Palas Flower : उन्हात फुलणारा रंगीत बहुगुणी पळस

Article by Dinkar Gulhane : पळस बहुगुणी, औषधी आहे. त्याच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण निर्मिती करून अल्पभूधारक आदिवासींनी रोजगाराचे साधन निर्माण केले आहे.
 Palas Flower
Palas FlowerAgrowon

Palas Tree Benefits : फेब्रुवारी-मार्च आला की वसंत ऋतूची चाहूल लागते. गुलमोहर बहरतो. काटेसावर फुलांनी सावरते. आंब्याचा मोहर दरवळतो. सृष्टीतील ऋतू-गंध बहरला की मनातला ऋतूही नकळत आनंदित होतो. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराच्या चहूबाजूला डोंगरघाट आहेत.

त्यांच्या दुतर्फा रानवाटांमधून आपल्याच नादात फुललेला पळस दिसतो. त्याच्या अंगाखांद्यावर सजलेला केशरी फुलांचा सोहळा पथिकांना संमोहित केल्याशिवाय राहात नाही. वनराजीने आलिंगन दिलेला हा निसर्गरम्य परिसर मनाच्या गाभाऱ्यात केव्हा शिरतो हे कळतच नाही.

जगावे तर केसुल्यासारखे

खडक फोडून पळस असा काही फुलतो की आसमंत अग्निज्वालांनी लपेटून गेल्याचा भास होतो. म्हणूनच त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ म्हणतात. निसर्ग, पळसाकडून शिकण्यासारखे खूप आहे. सुख-दुःख आयुष्यात ऋतूंप्रमाणे येते- जाते. आयुष्य खडकाप्रमाणेच असते.

यवतमाळ येथील डॉ. बाळू दत्तात्रेय राठोड सांगतात, की बंजारा समाजात पळस फुलांना ‘केसुला’ म्हणतात. पायाखाली खडक. क्यावर कडक ऊन अशा प्रतिकूल परिस्थितीत माळरानावर केसूला निसर्गात रंग भरतो. आयुष्यात सर्व संपले असे जेव्हा वाटू लागते तेव्हाच खऱ्या अर्थाने नव्याने उभारी घ्यायची असते. म्हणून केसुलासारखे आयुष्य प्रत्येकाने जगावे

 Palas Flower
Flower Farming : नियमित कामातून मिळवतो जरबेराचे अधिक उत्पादन

बहुगुणी पळस

थंडीचा काटा सरला की होळी सण येतो. रंगांच्या उत्सवासाठी पळसाच्या फुलांचा वापर होतो. कुयरीसारखा आकार असलेली ही फुले आकर्षक भासतात. केशर गंध चाखण्यासाठी रंगीबेरंगी पक्षी, पोपट फुलांवर ताव मारतात. पळसाच्या अंगकांतीची सळसळ पाखरांच्या थव्यासरशी अधिक ठसठशीत होते.

पळसाच्या फळशेंगांचे बीज म्हणजे पापडी. त्या उगाळून बाळगुटीत दिल्या जातात. आयुर्वेदाचार्यांच्या मते त्या कृमिनाशक आहेत. पळसाचा डिंक तांबूस रंगाचा असतो. (कमरकस). स्त्रियांच्या कंबरदुखीवर तो वापरतात. बाळंतपणानंतरच्या लाडूत त्याचा वापर होतो. खेड्यांमध्ये रंगपंचमीला पळसाची फुले खलबत्त्यात कुटून ती स्वच्छ पाण्यात भिजवितात. त्यापासून तयार झालेला नैसर्गिक रंग आल्हाददायक असतो.

