Fight for Climate Changes : सारे जग सरसावले हवामान बदलाशी लढायला

Article by Nagesh Tekale : हवामान बदल आणि त्या आनुषंगिक नैसर्गिक आपत्तींचे संकट जगभरातील देशांपुढे उभे ठाकले आहे. त्यातून शेती आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. हवामान बदलावर मात करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीस जुळवून घेण्यासाठी विविध उपाय, प्रयोग, प्रयत्न विविध देशांकडून सुरू आहेत. त्या दृष्टीने जागतिक स्तरावर घेतलेला आढावा.
Agriculture Climate Change
Agriculture Climate ChangeAgrowon

Agriculture Climate Changes : माणूस आणि निसर्ग यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. युद्धात समुद्राचा अपवाद वगळता निसर्गातील अन्य सर्व घटक मानवास शरण जाऊन पराभव मान्य करतात. तोड झालेले वृक्ष, आटलेल्या नद्या ही त्याची उदाहरणे आहेत. महासागर मात्र पराभव मान्य करत नाही. उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील बर्फ वितळू लागला, की समुद्र पातळी वाढू लागते. किनाऱ्यावरील गावे, शहरे धोक्यात येतात.

निसर्ग आणि मानव यांच्यातील शीतयुद्धास खरे तर १९७० पासूनच सुरुवात झाली. विशाल निसर्ग संपत्ती आणि कमी लोकसंख्येमुळे युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका या महाकाय खंडांना शीतयुध्दाचे फार मोठे चटके बसले नाहीत. पण आशिया आणि आफ्रिका खंड मात्र त्यात भाजून निघत आहेत. आशिया हा प्रचंड लोकसंख्येचा व विकसनशील खंड. तुलनेने नैसर्गिक साधने कमी. आफ्रिकेत नैसर्गिक संपत्ती मालोमाल पण विकासाच्या छाताडावर गरिबीचे प्रचंड मोठे ओझे.

हवामान बदलामुळे बहुतांश देशांमध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. आफ्रिकेत प्रति दिवशी शेकडो भूक बळी ठरत आहेत. लहान मुलांची संख्या त्यात लक्षणीय आहे. यातून मार्ग काढण्यासाठी जागतिक अन्न आणि कृषी संघटना या भागात मोठे कार्य करत आहे. हवामान बदलावर मात करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीस जुळवून घेण्याचा प्रयत्न सध्या जागतिक स्तरावर सुरु आहे. जगातील सर्वं कृषी विद्यापीठांत ‘हवामान बदल- कारणे आणि उपाय’ यावर स्वतंत्र मंच निर्माण करण्यात आले आहेत. त्यात शेजारील सहा गोंष्टीना सकारात्मक रूप देणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलांवर जे उपाय शोधले जात आहेत त्याची प्रातिनिधिक उदाहरणे पाहूया.

टेक्सास राज्याचा आदर्श

अमेरिकेतील टेक्सास राज्यात पाऊस नेहमीच कमी. दहा वर्षांत वातावरण बदलाचे चटके त्याने सोसले. यावर उपाय शोधताना टेक्सास कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांचे हजारो मेळावे घेतले. संकरित गवतांच्या (चारा पिके) विविध जाती त्यांना उपलब्ध केल्या. मोठ्या प्रमाणात पशुपालनाला चालना देत दुग्ध उत्पादनात वाढ केली. जमीन सुपीक केली. पाऊस जमिनीत पूर्ण मुरू लागला. अशा जमिनीवर ६० ते त्या आसपास दिवसांत मक्याचे भरपूर उत्पादन देणारी बुटकी जात या विद्यापीठाने विकसित केली. या उत्पादनाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी कारखाना निर्माण होऊन स्थानिक युवकांना रोजगार मिळाला. त्यांचे स्थलांतर थांबले. मक्याची ताटे जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आली. मुरघास निर्मिती सुरू झाली. आज हवामान बदलाच्या तडाख्यात सापडलेला टेक्सास प्रांत दुग्ध उत्पादनात अग्रेसर झाला आहे.

टास्मानियातील उदाहरण

ऑस्ट्रेलिया हा खंडप्राय देश हवामान बदलाशी लढतो आहे. त्यातून मार्ग शोधण्यासाठी त्यांनी पारंपरिक ज्ञानाचा वापर केला. तेथील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची फौज याच देशातील टास्मानिया भागातील आदिवासींकडे गेली. त्यांची शेती पाहताना त्यांना हवामान बदलाबद्दल प्रश्‍न विचारले. आदिवासींना या विषयाचा गंधही नव्हता. ते म्हणाले आमची शेती हजारो वर्षांपासून आहे तशीच आहे. परिसरातील प्रत्येक वृक्ष आम्हाला देवतेसमान आहे. या उंच डेरेदार वृक्षांमुळे, त्यांच्यावरील निवासी पक्षांमुळे आमची शेती सुरक्षित, शाश्‍वत आहे. याच ज्ञानाने आता पुढील दिशा दाखवली आहे.

