PDKV Akola: ‘पंदेकृवि’चे तीन पीक वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

India Crop Varieties: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील संशोधकांनी विकसित केलेल्या गहू, ज्वारी व हरभऱ्याच्या नव्या वाणांना केंद्र शासनाची राष्ट्रीय पातळीवरील अधिसूचना मिळाली आहे.
Crop Variety
Crop VarietyAgrowon
Published on
Updated on

Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या तीन नवीन पीक वाणांना व तीन जुन्या वाणांच्या क्षेत्रवाढीस केंद्रीय मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या ९३ व्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.

नवीन अधिसूचित वाणांमध्ये गहू एकेएडब्लू ५१००, पिवळी ज्वारी सीएसव्ही ६५ येलो, व हरभरा सुपर जॅकी (एकेजी १४०२) यांचा समावेश आहे. गहू वाण एकेएडब्ल्यू ५१०० हा तांबेरा रोगास प्रतिकारक असून उष्णता व पाण्याच्या ताणास सहनशील आहे. पिवळी ज्वारी सीएसव्ही ६५ येलो मध्ये जस्त व लोहाचे प्रमाण अधिक असून प्रथिनांचे प्रमाण १०.४ टक्के आहे. हरभरा सुपर जॅकी हा लवकर परिपक्व होणारा, यंत्राद्वारे काढणीस योग्य व जास्त उत्पादन देणारा वाण आहे.

Crop Variety
PDKV Maize Variety : पीडीकेव्ही आरंभ मका ठरणार शेतकऱ्यांना वरदान

तसेच, सोयाबीनचे ‘पीडीकेव्ही अंबा’ व ‘पीडीकेव्ही पूर्वा’ आणि भुईमुगाचे ‘टीएजी ७३’ या वाणांची क्षेत्र वाढ करण्यात आली आहे. ‘अंबा’ सोयाबीन वाण गुजरातसाठी, ‘पूर्वा’ आसाम, मेघालय व दक्षिणपूर्व मध्य प्रदेशसाठी, तर ‘टीएजी ७३’ भुईमूग वाण गुजरातसाठी नव्याने अधिसूचित झाला आहे.

ही यशस्वी कामगिरी कुलगुरू डॉ. शरद गडाख व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली गहू, ज्वारी, हरभरा, सोयाबीन व भुईमूग यांचे पैदासकार शास्त्रज्ञ डॉ. स्वाती भराड, डॉ. आर. बी. घोराडे, डॉ. अर्चना थोरात, डॉ. सतीश निचळ व डॉ. मनीष लाडोळे यांच्या मेहनतीतून साध्य झाली आहे.

Crop Variety
New Crop Variety : नव्या पीकवाणांचे बियाणे संकलित करा ः वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काळे

नवीन पीक वाणांची वैशिष्‍ट्ये

एकेएडब्ल्यू ५१०० : गहू पिकाचा हा वाण जास्त उत्पादन देणारा, तांबेरा रोगास प्रतिकारक, ब्रेड व चपातीची प्रत उत्‍तम तसेच पाण्याचा ताण सहन करणारा व उष्णतेस असंवेदनशील आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यासाठी वेळेवर पेरणीकरिता प्रसारित करण्यात आला आहे.

सीएसव्ही ६५ येलो : पिवळ्या ज्वारीचा हा खरीप वाण जैवसंपृक्त असून त्यामध्ये जस्ताचे प्रमाण २३.२ पीपीएम तसेच लोहाचे प्रमाण ३०.८ पीपीएम आहे. या वाणाचे धान्य उत्पादन २५-२८ क्विंटल हेक्टरी असून असून कडब्याचे उत्पादन ११० -११५ क्विंटल हेक्टर आहे. या वाणांमध्ये प्रथिनांचे प्रमाण १०.४ टक्के आहे. सदर वाणाचा परिपक्वतेचा कालावधी ११०-११२ दिवस आहे.

सुपर जॅकी (एकेजी १४०२) : हरभरा पिकाचा हा वाण जास्त उत्पादन देणारा आहे. ९८ दिवसांत लवकर परिपक्व होतो. यंत्राद्वारे काढणी योग्य, मर रोगास मध्यम प्रतिकारक, ठोकळ दाणा असलेला वाण आहे. महाराष्ट्र राज्यासाठी जिरायती वेळेवर पेरणीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.

शाश्‍वत शेती व संपन्न शेतकरी यासाठी कार्यरत अकोला कृषी विद्यापीठ संशोधित कालसुसंगत पीकवाण, आधुनिक शेती तंत्रज्ञान तथा यंत्र व अवजारांच्या प्रभावी वापरातून फायदेशीर शेती व्यवसाय दृष्टिपथात येत आहे. कृषी विद्यापीठाचा सल्ला घेऊन शेतीचे केलेले नियोजन लाभदायकच ठरणार आहे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त बियाणे लवकरच शेतकरी बांधवांना लागवडीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध होईल.
डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com