
डॉ. रवींद्र सातभाई
पळस वृक्षाच्या आकर्षक नारिंगी फुलांमुळे जंगलातील ज्वाला म्हणून ओळखले जाते. याची पाने, फुले विविध औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात. दरवर्षी पळसाला फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये फुले लागतात.
पळस फुलांवरील प्रक्रियेतून आर्थिक फायदा होऊ शकतो का ? याबाबत यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र सातभाई यांनी संशोधन केले.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे आर्थिक अनुदान मिळाले आहे. पळस फुलांपासून हर्बल चहा आणि सरबत निर्मितीचा मूल्यवर्धन प्रकल्प २०२२ पासून यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये सुरु झाला.
या प्रकल्पातील संशोधनातून हर्बल चहा आणि सरबताची निर्मिती झाली आहे. पळस फुलांपासून हर्बल चहा आणि सरबत निर्मितीमधून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पास डॉ.शरद गडाख (कुलगुरू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ), डॉ.एस.एस.माने अधिष्ठाता (कृषी), डॉ.विलास खर्चे (संशोधन संचालक), डॉ.सी.डी.मायी (संचालक, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग,मुंबई) आणि डॉ.नरेंद्र शहा (सचिव, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग,मुंबई) तसेच डॉ.कुलदीपसिंह ठाकूर (माजी सहयोगी अधिष्ठाता) यांचे प्रोत्साहन मिळाले. या प्रकल्पामध्ये रवींद्र सातभाई यांच्यासोबत डॉ.संदेश बांगर, रोहन राठोड हे काम पाहत आहे.
वृक्षाची ओळख
पळस/पलाश (Butea Monosperma (Lam.)Taub) ः देशाच्या जैवविविधतेतील महत्त्वाचा वृक्ष.
पळसाला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. कारण फुलांचा केशरी-लाल रंग अग्नी सारखा भासतो.
प्राचीन काळापासून पर्यावरण, औषधी, आर्थिक आणि धार्मिक महत्त्वामुळे हे झाड स्थानिक जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग.
विदर्भात बैल पोळा,अक्षय तृतीया आणि होळीच्या दिवशी पळसाच्या झाडाची फांदी घराबाहेर ठेवण्याची प्रथा.
होळी, रंगपंचमीसाठी पळसाच्या फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरण्याची परंपरा. पळस फुलांपासून तयार केलेला रंग त्वचेसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक.
पळसाचे फूल पक्षी, कीटक आणि मधमाश्यांसाठी आश्रयस्थान. परागीभवनात मोठा वाटा.
जमिनीची धूप रोखण्यासाठी उपयुक्त वृक्ष.
उपयोग
झाडावर लाखेचे किडे संगोपन करून लाख निर्मिती. फुले नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वापरतात.
पाने पत्रावळी तयार कारणासाठी वापरतात.
आयुर्वेदात पाने, फुले आणि बिया विविध रोगांवर उपचार करण्यासाठी महत्त्वाचा घटक. त्वचा रोग, संसर्ग आणि पचनाच्या समस्यांवर उपचारासाठी महत्त्वाचे झाड.
आयुर्वेदानुसार फुले, पाने, बिया आणि सालीमध्ये औषधी गुणधर्म. अतिसारविरोधी, परजीवी विरोधी, मधुमेह नियंत्रक, ताण कमी करणारे, यकृताचे संरक्षण करणारे बुरशीविरोधी, दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म.
रासायनिक घटक
ब्युट्रीन : हे अल्कलॉइड आहे, याचे औषधी गुणधर्म आहेत. मुख्यतः तणाव कमी करणे आणि मानसिकता सुधारण्यासाठी उपयुक्त. यामुळे शरीरातील दाहक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत.
आयसोब्युट्रीन ः हे अल्कलॉइड शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवण्यास मदत करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, पेशींना मुक्त-कणांपासून संरक्षित करतात.
कोरीओपोसीन ः हे फ्लेवोनॉइड त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्याला साहाय्य करण्यास मदत.
सल्फुरेन ः अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म. शरीरातील सूज कमी करणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त.
हर्बल चहा, सरबत निर्मितीला चालना
संशोधन प्रकल्पामध्ये पळस फुलांचा वापर करून ‘ट्रेझर हर्बल’ चहा तसेच काढायुक्त पेय तयार करण्यात आले. हा चहा ‘ग्रीन टी’ साठी एक उत्तम पर्याय आहे. पळस फुलांचा चहा आरोग्याच्यादृष्टीने उपयुक्त आहे. यामध्ये नैसर्गिक गोडसरपणा आहे.
त्यामुळे खास चव येते. पळस हर्बल चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लॅवोनॉइड्स आहेत. हे घटक पचन सुधारणा, ताण तसेच रक्तात वाढलेली साखर कमी करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास साहाय्य होते. शरीराला ऊर्जित ठेवण्यास मदत होते.
पळस फुलांचा चहा
प्रकल्पामध्ये पळस फुलांच्या बरोबरीने इतर घटक वापरून चार प्रकारचा चहा तयार करण्यात आला आहे. आकर्षक पाउचमध्ये डीप प्रकारामध्ये चहा उपलब्ध आहे. पाणी गरम करून त्यामध्ये पाच मिनिटे ट्रेझर हर्बल चहाचे डीप सॅचे बुडवावेत. त्यानंतर या चहाचा आस्वाद घेता येतो.
हर्बल पेय निर्मिती प्रक्रिया पाकिटावर चित्रामार्फत दाखविण्यात आली आहे. हे पेय गरम किंवा गार झाल्यावर प्यायले तरी चालते. यामध्ये साखर आणि दूध मिसळण्याची गरज नाही.
सरबत २०० मिलि प्लॅस्टिक (पेट बाटली) बाटलीमध्ये पॅक केले आहे. हे तयार करताना अन्न सुरक्षेची मानके पाळण्यात आली आहेत.
पळस फुले आणि द्राक्षापासून वाइन
प्रकल्पात प्रायोगिक तत्त्वावर पळस फुले आणि द्राक्षापासून तयार करण्यात आलेल्या वाइन या उपपदार्थास २०२४ मध्ये ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील आंतरराष्ट्रीय परिसंवाद सादर करण्यात आले. या शोध निबंधास प्रथम प्रमाणपत्र मिळाले आहे.
- डॉ. रवींद्र सातभाई, ९९६०५२०१२७
(प्रकल्प प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक, वसंतराव नाईक शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.