Maharudra Mangnale : आनंदाची शेती फुलविणारे स्वावलंबी खेडे

Self Sustaining Village : एका शेतकऱ्याने २०१५ मध्ये सुरुवातीला त्याची नऊ गुंठे जमीन आम्ही सेवक संस्थेला विकत दिली आणि हॅपी इंडियन व्हिलेजच्या कामाला सुरुवात झाली. ही जमीन वहितीखाली आणण्याचा धाडसी निर्णयच रवी बापटले यांनी घेतला.
Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
Published on
Updated on

Rural Story : मातीशी नातं जुळलेली व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात कार्यरत राहिली तरी ती या नात्याचा विसर पडू देत नाही, याचं एक आदर्श उदाहरण म्हणून सेवालय व हॅपी इंडियन व्हिलेजचे संस्थापक रवी बापटले यांच्या कामाकडे बघावं लागेल. देशासाठी, समाजासाठी काहीतरी भरीव काम करायचं म्हणून ते पत्रकारितेत आले.

तेवढ्यावर समाधान न मानता मित्रांना सोबत घेऊन ‘आम्ही सेवक’ नावाची संस्था स्थापन करून समाजकार्याला सुरुवात केली. अचानक असा एक प्रसंग घडला, की त्यांनी आपलं सगळं आयुष्य एचआयव्ही संक्रमित बालकांचं संगोपन व पुनर्वसन याकामी देण्याचा निर्णय केला. लातूर जवळच्या हासेगावला त्यांना साडेसहा एकर माळरानाची जमीन दान मिळाली आणि सेवालयाचं काम सुरू झालं.

मी या कामाशी पहिल्या दिवसापासून जोडला गेलो असल्याने त्यांचं मातीशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अधिकाधिक मजबूत होताना बघत आलोय. सेवालयात पहिला निवारा तयार होण्याआधी त्यांनी केशर आंब्याची २५० रोपं लावली. त्याचवेळी नारळाची ७०, बोरीची व इतर शोभेची, फुलांचीही रोपं लावली.

तेव्हा त्या माळावर एकही झाड नव्हतं. पाण्याची सुविधा नव्हती. जमीन खडकाळ, अर्धा फूटही माती नाही... अशा प्रतिकूल परिस्थितीत निवाऱ्याआधी रोपं लावण्याचा विचार असाच माणूस करू शकतो. जबर इच्छाशक्तीसोबत कष्ट करण्याची तयारी असली, की यश येतंच असा अनुभव इथंही आला.

पाच-सहा वर्षांत उजाड माळरान हिरवं झालं. सेवालयातील मुलांसोबतच मित्र, देणगीदार, हितचिंतक यांनाही आंबे खायला मिळू लागले. मुलांना बोरं ही पर्वणी ठरली. चार पैसेही त्यातून मिळू लागले. पाण्याची गरज भागविण्यासाठी तिथं छोटसं शेततळंही झालं. शेजारच्या शेतकरी मित्रांनी पाण्याची गरज भागवली.

Indian Agriculture
Maharudra Mangnale : ऊकळ चाटून दुकाळ हटतयं का?

सेवालयाचं काम सुरळीत सुरू झालं. पौष्टिक अन्न, औषधोपचार व शुध्द हवेचा परिणाम मुलांवर दिसू लागला. सहा-सात-आठ वर्षांची मुलं बघता बघता अठरा वर्षांची झाली. सेवालयाला शासनाची बालगृह म्हणून मान्यता आहे. इथं अठरा वर्षांपर्यंतचीच मुलं-मुली ठेवता येतात.

यापुढच्या तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांना बाहेर कुठं पाठवायचं,असा प्रश्‍न निर्माण झाला. पोटच्या लेकरांपेक्षाही अधिक प्रेमाने सांभाळलेल्या या लेकरांना पाठवायचं कुठं? हा अवघड विषय होता. या मुलांसाठी आणि समाजासाठीही ही जोखीम होती. अशा मुलांना सांभाळणारी संस्था महाराष्ट्रात किंवा देशात कुठे आहे का, याचा शोध घेतला तेव्हा निराशाच पदरी पडली.

यातून रवी बापटले यांच्या डोक्यातून HIV हॅपी इंडियन व्हिलेजची कल्पना समोर आली. या मुलांना दहावीनंतरचं शिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे काम आव्हानात्मक होतं. एचआयव्ही संक्रमित मोठ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी समाजातून पुरेसा निधी मिळणं कठीण होतं. हे

लक्षात घेऊन सेवालयातील ४० मुला-मुलींचा म्युझिक शो बसवला. याला मात्र महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला. यातून चांगले पैसे मिळू लागले. त्याचा विनियोग कसा करायचा? हॅपी इंडियन व्हिलेज स्वावलंबी करायचं म्हणजे काय करायचं? किमान स्वतःला लागेल एवढं अन्नधान्य, भाज्या, फळे, दूध निर्माण करणं आणि त्यानंतर अधिक उत्पादन करून त्यातून पैसे कमावणं. यासाठी संस्थेच्या मालकीची जमीन असणं गरजेचं होतं.

