Maharudra Manganle: झाडांची फळं खाण्यात आनंद मिळतो; मग झाडं राखायची कोणी?

Tree Plantation: झाडं लावणं हा केवळ पर्यावरणप्रेमाचा भाग नसून, ती जोपासणं, संकटात त्यांचं रक्षण करणं, ही एक निस्वार्थ तपश्चर्या आहे. महारुद्र मंगनाळे यांची ही कहाणी केवळ वृक्षप्रेम नव्हे, तर एक जबाबदारी स्वीकारणाऱ्या शेतकऱ्याच्या संघर्षाची आणि निसर्गाशी नातं जपणाऱ्या मनाच्या खोल भावनांची आहे.
Tree Conservation
Tree ConservationAgrowon
Published on
Updated on

महारुद्र मंगनाळे

Nature-Loving Farmer: माझं झाडांचं वेड बालपणापासूनचं. तेव्हा शेतात लिंबाची आणि बाभळीची झाडं मोठ्या प्रमाणात होती. आंब्याची पाच-सहा, पिंपळाचं एक, जांभूळ एक अशी वनराई होती. दुष्काळासह विविध कारणांनी ही झाडं तुटली, वाळली. २००९च्या सुमारास मी शेती पाहायला सुरूवात केली तेव्हा मळ्यात एकाच बंधाऱ्यांवर लिंबाची ४ आणि विहिरीच्या बंधाऱ्यावर आंब्याची दोन झाडं होती. म्हणजे शेत जवळपास उजाडच.

आधीच हलकी जमीन, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि झाडं नाहीत, ही स्थिती त्रासदायक होती. २०१० मध्ये शेतात एका खोलीचं बांधकाम सुरू केलं तेव्हा आजुबाजुला एकही झाड नव्हतं. इथं झाडं वाढवल्याशिवाय राहाता येणार नाही, याची कल्पना होतीच. २०१२ पासून या नव्या खोलीत मुक्कामी राहू लागलो तेव्हाच ठरवलं. या परिसरात भरपूर झाडं लावायची, जोपासायची.

Tree Conservation
Maharudra Mangnale: मित्रा, वेळ कुठे विकत मिळतो का?

त्याचवर्षी हटसमोरच्या अर्धा एकर जागेत विविध फळझाडं लावली.सलग दोन वर्षांच्या दुष्काळात जगवली. त्यानंतर मळ्यातील बारा-तेरा बंधाऱ्यांवर सीताफळ आणि लिंबाची झाडं लावली. त्याला ठिबकने, तर कधी माणसांकडून पाणी दिलं. कडुनिंबाच्या ५०० झाडांना वेळूच्या काठ्यांचा आधार दिला. सायाळने मोठ्या प्रमाणावर लिंबाच्या झाडांचं नुकसान केलं. तीन बंधाऱ्यांवर झाडंच येऊ दिली नाहीत. तरीही ४००च्या आसपास झाडं टिकली. ती वाढताहेत.

सगळ्याच बंधाऱ्यांवर लिंबाची रोपं लावली. ज्या बंधाऱ्यांवरून विद्युत तार गेलीय, ते बंधारे टाळायला हवे होते. पण झाडाचं भूत डोक्यात असल्याने तो विचार आला नाही. बागेशेजारच्या सामाईक बंधाऱ्यांवरची लिंबाची झाडं झपाट्याने वाढली. हटलगतच हा बंधारा असल्याने, या झाडांचा गारवा आम्हाला हवाहवासा होता. त्यामुळं गेल्या सहा-सात वर्षांपासून तारेला स्पर्श करण्याची शक्यता असलेल्या फांद्या काढायचो. हे काम अवघड , वेळखाऊ व जोखमीचं आहे. कटर मशीन झाडावर नेऊन फांद्या कापाव्या लागतात. डी.पी.तील फ्यूज काढूनच हे काम करावं लागतं.

काल सायंकाळी मी लिंबाच्या झाडाला खेटूनच असलेल्या आवळ्याच्या झाडाजवळ होतो. पावसाळी वातावरण होतचं. अचानक जोराचा वारा सुटला. लिंबाच्या फांद्यांचं तारांना घर्षण होऊन ठिणग्या पडल्या. दोन वेळा तसं घडलं. तिथल्या चारही झाडांच्या फांद्या वीजेच्या तारेत घुसल्या होत्या. मी लगेच नरेशला कल्पना दिली. आज फांद्या तोडण्याचं काम प्राधान्याने करायचं ठरलं. सकाळची सगळी कामं संपवून, हे काम सुरू करायला बारा वाजले. भर उन्हात काम सुरू झालं.

Tree Conservation
Maharudra Mangnale : आनंदाची शेती फुलविणारे स्वावलंबी खेडे

सगळ्यात अवघड काम नरेशचं. झाडावर जाऊन, तिथं मशीन चालू करून फांद्या कापायच्या. या फांद्या तारेवर पडू नयेत म्हणून मी व गजानन दोर बांधून त्या अलिकडे ओढायचे. फांद्या एवढ्या वेगाने वाढताहेत की, ऐन पावसाळ्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण झाला असता. नरेश म्हणाला, मुख्य खोडाच्या वरचा सगळा भाग काढून टाकू. मी लगेच हो म्हटलं नाही. पण विचारांती होकार दिला. तीन-चार महिन्याने पुन्हा हे काम करणं शक्य नव्हतं.

झाडांबद्दल कितीही प्रेम असलं तरी, असे निर्णय घ्यावेच लागतात. ही जिवावरची जोखीम आहे. साडे तीन तास उन्हात काम केल्यानंतर जेवायला आलो. पुन्हा साडेतीन ते साडेपाच हेच काम केलं. हे सगळं आवरायला उद्याचा एक दिवस लागेल. ऊन आहे म्हटलं असतं तर, या कामाला तीन-चार दिवस लागले असते. या कामासाठी मी आज लातूरला जाणं टाळलं होतं!

शेजारचे शेतकरी दरवर्षी आमच्या या कामाकडं गंमतीनं बघतात. पैसा मिळणं तर दूरच पण उन्हातान्हात हे असे का बेजार होत असतील, असा प्रश्न त्यांना पडतो. तो अगदीच चुकीचा आहे असं नाही. जंगलात झाडं लावणं आणि शेतात झाडं लावणं, यात मोठा फरक आहे. झाडं लावली, जोपासली की, त्याचं पुढचं बाळंतपण करीत राहावं लागतं. शेतकऱ्यांना हे परवडणारं नाही! तेवढा वेळ त्यांच्याकडं नाही. असं असलं तरी, येत्या पावसाळ्यात नवीन कोणती झाडं लावायची याची यादी करतोय. पाऊण एकर केशर आंबा आणि पाव एकर ड्रँगन फ्रुट लावायचं ठरलयं. हे रोपं लावणं, ती जोपासणं आणि त्यांची फळं खाणं हेच माझं जगणं आहे. ते शेवटपर्यंत चालूच राहील. असं काम माझ्यासारखे आनंददायी शेती करणारेच करू शकतात!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com