Organic Farming: सेंद्रिय शेतीचा न सुटणारा पेच

Natural Farming: सेंद्रिय शेती हा एक निसर्गपूरक, पर्यावरणास अनुकूल असलेला पर्याय असला तरी त्यात अनेक अडचणी आणि पेच आहेत. सरकारची अनास्था, शेतकऱ्यांचा संघर्ष आणि बाजारपेठेची अपुरी तयारी यामुळे सेंद्रिय शेतीला मुख्यधारेत आणण्याची प्रक्रिया जास्त कठीण बनली आहे.
Seed Festival 2025
Seed Festival 2025Agrowon
Published on
Updated on

Farming Challenges: सेंद्रिय शेती ही निसर्गपूरक, निवांतपणे जगण्याची आदर्श शैली आहे. ज्यांना केवळ पैशासाठी शेती करण्याची गरज नाही, त्यांनी सेंद्रिय शेतीत जरूर प्रयोग करायला हवेत. मात्र हे सगळ्यांना जमेलच असे नाही. इतक्या वर्षांच्या प्रचारानंतरही सेंद्रिय शेती करणाऱ्यांची संख्या टक्केवारीत सांगण्याइतकीही झालेली नाही. सेंद्रिय शेती बोलायला सोपी व कसायला अवघड आहे. तरीही हे सगळे लोक चिकाटीने ती करीत आहेत, याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल. मातीशी नातं असलेले लोकच ही शेती करू शकतात.

गेल्या आठवड्यात नागपूरला बीजोत्सव कार्यक्रमाला गेलो होतो. दिवसभरात २५-३० स्टॉलधारकांशी बोललो. त्यातील बरेच जण ओळखीचे होते. गतवर्षी वर्धा येथे झालेल्या बीजोत्सवात त्यांची भेट झाली होती. त्या वेळी मी त्यांच्याशी सविस्तर बोलून त्याच्या नोंदी फेसबुकवर केल्या होत्या. साहजिकच मला भेटून ते खूष झाले. याच कार्यक्रमात ‘आनंददायी शेती’ या विषयावर माझीही मुलाखत झाली. त्यामुळं अनेक जण माझ्याशी मोकळेपणाने बोलले.

बीजोत्सवात सहभागी असलेले लोक शेती-मातीशी जोडले गेलेले, शेतीवर प्रेम असलेले, पारंपरिक सेंद्रिय शेतीचा आग्रह धरणारे आहेत. बीजोत्सव ही एक चळवळ असून सेंद्रिय शेतीचा प्रसार करणं आणि या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं, ही त्यांची भूमिका आहे. सुरक्षित आणि स्वादिष्ट आहारासाठी परंपरागत बियाणेच सुयोग्य असल्याचं त्यांचं मत आहे. हे मत जनमानसात रुजवून ‘सुरक्षित आहार आणि संतुलित पर्यावरण’ चळवळ विकसित करण्याचा बीजोत्सव हा एक प्रयत्न असल्याचे प्राची माहूरकर यांनी सांगितले.

Seed Festival 2025
Agricultural Development: कसोटी धोरणात्मक कौशल्याची!

बीजोत्सवात बियाण्यांशिवाय सेंद्रिय शेतीमालाची विक्रीसुद्धा होते. ग्राहकांचा प्रतिसादही चांगला होता. रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके आणि जीएम बियाणे यामुळे आज माती आणि पाणी सुद्धा प्रदूषित झालंय. हे थांबायला हवं, असंही या चळवळीला वाटतं. बीजोत्सवात ग्राहकांचे प्रबोधनही केले जाते. आजही बहुतांश ग्राहक बिनकिडीचा, देखणा, चकचकीत भाजीपाला पसंत करतात. असा शेतीमाल वारंवार विषारी रसायनांची फवारणी करून कीडमुक्त ठेवल्या जातो. कृत्रिमरीत्या पिकविलेली केळी, आंबेसुद्धा असेच प्रकृतीसाठी घातक असतात. या बाबी ग्राहकांच्या लक्षात आणून दिल्या जातात. एकंदरीत सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे व यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं हा बीजोत्सवाचा हेतू आहे. हा बीजोत्सव सुरुवातीपासून जनाधारित आहे. मित्रसंस्था, मित्रमंडळी, ग्राहक इ. कडून मिळणारे आर्थिक साह्य हे बीजोत्सवाचे स्रोत आहेत.

