Climate Changes
Climate ChangesAgrowon

Climate Change : हवामान बदलाचा करूया कृतिशील सामना

Article by Dr. Ranjan Kelkar : दरवर्षी २३ मार्च रोजी ‘जागतिक हवामानशास्त्र दिन’ साजरा केला जातो. वर्ष २०२४ साठी ‘हवामान बदलाचा कृतिशील सामना’ या संकल्पनेवर (थीम) काम करायचे आहे. पृथ्वीची तापमानवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आता अनिवार्य आहे.

Climate Change Effects : मागील काही वर्षांपासून हवामानात बदल होत असल्याची जाणीव सर्वांना झालेली आहे पण हवामान बदलाचा सामना सर्वांत जास्त करावा लागत आहे तो शेतकऱ्यांना! कारण शेतीचा हवामानाशी थेट संबंध आहे. हवामान बदल शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवास येत आहे. कधी कधी मुळीच अपेक्षा नसताना पाऊस पडतो.

कधी अचानकपणे गारपीट होते. कधी उभी पिके वादळी पावसात नष्ट होतात. मॉन्सूनचे येणे आणि परतणे मागे-पुढे होत राहते आणि पावसात खंडही पडत असतो. शेतकऱ्यांना या गोष्टींचा सामना स्थानिक पातळीवर करायला लागत असला, तरी त्यांचा उगम जागतिक पातळीवरील प्रक्रियांमध्ये आणि दूरवरच्या घटनांमध्ये झालेला असतो.

म्हणून अनुभवी शेतकरी आकाशाकडे पाहून हवामानाचा स्थानिक अंदाज बांधू शकत असले, तरी हवामानशास्त्रज्ञांचा सल्ला हवामानाच्या अधिक व्यापक माहितीवर आधारलेला असल्याने तो विचारात घेणे उपयोगी ठरते.

जागतिक हवामानशास्त्रीय संस्था

कोणत्याही देशाच्या हवामानशास्त्रज्ञांना फक्त त्यांच्याच देशाची नाही, तर दुसऱ्या प्रदेशांच्या हवामानाची माहिती असणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, ‘एल निनो’ व ‘ला निना’ या प्रक्रिया दूर प्रशांत महासागरावर होत असल्या, तरी त्या भारतीय मॉन्सूनशी संबंधित असल्याने त्यांची अद्ययावत माहिती आपल्या शास्त्रज्ञांना करून घ्यावी लागते.

काही चक्रीवादळे बंगालच्या उपसागरावर निर्माण होऊन पुढे बांगलादेश अथवा म्यानमारकडे वळतात. तसेच अरबी समुद्रावरील काही चक्रीवादळे पाकिस्तान किंवा ओमानच्या दिशेने जातात. अशा परिस्थितीत आपल्या या शेजारी देशांना पूर्वसूचित करायचे काम भारतीय हवामानशास्त्रज्ञ करतात.

देशादेशांमध्ये हवामानविषयक माहितीची देवाणघेवाण सुलभतेने आणि विनाविलंब करता यावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विद्यमाने जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेची (WMO) स्थापना २३ मार्च १९५० रोजी केली गेली आणि तिचे मुख्यालय स्वित्झर्लंड देशात जिनेव्हा शहरात उभारले गेले.

Climate Changes
Climate Change : तापमानातील बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम

जगातील विविध देशांतील हवामानशास्त्रीय पद्धतीत सुसूत्रता आणण्याचे कार्यही ही जागतिक संस्था करते. तापमान, आर्द्रता, वायुदाब, पाऊस, वारा अशा घटकांच्या नोंदी करण्यासाठी विभिन्न देशांत विभिन्न प्रकारची उपकरणे वापरली जातात. ती उपकरणे वेगवेगळ्या बनावटींची असली, तरी ती उच्च दर्जाची असावीत आणि त्यांच्या नोंदी विश्‍वसनीय व तुलना करण्यास योग्य असाव्यात, याची काळजी ही संस्था घेते.

जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेच्या १९५० मध्ये झालेल्या स्थापनेमध्ये भारताचा मोठा वाटा राहिला आहे. तेव्हापासून भारताने या जागतिक संस्थेच्या कार्यात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. पुण्यातील प्रादेशिक केंद्रात भारतीय हवामानशास्त्रज्ञ प्रगतिशील देशातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असतात.

