Maharudra Mangnale: मित्रा, वेळ कुठे विकत मिळतो का?

Farmer Time Management: महारुद्र मंगनाळे यांच्या लेखनातून आपल्याला एक अत्यंत व्यापलेल्या जीवनाची झलक मिळते. त्यांच्या जीवनशैलीत वेळेची कधीच कमतरता नाही, परंतु तरीही एक उत्तम कामाची मैत्री आणि शेतकऱ्यांच्या दिनचर्येची पार्श्वभूमी दिसते.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Rural Life: आज एका मित्राचा फोन आला. माझ्यासाठी एक दिवसाचा वेळ काढ. मी म्हटलं, सध्या अजिबात शक्य नाही. पुन्हा बघू. त्याला राग आला असावा. त्यानं फोन बंद केला. मला याचं अजिबात वाईट वाटलं नाही. माझ्याकडं वेळच नाही तर, तो कुठून आणू? वेळ काही पैशाने मिळणारी गोष्ट नाही. माझी दिनचर्याच अशी बनलीय की, एखादं काम मागे पडलं की, त्याला हातावर घ्यायला पुन्हा संधी मिळेना झालीय.

लेखन-वाचनाची बरीच कामं प्रलंबित आहेत. मी टी.व्ही.बघत नाही. वृत्तपत्र हातात धरीत नाही. व्हॉट्सऍपचा फक्त मेसेज पुरता वापर करीत नाही. सिनेमा, व्हिडीओ, रील, सीरीयल असलं काहीच बघत नाही. पूर्वी महिन्यातून एक-दोनदा इंग्रजी सिनेमा बघायचो. पण सहा महिन्यांपासून तो ही बंद झालाय. आता सिनेमा लावला तर पंधरा-वीस मिनीटात डोळे झाकू लागतात.

जगाशी जो काही संबंध येतो तो फेसबुकच्या माध्यमातून. त्याचाही वापर मर्यादित आहे. दहा-बारा मित्रांच्या भिंतीवर नजर मारून येतो. त्यामुळं जगात काय चाललयं, याची मला किरकोळ माहिती असते. तशीही ती माहिती माझ्यासाठी निरूपयोगी असल्याने व त्यात मला रस नसल्याने, हे माझ्या फायद्याचंच आहे. तरीही रिकामपण असं नाहीच. दिवसा कधीच झोपत नाही. वेळ नाही म्हणजे काय? काय करतोस दिवसभर? असाही प्रश्न काहीजण विचारतात. मी रुद्रा हटवर असतो तेव्हा रात्री नऊ वाजता झोपतो.

Agriculture
Maharudra Mangnale : आनंदाची शेती फुलविणारे स्वावलंबी खेडे

क्वचितच साडेनऊ-दहाला. नऊला झोपलो की,चार-साडेचारला उठतो. साडेपाचला प्राणायमसह आसनं करतो. सगळं आरामात सुरू असतं. सात-सव्वा सातला हटवर जातो. काळा चहा बनवतो. ऊन्हात घोट घोट चहा प्यायला आठ वाजतात. शेततळ्यावर फिरायला जातो. तास-दिड तास फिरतो. याकाळात तीन-चार मित्रांशी फोनवर बोलतो. फेसबुकवर काही लिहितो. परत आल्यावर वीस-पंचवीस मिनीट सायकल खेळतो. विहिरीवर ,सगळ्यात शेवटच्या वावरात एक चक्कर मारतो. हटवर परततो तेव्हा दहा-साडेदहा वाजलेले असतात.

येऊन ड्रायफ्रुटस, म्युसली, लाडू ,चिवडा असं काही बाही खातो. बागेत चक्कर मारून फळझाडांची हालहवाल बघतो. गरज असली तर झाडांना पाणी देतो. यात दुपार होते. शिळी भाकरी असेल तर, दही,चटणी. गरम भाकरी असेल तर भाजी, ताक असं जेवण होतं. दुपारी एक ते चार असे तीन तास वाचन, लेखन, प्रुफ तपासणं हे काम करतो.

साडेचारला काळी कॉफी, मळ्यात, बाहेर फिरणं होतं. सायंकाळी काही वेळ पुन्हा सायकल.आठ वाजता जेवण. अर्धा-पाऊण तास मोबाईल बघणं आणि झोपणं. दुपारचा तीन तासाचा रिकामा वेळ जून ते ऑगस्ट या काळात मिळत नाही. तेव्हा शेतीच्या कामात सहभागी होतोच. सोयाबीनला पाणी देण्याची परिस्थिती निर्माण झाली की, माझं रात्र रात्र जागरण होतंच. त्याकाळात कसलंच वेळापत्रक असत नाही.