Agriculture Climate Change
Climate Change : हवामान बदलाचा करूया कृतिशील सामना

एक अब्ज वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

ऑस्ट्रेलियाने आधुनिक संकरित वाणांसोबत पारंपारिक बियाण्यांनाही महत्त्व दिले आहे. वातावरण बदलाचा सन्मान करावयाचा, तर वृक्ष लागवड हे ब्रीद वाक्य तेथील प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारले आहे. कृषी उत्पादनास शाश्‍वत करण्यासाठी न्यूझीलंडने २०१८ ते २०२८ या दशकात तब्बल एक अब्ज वृक्ष लावण्याची प्रतिज्ञाच केली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हा आकडा तब्बल ६२ कोटी ६९ लाखांवर पोहोचला. तेथील शेतकरी म्हणतात या यशस्वी वृक्ष लागवडीमुळे आमच्या किवी फळांच्या बागा पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झाल्या. कृषी उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे येथील प्रत्येक शेतकरी या वृक्ष लागवडीत सहभागी आहे.

भरडधान्य ठरले वरदान

इथिओपिया देशात टेफ (Teff Millet) हे भरडधान्य आज हवामान बदलाच्या प्रभावाखाली असलेल्या शेतीसाठी वरदान ठरले आहे. तेथील आदिवासी हे भरडधान्य आहारात नियमित घेतात. कितीही दुष्काळ, पाण्याची टंचाई असो अथवा उष्ण वारे असोत हे धान्य जमिनीतील जेमतेम ओलाव्यावरच आदिवासींना भरघोस उत्पादन देते. मधुमेह आणि वजन नियंत्रित करण्यामध्ये टेफचे महत्त्व जागतिक आरोग्य संघटनेनेही अधोरेखित केले आहे. संशोधन सांगते की जेवढा हवामान बदलाचा प्रभाव जास्त तेवढे भरडधान्यांमधील औषधी गुणधर्म त्या पटीत वाढतात. कमी पाण्यावर शाश्‍वत शेतीसाठी भरडधान्यांना पर्याय नाही.

ॲमेझॉनचे जंगल वाचवायला हवे

उष्ण, कोरडे वारे ब्राझीलच्या शेतीतील ओलावा झपाट्याने कमी करत आहेत. परिणामी सोयाबीन,मका उत्पादन घटते आहे. तेथील घनदाट जंगल कमी होत असल्यामुळे हा प्रभाव वाढत आहे.सुमारे २८ टक्के सोयाबीन लागवडीखालील जमीन बाधित झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात वेळीच उपाय योजना न केल्यास पुढील ३० वर्षात ब्राझीलमधील ७४ टक्के सोयाबीन उत्पादन पूर्ण थांबू शकेल.या देशातील ९० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ यांच्यापासून वाचण्यासाठी ॲमेझॉनचे जंगल वाचवणे गरजेचे राहणार आहे. आज या घनदाट जंगलातील पूर्ण वाढ झालेले वृक्ष धारातीर्थी पडत आहेत. शेतीला लागणारी वीज ॲमेझॉन नदी पुरविते. तीही विकासाच्या प्रभावाखाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेली ब्राझीलमधील निवडणूक हवामान बदल आणि ॲमेझॉनचे जंगल याच मुद्द्यावर लढली गेली.

मेक्सिकोत बहुविध पीक पद्धती

एकेकाळी सुजलाम् सुफलाम् मेक्सिको आज सततचा दुष्काळ आणि उष्णतेने घेरला आहे. वारंवार येणारी वादळे, नद्यांच्या पुराने येथील शेती उध्वस्त होत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. आता उपाय शोधताना येथील प्रत्येक शेतकरी शेतात स्वखर्चाने तलाव उभारून पावसाचे पाणी साठवतो. दुष्काळ प्रतिबंधक वाणाची लागवड करतो. ठिबक सिंचनास त्याने प्राधान्य दिले आहे. एकच एक पीक न घेता बहुविध पीक पद्धती स्वीकारली आहे. पिकांचे अवशेष तो शेतात पसरून ठेवतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. मेक्सिकोचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शासन समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवते.

Agriculture Climate Change
Climate Change : ‘एल निनो’ काळामध्ये हवामानातील बदल

केरळचा धडा महत्त्वाचा

केरळमध्ये पूर्वी सर्वांत जास्त भातशेती होती. पण मजूर, कामगार संघटना, त्यांचे वारंवार होणारे संप यामुळे ती नुकसानीत जाऊ लागली. आज केरळमध्ये ७५ टक्के तांदूळ तेलंगणातून येतो. केरळातील अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकून त्यावर सिमेंटची गृहसंकुले उभी केली आहेत. आज वातावरण उष्ण करताना ती पर्यावरणाचे नुकसान करीत आहेत. ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी हजारो शेतकऱ्यांच्या उपजाऊ बागायती जमिनी ताब्यात घेणे म्हणजे देखील हवामान बदलास आमंत्रणच नव्हे काय? कुठलेही संकट आपोआप येत नसते. आपणच त्यास आमंत्रित करत असतो. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्णय दिला आहे. त्यात म्हटले आहे की हवामान बदलामुळे नागरिकांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांची जबाबदारी शासनाचीच आहे. ‘द युरोपियन कोर्ट ऑफ ह्यूमन राइट्‍स’ यांचेही हेच म्हणणे आहे.

