
Yavatmal News: नांदेड सेवाग्राम रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या खर्शी येथील केशव तुकाराम शिंदे यांच्या शेतातील मौल्यवान रक्तचंदनाच्या झाडासाठी मूल्यांकनाआधी एक कोटी रुपये मोबदला न्यायालयात जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. अखेर दहा वर्षांनंतर शिंदे कुटुंबीयांच्या रक्तचंदनाच्या मूल्यांकनासाठीच्या संघर्षाला यश मिळाले. न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे विभागाने एक कोटी रुपये रक्कम मंगळवारी (ता. ८) न्यायालयात जमा केली. त्यापैकी पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत.
खासगी कंपनीच्या जागतिक दरानुसार या रक्तचंदन झाडाचे मूल्यांकन ४ कोटी ९५ लाख रुपये असून, शासकीय दरानुसार येत्या सात जूनपर्यंत मूल्यांकन करण्याची मुभा नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय मंत्री व न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी रेल्वे विभागाला दिली आहे. पुसदपासून सात किलोमीटरवर खर्शी गाव आहे. येथील केशव शिंदे (वय ९५) यांची साडेपाच एकर शेत जमीन आहे. या सात-बारावर पंजाब (वय ६५), शंकर (वय ६३), तुकाराम (वय ५०) व सदाशिव (वय ४५) या चार भावांची नावे आहेत.
या शेत जमिनीतून नांदेड सेवाग्राम रेल्वे मार्ग जात आहे. त्यासाठी ही जमीन, तसेच त्यावरील विहीर पाइपलाइन, फळबाग, खैर, साग तसेच आडजातीची झाडे जिल्हाधिकारी यांनी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी भूसंपादित केली. शेती व फळबागांसाठी त्यांना १ कोटी ३३ लाख रुपये मोबदला मिळाला. मात्र त्यात पाइपलाइन, आडजात झाडे यांचा समावेश नव्हता. या सर्व्हेक्षणासाठी आंध्र प्रदेशातील सर्व्हेअरने आडजातीतील भला मोठा वृक्ष हे रक्तचंदन असल्याचे पंजाब शिंदे यांना सांगितले. त्याचवेळी रक्तचंदन हे कोट्यवधी किमतीचे अतिशय मौल्यवान झाड असल्याचे शिंदे कुटुंबाला प्रथमच समजले व येथून रक्तचंदनाच्या मूल्यांकनाचा संघर्ष सुरू झाला.
या झाडाच्या मूल्यांकनासाठी पंजाब शिंदे यांनी वन विभाग, रेल्वे विभाग, सिंचन विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात २०१४ पासून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु टोलवाटोलवी व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे रेल्वे विभागाकडून रक्तचंदनाचे मूल्यांकन होऊ शकले नाही. उलट रेल्वे अधिकाऱ्यांकडून रक्तचंदनाचे झाड वगळून पंधरा मीटरने अलीकडे अलाइनमेंट बदलण्याचा प्रयत्न झाला.
या संदर्भात एसडीओ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पुन्हा सर्व्हेक्षण होऊन मूळ अलाइनमेंट निश्चित करण्यात आली. उभ्या झाडाचे मूल्यांकन करता येणार नाही, असे वन विभागाने कळविल्यानंतर मोबदल्याचा प्रश्न सुटू शकला नाही. अखेर तब्बल आठ वर्षांनंतर शेतकरी केशव शिंदे, पंजाब शिंदे यांनी नागपूर उच्च न्यायालयात नोव्हेंबर २०२४ मध्ये रेल्वे विभागाविरुद्ध याचिका दाखल केली. शिंदे यांच्या बाजूने ॲड. अंजना राऊत यांनी न्यायालयात बाजू मांडली.
उच्च न्यायालयाने बाजू ऐकून घेत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रक्तचंदनाचे मूल्यांकन केलेले नसल्याने एक कोटी रुपये २० मार्चआधी न्यायालयात जमा करा, असा आदेश दिला. रेल्वे विभागाने १९ मार्च रोजी एक कोटी रुपये जमा केले. मूल्यांकनासाठी मुदत मागितल्यानंतर सात जूनपर्यंत न्यायालयाने अवधी दिला आहे. आता यात रक्तचंदनाच्या झाडाच्या मूल्यांकनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रक्तचंदन नव्हे, लक्ष्मीची पूजा
शिंदे कुटुंबीयांचे रक्तचंदनाचे झाड वडिलोपार्जित शेतीत आहे. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळापासून असले तरी हे झाड रक्तचंदनाचे आहे, याची माहिती सर्व्हेक्षणापर्यंत कुणालाच नव्हती. या झाडाची सणावाराला लक्ष्मी पूजा करण्यात येत होती. झाडाखाली तेलाचा दिवा लावण्याची प्रथा होती. या झाडाची उंची ४५ फूट असून बुंध्याची गोलाई २.३ मीटर एवढी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.