ज्या दिवशी लातूरला मुक्तरंगला जायचं असतं तेव्हा सकाळी नऊ वाजताच हटवरून बसस्थानकावर जातो. दिवसभर तिथं काम असतंच. परत यायचं असेल तर पाचच्या बसने शिरूरला निघतो. शेतात पोहचेपर्यंत अंधार झालेला असतो. जेवण करून झोपणे, एवढंच होतं. लातूरला सलग तीन-चार दिवस काम असेल तर, सेवालयात मुक्कामी जातो. तिथं फिरणं, खाणं, झोपणं एवढंच होतं. रवीसोबत गप्पा, चर्चा होतात. पण लेखन, वाचन होत नाही. मुक्तरंग मध्ये माझ्या पुस्तकांची सतत कामं चालू असतात. संपादन, प्रुफरिडींंगसोबत नवं लिहिणंही सुरू असतं. इतर लेखक; कवींच्या पुस्तकांवर नजर टाकतो!

Agriculture
Maharudra Mangnale : लिंबू उत्पादकांची प्रेरणादायी भेट

फेसबुकवर अनेकदा भलं मोठं लिहितो. त्यालाही वेळ लागतोच. शिवाय सतत पर्यटन सुरू असतं. पर्यटनात फेसबुकवर भरपूर लिहितो. त्याचवेळी त्याचं पुस्तक करायची तयारी सुरू असते. अनेकदा वेळेअभावी महत्त्वाचे अनुभव लिहायचे राहून जातात. माझ्या परवाच्या दिल्ली, कलकत्ता, पाटणाच्या दौऱ्यातील चार दीर्घ नोंदी अद्याप लिहू शकलो नाही. माझ्या अर्धवट असलेल्या पुस्तकांचं लेखनही बाकी आहे...यासाठी वेळ काढायचा तर अज्ञात ठिकाणी जाऊन काही काळ राहावे लागेल.

वेळेची ही कायम अडचण असल्याने, मी कुठल्याच सभा, समारंभ, कार्यक्रमाला जात नाही. गेल्या दहा वर्षांत दहा लग्न समारंभही केले नाहीत. समारंभातला तमाशा बघणंही त्रासदायक असतं. शिवाय मी अशा कुठल्या कार्यक्रमात जेवतही नाही. त्यामुळं कुठचं जायचं नाही, हे ठरलेलं.

हर्ष हटवर आला तर त्याच्यासाठी वेळ देतो. गबरू, अन्वीसोबत फिरायला, खेळायला आवडतं पण तेच सध्या बिझी आहेत. शिवाय अधूनमधून रुद्रा हटवर कोणीतरी भेटायला येतं. त्यांना वेळ द्यावा लागतो. मधेच तलाठी कार्यालय, सोसायटी, पतसंस्था, बँक इथं महिन्यात एखादी चक्कर होते. मित्राला भेटत, महिन्यातून एकदा मित्रांसोबत जेवायला जातो, असं कायम सुरू असतं. यातून नेमका कसा वेळ काढायचा हे मला कळत नाही.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शेतीतील शारीरिक कष्टांच्या कामात सहभागी होण्याचं टाळतोय, ते वेळेअभावीच. शिवाय नरेश आणि गजानन दोघेजण असल्याने त्याची गरजही फारशी राहिलेली नाही. बागेत नवीन झाडं लावणं सुरूच असतं. महिनाभरापूर्वी केळी लावलीय. माळावर चिंचेची झाडं लावलीत. कधीतरी वेळ काढून पाणी देतो. ते माझ्या आवडीचं काम आहे. शेतात राहून शारीरिक कष्ट नाही केले तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं.

मधेच झटका आला की, भरपूर काम करतो.आज तसंच झालं. सकाळी ११ वाजता अँग्रोवनसाठीचा लेख पूर्ण करून पाठवला. नाचणीची इडली, चटणी खाऊन काही वेळ लोळलो. दुपारी अभ्यासिकेकडं येताना सहज डोक्यात आलं. केळीच्या छोट्या रोपांना आळे करायला हवेत. भर उन्हात तीन तासात केळी व इतर अशी ४२ आळी केली. गवती चहाची कापणी गरजेची होती. काळी कॉफी पित पित तेही काम केलं. लक्ष्मी बागेत जाऊन रबर प्लँटच्या खालच्या फांद्या काढल्या. बऱ्याच दिवसांनी डोंगरावर सुर्याला निरोप देऊन परतलो. मित्र हे सगळं वाचेलच आणि त्याची खात्री पटेल की, खरोखरच माझ्याकडं वेळ नाही!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com