पूर प्रतिकारक भाताच्या जाती

हवामान बदलाचा पहिला दृश्य परिणाम समुद्रावर आढळतो. पाण्याची पातळी वाढून लाटा उंच होतात. समुद्राचे पाणी किनाऱ्यालगतच्या भातशेतीत घुसून सगळी जमीन नापिक करते. आज तमिळनाडू, कर्नाटक, केरळ किनाऱ्यालगत लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी शेती सोडून ‘मनरेगा’त काम करण्यास सुरुवात केली. अनेकांनी शहरांकडे स्थलांतर केले. अशावेळी हरितक्रांतीचे जनक कै. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या संस्थेने नापीक जमिनीवर शाश्‍वत उत्पादन देणाऱ्या भातजाती विकसित केल्या. प्रायोगिक तत्त्वावर त्यांचे वाढलेले उत्पादन दाखविले. शेतकऱ्यांची खात्री पटून ते पुन्हा शेतीकडे वळले. त्यातून शहरांकडील स्थलांतर थांबवले नागालँड, मणिपूरमध्ये उंच वाढणाऱ्या भाताच्या पारंपरिक जाती आहेत. नदीचे पाणी वेगाने वाहून शेतात घुसले तरी त्या जमिनीवर खाली वाकून नदीच्या पाण्याचा सन्मान करतात. पाणी ओसरल्यावर पुन्हा ताठ उभारतात. शास्त्रज्ञांनी या जातींवर संशोधन करून त्याचे बियाणे मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले. ज्यांची शेती नदीच्या प्रभावाखाली आली त्यांना या बियाण्याचा लाभ दिला. अशी असंख्य उदाहरणे उत्तर पूर्वेकडील राज्यांत पाहावयास मिळतात.

...या उपायांची वाट धरावी लागेल

हवामान बदलास कारणीभूत अनेक वायूंपैकी मिथेन आहे. भातशेतीत पाणी साठवून ठेवल्यास अधिक मिथेन तयार होतो. त्याला उत्तर म्हणून आसामचा प्रयोग घेता येईल. येथील शेतकरी ‘अल्टरनेट वेट ॲण्ड ड्राय’ (AWD) पद्धतीने योग्य पाणी देऊन भाताचे जास्त उत्पादन घेतात. त्यासाठी पाण्याचा ताणही देतात. असा प्रयोग कोकणातही होऊ शकतो. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना अशा तंत्रज्ञानाबाबत शिक्षित करायला हवे.

पंजाबमध्ये मजुरांची कमतरता असल्याने शेकडो एकरांवरील गहू, भाताचे अवशेष जाळले जातात. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणावर कर्ब वायू तयार होतो. हे थांबावयास हवे.

शास्त्रीय पद्धतीचा वापर न केल्यास वापरलेल्या युरियातील ५० ते ६० टक्के वाया जातो. त्यातून नायट्रस ऑक्साइड हा घातक वायू तयार होतो. त्यामुळे युरिया वापराचे शास्त्रीय तंत्र व स्वरूपे समजावून घ्यायला हवे.

पावसाचा प्रत्येक थेंब शेतात मुरवायला हवा. बहुविध पीक पद्धतीचा अवलंब हवा.

भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा थांबवावा. कीडनाशके, रासायनिक खतांचा वापर नियंत्रित हवा.

वातावरण बदल, त्यास जोडलेली वाढती उष्णता यांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच शिक्षक आणि शास्त्रज्ञ व्हायला हवे.

नदी म्हणजे फक्त गाळाचा उपयोगी स्रोत न समजता लोकसहभागातून ती वाहती करायला हवी.

शेताच्या बांधावर, विहिरीकाठी, शेततळ्यांजवळ वृक्ष लागवड हवी. मातीतील उपयुक्त जिवाणू, पीक अवशेष, पक्ष्यांचा आदर करायला हवा.

बदललेले ऋतुमान आणि अनियमित पाऊस.

धान्य उत्पादनाचे मोठे नुकसान.

वाया जाणारी रासायनिक खते, कीडनाशके.

शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा, त्यातून निर्माण होणारा कर्जबाजारीपणा.

शासनाकडून मिळणाऱ्या भरमसाट सवलती. त्यातून निर्माण होणारा भ्रष्टाचार.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेगाने होत असणारे ग्रामीण भागातील स्थलांतर.

डॉ. नागेश टेकाळे ९८६९६१२५३१

(लेखक हवामानबदल व कृषी समस्यांचे अभ्यासक व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com