वसंत भाऊ फुटाणे, सतीश गोगुलवार, विनय फुटाणे, रोहन राऊत, प्राची माहूरकर, चिन्मय फुटाणे, प्रताप मारोडे, प्रभाकर पुसदकर, श्यामला सन्याल, कीर्ती मंगरूळकर, आकाश नवघरे, भारती झाडे हे बीजोत्सवाच्या संयोजनात सक्रिय असतात. कमीत कमी खर्चात, साधेपणाने हा उत्सव होतो.

नागपूरमधील या बीजोत्सवात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा १० राज्यांतून ७५ स्टॉलधारक आले होते.

भाबडे कार्यकर्ते

सेंद्रिय शेतीचा प्रचार करणारे हे सगळे लोक तसे भाबडे आणि निरुपद्रवी आहेत. शेतीतील सगळ्या प्रश्‍नांवर सेंद्रिय शेती हा रामबाण उपाय आहे, असं त्यांना वाटतं. अर्थात, त्यांचं सगळंच म्हणणं काही शास्त्रीय आधारावर टिकणारं नाही. पण या तंत्राने शेती केल्याने तसं काही नुकसानही नाही. या लोकांची सेंद्रिय पद्धतीवर श्रद्धा असल्याने ते प्रामाणिकपणे त्या पद्धतीने शेती करतात. केवळ काही पुस्तकं आणि व्हिडिओ व विविध शेतकऱ्यांचे या संदर्भातील अनुभव हेच प्रमाण मानलं जातं. मात्र याला संशोधन म्हणता येणार नाही.

सेंद्रिय शेती करणाऱ्यांमध्येही मतमतांतरे आहेत. प्रामाणिकपणे या शेती पद्धतीचा अवलंब करणारे निष्ठावंत लोक जसे आहेत, तसेच बऱ्याच जणांनी आपापले मठ तयार केल्याचेही दिसते. विषमुक्त अन्न हा यांचा आवडता शब्द आहे. त्यामुळं अनेक जण आकर्षित होतात. बऱ्याच रोगांवर सेंद्रिय शेती पद्धतीतील जैविक औषधं लागू पडत नाहीत. त्याचं नेमकं उत्तर त्यांच्याकडं नाही. ते गांडुळ खताचे पुरस्कर्ते आहेत. हे खत चांगलंच आहे. पण गांडुळ हे डुकरांचं आवडतं खाद्य आहे.

गांडुळ खाण्यासाठी डुकरं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान करतात. हे नुकसान कसं थांबवायचं, याचं उत्तर त्यांच्याकडं नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागतं. शेतीत माणसं मिळत नाहीत. ती कुठून आणायची? असे अनेक प्रश्‍न आहेत; जे या तंत्राच्या मर्यादा स्पष्ट करतात. मी काही सेंद्रिय शेतीचा विरोधक नाही. मात्र आंधळा समर्थकही नाही. आम्ही आमच्या बागेपुरती सेंद्रिय शेतीच करतो. सोयाबीनसह खरिपाची सगळी पिकं सेंद्रिय पद्धतीने करण्याचा गतवर्षी प्रयत्न केला. तसं करणं मोठ्या नुकसानीचं कारण ठरण्याची शक्यता दिसल्याने अर्ध्यात थांबवला.

Seed Festival 2025
Agricultural Challenges : शेतकऱ्यांच्या सोन्याला झळाळी कधी?

हरितक्रांतीचे टीकाकार

सेंद्रिय शेती ही मानवी आरोग्यासाठी फायद्याची आहे; पण ती आज तरी व्यवहार्य, परवडणारी नाही. ती तशी असती तर आज शेतकरी मोठ्या संख्येने या तंत्राकडे वळले असते. सेंद्रिय शेती समर्थकांसाठी शेतीतील सगळं ‘जुनं ते सोनं’ आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचं ते नको तेवढं कौतुक करतात. मात्र हे म्हणणं पूर्णपणाने सत्य नाही. पारंपरिक बियाण्यांचा वापर असतानाच्या काळातच शेती उत्पादन कमालीचं घटलेलं होतं. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवणं अशक्य झालं. अन्नटंचाई निर्माण झाली.