Indian Agriculture
Maharudra Mangnale : लिंबू उत्पादकांची प्रेरणादायी भेट

संपूर्ण डोंगरच ताब्यात आला... सेवालयापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या टेकडीवजा डोंगरावर अनेक शेतकऱ्यांचे जमिनीचे छोटे तुकडे होते. बहुतेकांना त्यांची जमीन नेमकी कोणती आहे, तेही माहीत नव्हतं. कठीण दगडांचा डोंगर असल्याने जमीन कसण्यायोग्य नव्हती. गावातील गुरं इथं चारली जात. ही जागा वस्ती करण्यायोग्य होती. एका शेतकऱ्याने २०१५ मध्ये सुरुवातीला त्याची नऊ गुंठे जमीन आम्ही सेवक संस्थेला विकत दिली आणि हॅपी इंडियन व्हिलेजच्या कामाला सुरुवात झाली. एचआयव्ही संक्रमित मुलांसाठी सेवालय पुनर्वसन प्रकल्प राबवतोय, एक गाव वसवतोय हे लक्षात आल्यानंतर इतर आठ-दहा शेतकऱ्यांनी योग्य किमतीत त्यांच्या जमिनी सेवालयाला विकत दिल्या. तसाही त्या शेतकऱ्यांना या जमिनीचा काहीच उपयोग नव्हता, पाच वर्षांत संपूर्ण डोंगरच संस्थेच्या ताब्यात आला.

इथे राहण्यासाठी आवश्यक इमारती बांधल्यानंतरही जमीन मोठ्या प्रमाणात शिल्लक होती. ती वहितीखाली आणण्याचा निर्णय रवी बापटले यांनी घेतला. जमीन म्हणजे दगड-मुरमानं भरलेलं माळ होतं. माती अशी नव्हतीच. उन्हाळ्यात शेजारच्या तळ्यातील माती आणून जमिनी तयार करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला. जमिनी वहितीयोग्य बनू लागल्या. सेवालयाप्रमाणेच इथंही पाण्याची अडचण होती.

व्हिलेजपासून पूर्वेला एक किमी अंतरावर खात्रीने पाणी असलेली एक एकर जमीन घेतली. तिथं घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागलं. ते पाणी पाइपलाइनद्वारे व्हिलेजवर आणण्यात आलं. हे पाणी कुठं साठवायचं हा प्रश्‍न होता. रवी यांनी शेततळं बांधण्याचा निर्णय घेतला.

कुठल्याही इंजिनिअरची मदत न घेता शेततळ्याचं काम सुरू झालं. स्वत: रवी आणि त्यांची तरुण मुलं कामाला लागली. अंबाजोगाईच्या मानवलोक संस्थेने जेसीबी मशिन या कामासाठी दिली. अनेक अडचणींवर मात करीत सहा महिन्यात दीड कोटी लिटरचं शेततळं तयार झालं. बाहेरून एकही मजूर न बोलवता केवळ मुलांना सोबत घेऊन पूर्ण केलेलं हे शेततळं एखादा चमत्कार वाटावं असंच आहे.

शेतीत नवे प्रयोग

हॅपी इंडियन व्हिलेजला स्वावलंबी खेडं बनवायचं तर, शेतीला प्राधान्य द्यायला हवं, ही बाब त्यांच्या लक्षात आली. शेतीसाठी लागणारं पाणी आणि मनुष्यबळ त्यांच्याकडं होतं. तिथून शेतीत नवे प्रयोग सुरू झाले. शेतीसाठी शेणखत लागतं. विशेषतः फळबाग शेणखतावर विक्रमी उत्पादन देते, हे लक्षात घेऊन गायी सांभाळण्यास सुरुवात केली. बघता-बघता सात-आठ गायी, त्यांची वासरं, एक म्हैस असा पसारा वाढला. शेणखतासोबतच मुलांना दूध,दही खायला मिळू लागलं.

हळूहळू सुमारे शंभर लोकांना लागणारा विविध प्रकारचा भाजीपाला पिकवणं सुरू झालं. टोमॅटोचा प्रयोग यशस्वी झाला. लातूरच्या बाजारात तर टोमॅटो गेलेच शिवाय हसेगावच्या गावकऱ्यांनाही हे चवदार टोमॅटो मिळाले. व्यावसायिक दृष्टीने कारले लावण्यात आले. विक्रमी उत्पादन झालं. त्यातून चांगले पैसे मिळाले. केळीची लागवडही अशीच यशस्वी ठरली. लातूरमध्ये टमटममध्ये नेऊन केळीची विक्री करण्यात आली.

ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. केळी संपल्यानंतरही ग्राहकांचे फोन येऊ लागले. पपईचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की, लातूर मार्केटमध्ये त्याची ठोक विक्री करण्यात आली. आंब्याचं उत्पादन मर्यादित असल्याने, ग्राहकांची मागणी पूर्ण करता येत नाही. गेल्या वर्षीपासून ड्रॅगन फ्रूटचं उत्पादनही सुरू झालंय. शुद्ध तेलासाठी नुकताच घाणाही खरेदी केलाय. तेही पैसे मिळवून देईलच.

इथं जे काही पिकेल ते पहिल्यांदा मुलांना भरपूर खाऊ घालायचं, त्यानंतरच बाजारात विक्री. हा भाजीपाला, फळं इथं पिकवली नसती तर, हे सगळं बाजारातून विकत आणून मुलांना खाऊ घालणं शक्य झालं नसतं. ते केवळ भाजीपाला आणि फळंच उत्पादित करतात असं नाही तर पांढरी ज्वारी, सोयाबीन, हरभरा ही पिकंही घेतात. मुलांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्हिलेजवर अत्याधुनिक जीम, लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोक्यासह विविध प्रकारचं खेळाचं साहित्य उपलब्ध आहे.

शेतीतील या विविध उत्पादनांमुळे शेततळ्यातील पाणीही कमी पडायला लागलं. दुष्काळी परिस्थितीत शेजारी शेतकऱ्यांकडून पाणी मिळणं अवघड झालं. शंभरावर माणसं, शेकडो झाडं, फळबागा, पंधरा-वीस जनावरं या सगळ्यांची पाण्याची गरज भागणं अशक्य झालं. हॅपी इंडियन व्हिलेजला पाणीटंचाईचं संकट भेडसावू लागलं. पाण्याचा कायमस्वरूपी आणि खात्रीचा स्रोत शोधणं गरजेचं होतं. असं एकमेव ठिकाण म्हणजे खुंटेगाव साठवण तलाव. शासकीय परवानगी, चाळीस-पन्नास लाखांचा खर्च.

मोठं कठीण काम होतं. मात्र रवी बापटले यांच्या नि:स्वार्थ कामामुळे अशक्य वाटणारी कामंही शक्य होऊन जातात. खुंटेगाव तलावालगत विहीर घेण्याची विशेष परवानगी शासनाकडून मिळाली आणि मुंबईतील एका संस्थेने खर्चाची जबाबदारी उचलली. विहीर ते हॅपी इंडियन व्हिलेज अशी साडेतीन किमीची पाइपलाइन पूर्ण झाली. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला. यामुळं शेती करण्याला अधिक बळ आलं.

त्यामुळे रवी यांचा उत्साह वाढला. ज्या जमिनीत पिक घेणं शक्यच नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं, त्या डोंगरावर अंजीर आणि पेरूची रोपं जोमाने वाढताहेत. केळीची लागवड नव्याने केलीय. भरपूर शेणखत उपलब्ध असल्याने या फळबागा सेंद्रिय पद्धतीने जोपासण्याचा निर्णय घेतलाय. पैसे देणारं पीक म्हणून ऊस लागवडीचाही विचार आहे.

शिक्षण आणि श्रमयोग

एकंदरीत शेती उत्पादनाच्या माध्यमातून हॅपी इंडियन व्हिलेजचं प्रत्येक पाऊल स्वावलंबनाच्या दिशेने पडतंय. मनुष्यबळ असल्याने, लगतच्या जमिनीही ते करार पद्धतीने करीत आहेत. शेतीची कामं वाढल्याने गेल्या आठवड्यातच एक बैलजोडी या परिवारात आलीय. शेतीची, औताची सगळी कामं रवी यांना येतात. त्यामुळे मुलांना वेगळं प्रशिक्षण देण्याची गरज नाही. मुलं अनुकरणाने शिकतात. मुलांचं शालेय, महाविद्यालयीन शिक्षण आणि श्रमयोगही एकाच वेळी सुरू आहे.

बहुतांशी सेवाभावी संस्था या केवळ लोकांच्या व सरकारच्या देणगीवर चालतात. बहुतेक जण याच मार्गाने वाटचाल करतात. मात्र बालपणापासून मातीशी नातं जुळलेल्या रवी बापटले यांनी हा कष्टाचा पण स्वाभिमानाचा मार्ग अवलंबलाय. आज सेवालय, हॅपी इंडियन व्हिलेज हे प्रकल्प म्हणजे एक ऊर्जा स्रोत बनली आहेत, ते यामुळेच. शेती, मातीवर प्रेम करणाऱ्यांनी एकदा इथं भेट देऊन हे सगळं बघायला हवं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com