दक्षिण आशियायी देशांचे प्रतिनिधी दरवर्षी पुण्यात येऊन एकत्रितपणे मॉन्सूनचा आढावा घेत असतात. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र हे सध्या जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. अशा प्रकारे हवामानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व आहे जे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.

जागतिक हवामानशास्त्र दिन

हवामानशास्त्राच्या योगदानाची जनसामान्याला जाणीव व्हावी म्हणून दर वर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन जगभर साजरा केला जातो. त्या दिनानिमित्त दर वर्षी एक नवीन विषय घोषित केला जाऊन त्यावर विशेष भर दिला जातो. वर्ष २०२४ साठी ‘हवामान बदलाचा कृतिशील सामना’ हा विषय निवडला गेला आहे.

हवामान बदलाविषयी केवळ भाषणे करण्याची किंवा संकल्प करण्याची वेळ निघून गेली असून, आता भरीव कृती करण्याची वेळ आली आहे हे त्यामागचे आवाहन आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान कित्येक वर्षे सातत्याने वाढत गेले असून, २०२३ हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. २०२३ चे तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा सुमारे दीड अंश अधिक होते.

पृथ्वीची तापमानवाढ नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आता अनिवार्य आहे. भारतात अशा दिशेने प्रयत्न सुरूही आहेत. त्यात सौरऊर्जा तसेच पवनऊर्जा मोठ्या प्रमाणात रोजच्या वापरात आणण्यात येत आहे. बॅटरीवर चालणारी विद्युत वाहने आता रस्त्यावर दिसू लागली आहेत. हे नवे तंत्रज्ञान जितके स्वस्त होईल तितके ते लोकप्रिय होईल. परिणामी, हवेचे प्रदूषण कमी होईल, कार्बन डायऑक्साइड वायूचे उत्सर्जन घटेल आणि तापमान वाढीलाही आळा बसेल.

Climate Changes
Climate Change : ‘एल निनो’ काळामध्ये हवामानातील बदल

भविष्यातील परिस्थिती

हवामान बदलाविषयी इतके बोलले जात आहे, की भविष्याची चिंता वाटणे साहजिक आहे. पृथ्वीचे तापमान वाढतच राहिले तर बर्फाचे साठे वितळतील, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, किनाऱ्यावरील नगरे पाण्यात बुडतील, चक्रीवादळे विकराळ बनतील, त्यांची संख्या वाढेल, ढगफुटी व वादळी पावसाच्या घटना वाढतील, असे अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. ते ऐकून आपण घाबरून जाऊ नये.

भूतकाळातही भारताला आपत्तींचा सामना करावा लागला आहे, आणि त्यांचा आपण यशस्वीपणे सामनाही केला आहे, हे लक्षात घ्यावे. एकेकाळी आपल्या देशात वारंवार भीषण दुष्काळ पडे. अमेरिकेसारख्या संपन्न देशातून आपल्याला गव्हाची आयात करावी लागे. लोकांना रेशनच्या दुकानांत रांगेत उभे राहून वाट पाहावी लागत असे. काही वर्षे तर अशी गेली, की भारतीय जनतेला आठवड्यात एकदा उपास करावा लागायचा, इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा होता.

नंतर १९६०च्या दशकात आपल्या देशात हरितक्रांती झाली. शेतीच्या नव्या पद्धती आल्या. नवे तंत्रज्ञान आले. हवामानाविषयी योग्य सल्ला शेतकऱ्यांना मिळू लागला. हळूहळू अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आणि आज भारत अन्नधान्य निर्यात करणारा देश झाला आहे. १९५० मध्ये भारताचे वार्षिक अन्नधान्य उत्पादन केवळ ५० दशलक्ष टन होते, ते आता ३३० दशलक्ष टन आहे. मागील ७५ वर्षांत वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण ३० टक्के वाढले आहे,

वैश्‍विक सरासरी तापमान एका अंशाने वाढले आहे, हवामानातील अतिरेकी घटनांची संख्या वाढली आहे, नुकसानकारक चक्रीवादळे भारतावर येऊन गेली आहेत. अशा सर्व विपरीत गोष्टींचा आणि संकटांचा सामना करून आपण आपले जीवनमान सुधारले आहे, आयुष्यमान विस्तारले आहे आणि शेतीचे उत्पादन सहा पट वाढवले आहे. भूतकाळात आपण हे जे साध्य केले आहे त्याचा आपण आढावा घेतला, तर आपला आत्मविश्‍वास वाढेल आणि भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यास आपण सक्षम बनू शकू.

(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com