भारताला परदेशातून निकृष्ट दर्जाचा गहू व ज्वारी मागवून लोकांना जगवावं लागलं. यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून हरितक्रांती आली. नवे संकरित बियाणे, खते, औषधे आली. त्यामुळे उत्पादन वाढलं. पुढे भारत अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. हे वास्तव असतानाही आजही ते हरितक्रांतीवर टीका करतात याचं आश्‍चर्य वाटतं. हरितक्रांती होण्यापूर्वीचा शेतकरी सुखी, समाधानी होता हे म्हणणं भाबडेपणाचं आहे. त्याला वास्तवाचा आधार नाही. सगळं जग झपाट्याने बदललंय. तिथं शेतीतही बदल होणारच. गोमूत्र आणि शेणाबाबतचेही यांचे दावेही असेच अवास्तव आहेत.

अति काहीही वाईटच. रासायनिक खतं, कीटकनाशकांचा बेसुमार वापर हा आरोग्याला घातक आहे. त्यामुळे मातीही निकृष्ट बनतेय, याबद्दल कोणाचं दुमत नाही. पण एकरी जास्तीत जास्त उत्पादन काढून, जास्त पैसे मिळविण्याच्या लालसेपोटी ते घडतंय. मुळात अधिक उत्पादन म्हणून अधिक फायदा होतोय, असं नाही. रासायनिक खतं, कीटकनाशकांचा अतिवापर चुकीचाच आहे. पण तो रोखणार कोण व कसा?

निसर्गपूरक जीवनशैली

खरं तर सेंद्रिय शेती ही निसर्गपूरक, निवांतपणे जगण्याची आदर्श शैली आहे. ज्यांना केवळ पैशासाठी शेती करण्याची गरज नाही, त्यांनी सेंद्रिय शेतीत जरूर प्रयोग करायला हवेत. मात्र हे सगळ्यांना जमेलच असे नाही. इतक्या वर्षांच्या प्रचारानंतरही सेंद्रिय शेती करणाऱ्यांची संख्या टक्केवारीत सांगण्याइतकीही झालेली नाही. याचे कारण सगळ्यांना माहीत आहे. सेंद्रिय शेती बोलायला सोपी व कसायला अवघड आहे. तरीही हे सगळे लोक चिकाटीने ती करीत आहेत, याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल. मातीशी नातं असलेले लोकच ही शेती करू शकतात.

सरकारच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह

मुळात सरकारला खरोखरच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. सरकार वारंवार सेंद्रिय शेतीच्या घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र या शेतीला मदत करण्याची सरकारची भूमिका नाही. सेंद्रिय शेतीचं संशोधनावर आधारित शास्त्र विकसित करण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीमाल पिकवण्यासाठी अधिक कष्ट व पैसा लागत असल्याने या शेतीमालाला जास्तीचा भाव मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीमालाच्या बाजारपेठा निर्माण करणं हे काम सरकारचंच आहे. अशा शेतीतून भरपूर पैसे येऊ लागले तर शेतकरी आपोआप याकडे वळतील. सरकारची आतापर्यंतची वाटचाल बघितली तर सरकारला सेंद्रिय शेतीत फारसा रस नाही, असेच दिसते.

सेंद्रिय शेतीला बरे दिवस यायचे असतील तर ग्राहकांचीही या मालासाठी अधिक पैसे मोजायची तयारी असायला हवी. पण बहुतांश लोकांना शेतीमाल स्वस्तच हवा आहे. ग्राहकांची ही मानसिकता कशी बदलायची, हाही प्रश्‍नच आहे. शेतीमातीवर प्रेम करणाऱ्या, निसर्गपूरक जगू इच्छिणाऱ्या लोकांची एक आनंददायी चळवळ असंच मी बीजोत्सवाचं वर्णन करेन. परंतु सरकारची शेतकरी विरोधी धोरणं ही खरी समस्या आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळू नये हीच सरकारची अधिकृत नीती आहे. अशा स्थितीत कुठल्याही तंत्राने शेती केली तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडण्याची शक्यता नाही. ही निरगाठ कशी सोडवायची, हा खरा पेच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com