त्यामुळे पर्यटकांचे मनोबल खचणे स्वाभाविकच होते. आता ते पुनर्स्थापित करणे हे मोठे आव्हान आहे. बरोबर दोन महिन्यांनी पहलगामच्या चार दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा होऊन त्यातील पाकिस्तानची भूमिका स्पष्ट होण्यास हातभार लागणार आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सकृतदर्शनी दिसत असले, तरी दहशतवादी आपला कार्यभाग साधून पसार झाल्यामुळे मोदी सरकारला दोन-तीन आघाड्यांवर प्रश्नांचा सामना करावा लागत होता. पाकिस्तानच्या सीमांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असताना दहशतवादी भारतात शिरलेच कसे? जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक उधळून लावण्यासाठी शेकडो दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती होती. पण विधानसभा निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर त्यांना हुडकून काढण्याची मोहीम थंड का झाली?
पर्यटनाच्या मोसमात संवेदनशील पर्यटनस्थळांवर आवश्यक सुरक्षा जवान तैनात का करण्यात आले नाही? ही संधी साधून दहशतवाद्यांनी पहलगामचे निर्घृण हत्याकांड घडविले. भारताने या दहशतवादी कारवायांना जरब बसावी म्हणून पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ची लष्करी कारवाई केली. पण पहलगामच्या हल्ल्याची काही मिनिटांतच माहिती मिळूनही दहशतवाद्यांना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी का ठरली, आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले.
अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच पहलगामची घटना घडल्यामुळे यात्रेकरू आणि काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होणे स्वाभाविक होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या लष्कराने पूंछ आणि अन्य सीमावर्ती भागांमधील नागरिकांनाच लक्ष्य केल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन आता सहजासहजी पूर्वपदावर येणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. वादळी आणि प्रतिकूल हवामानाचा अपवाद वगळता आता काश्मीर हे बारमाही पर्यटनाचे केंद्र बनले आहे. त्याची झलक जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या वर्षी सव्वा दोन कोटी पर्यटकांनी केलेल्या गर्दीतून मिळाली. पण भरभराटीला आलेल्या या पर्यटन व्यवसायाला पहलगामच्या हल्ल्याने दृष्ट लावली.
पहलगामच्या हल्ल्यानंतरच्या दोन महिन्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर दहशतवादामुळे यंदाचा पर्यटनाचा मोसम संकटात सापडला. उन्हाळ्याच्या मोसमात लाखो पर्यटकांनी गजबजलेल्या काश्मीर खोऱ्यात गेल्या दोन महिन्यांपासून शुकशुकाट पसरला. बहुतांश पर्यटकांनी २२ एप्रिलनंतर काश्मीरला जाण्याचा बेत तत्काळ रद्द केल्यामुळे हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जम्मू आणि काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० काळाच्या ओघात क्षीण झाले होते. पण ते पूर्णपणे हटविण्याचे धाडस मोदी सरकारने दाखविले. त्यामुळे स्थानिक काश्मिरींच्या मनात काहीसा रोष निर्माण झाला. त्याची भरपाई पर्यटकांच्या संख्येत होणाऱ्या अभूतपूर्व वाढीमुळे स्थानिक काश्मिरींच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक स्थैर्यामुळे होऊ लागली होती.
काश्मीरची ऊर्जितावस्थेकडे वाटचाल होत असतानाच पहलगामची घटना घडली. जम्मू आणि काश्मीरमध्ये लाखोंच्या संख्येने जवान तैनात करूनही हजारो पर्यटकांच्या आकर्षण केंद्र बनलेल्या पहलगामला किमान सुरक्षा प्रदान न केल्याने मोदी सरकारने गेल्या काही वर्षात केलेल्या सकारात्मक बदलांवर एका घटनेने पाणी फेरले. या घटनेचे देशभर आणि जगभर तीव्र पडसाद उमटणे स्वाभाविक होते.
राष्ट्रीय तपास संस्थेने पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना आश्रय आणि हरतऱ्हेची मदत देणाऱ्या परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर नावाच्या दोन स्थानिक काश्मिरी संशयितांना दोन महिन्यांनंतर का होईना, अटक करण्यात यश मिळविले हे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे मुंबईच्या २६/११ च्या हल्ल्याप्रमाणेच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे छुपे पाठबळ लाभले होते, याचे पुरावेही आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर तसेच भारतातील विरोधी पक्षांसमोर मांडणे शक्य होणार आहे.
चकचकीत रस्ते
लाखो कोटींचे चकचकीत रस्ते आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या बोगद्यांचे बांधकाम करून काश्मीर खोऱ्याच्या पर्यटन आकर्षणात बारमाही भर घालण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय अखंडपणे करीत आहे. काश्मिरींची जीवनरेखा ठरलेल्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पायाभूत सुविधांच्या वेगवान आणि शाश्वत विकासासाठी मोदी सरकारने अनेक प्रकल्प पूर्णत्वाला नेले. कटरा-श्रीनगर रेल्वेमार्गावरील चिनाब रेल्वे पुलाचे १९ एप्रिलला हुकलेला उद्घाटनाचा मुहूर्त पंतप्रधान मोदी यांनी सहा जून रोजी साधला.
पहलगामच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी काश्मीर खोऱ्याला भेट का दिली नाही, याचे उत्तर त्यातून विरोधकांना मिळाले. जगातील सर्वांत उंच ३५९ मीटरच्या या पुलावरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ गाडीमुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेने थेट श्रीनगर गाठण्याची सुविधा मिळाल्याने पर्यटकांचा ओघ पुन्हा काश्मीरकडे वळला आहे. अमरनाथ यात्रा आणि काश्मीरचा उन्हाळ्यातील पर्यटन मोसम संपण्यापूर्वीच हा विश्वास हळूहळू परत येऊ लागल्यामुळे सुरक्षा कारणांमुळे बंद करण्यात आलेल्या काश्मीर खोऱ्यातील ४८ पर्यटनस्थळांपैकी १६ पर्यटनस्थळे पुन्हा खुली करण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतला.
पहलगामच्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध करणाऱ्या काश्मीर जनतेचा विश्वासही महत्त्वाचा आहे, याची जाणीवही सरकारला ठेवावी लागेल. पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि अहमदाबादमधील विमान दुर्घटना यामुळे प्रवासी आणि पर्यटकांचे मनोधैर्य खचले आहे. तरीही लाखो पर्यटक पुन्हा काश्मीर खोऱ्याकडे नव्याने आकर्षित झाले आहेत. यापुढे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान प्रामुख्याने मोदी सरकारपुढे आणि तेथील राज्य सरकारपुढेही असेल.
(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.