 Palas Flower
Flower Farming : भातशेतीला पॉलिहाउसमधील गुलाबशेतीची जोड

पळस पत्रावळींचा व्यवसाय

पळस बहुगुणी आहे. त्याच्या पानांपासून गाव-खेड्यांमध्ये पत्रावळी, द्रोण तयार करतात. लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांमधून भोजनासाठी त्यांचा वापर करण्यात येतो. या पत्रावळीवर जेवताना करावी लागणारी कसरत मजेशीर असली तरी तो आनंद अवर्णनीयच असतो पुसद तालुक्यातील आदिवासी तसेच बंजारा समाजातील महिला पळस पानांपासून पत्रावळी वळतात. हे त्यांच्या रोजगाराचे साधनच आहे.

या महिला पत्रावळ्या घेऊन भल्या पहाटे शहराची बाजारपेठ गाठतात. पितृपक्षात, अक्षय तृतीयेला त्यांना मोठी मागणी असते. द्रोणाच्या प्रति जोडीला दहा रुपये ते पंधरा रुपयापर्यंत दर मिळतो. हा व्यवसाय भले छोट्या स्वरूपाचा असला तरी वाड्या-तांड्यातील आर्थिक दृष्ट्या गोरगरिबांची त्यावर गुजराण होते. अलीकडे प्लॅस्टिक पत्रावळ्या आल्याने मागणी कमी झाली असली तरी पळसाच्या पत्रावळीचा कायम ठसा ग्राम्य जीवनावर अजून आहे. म्हणूनच त्यांना ‘अच्छे दिन’ यावेत असे पर्यावरण प्रेमींना वाटते.

तीस वर्षांपासून पळस पत्रावळींचा व्यवसाय

गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले गणेश वाढई पळसाच्या पानांपासून पत्रावळीं तयार करतात. गडचिरोली शहरात त्याची विक्री करतात. तब्बल ३० वर्षांपासून त्यांचे या व्यवसायात सातत्य आहे. सुरुवातीच्या काळात या पत्रावळींना ग्राहकांकडून मोठी मागणी होती. त्यामुळेच २५ रुपये प्रति शेकडा (१०० नग) असा दर त्यांना मिळे.

नंतरच्या काळात हे दर शेकडा ५० रुपयांवर पोहोचले. लग्नसराईच्या काळात एकाच दिवशी पाच हजारांहून अधिक पत्रावळींची विक्री व्हायची. त्यामुळे व्यवसायातून कुटुंबाच्या गरजा भागून हाताशी काही पैसा शिल्लक राहायचा. शिवाय पळसाचा वापर असल्याने पर्यावरणाला कोणताच धोका नव्हता.

मागणी घटली

आता प्लॅस्टिक आणि कागदांच्या पत्रावळी उपलब्ध होऊ लागल्याने पळसाच्या पानांच्या पत्रावळींची मागणी घटली आहे. पूजा आणि अन्य विधीसाठीच त्यांची खरेदी होते. धार्मिक विधी असतील तर केवळ दोन ते तीन पत्रावळींची खरेदी होते. त्याच कारणामुळे दरांतही वाढ करावी लागली. आता एक पत्रावळी सरासरी पाच रुपयांना विकली जाते.

जंगलक्षेत्रात पळसाची झाडेदेखील कमी होत आहेत. परिणामी, पाने मिळण्यात अडचणी असल्याचे गणेश यांनी सांगितले. आता या व्यवसायात राम उरला नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. मात्र पर्यावरण रक्षणाचा उद्देश साधायचा असेल तर ग्राहकांनी पळसाच्या पत्रावळींची मागणी आणि वापर करावा. त्यातून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाला चांगली चालना मिळेल असेही ते म्हणाले.

पितृपक्ष,अक्षय तृतीया व मागणीनुसार अन्य सणांना ग्रामीण महिला पळस पानांच्या पत्रावळी व द्रोणांची पुसद शहरात विक्री करतात. साधारणतः पाचशे रुपयांच्यावर त्यातून मिळकत होते. प्लॅस्टिक पत्रावळींमुळे या पूरक व्यवसायावर आता गंडांतर आले आहे.
गजानन चिरंगे, धरमवाडी, ता. पुसद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com