Sea Foods : समुद्री अन्नाची अनोखी दुनिया

Wild Seafood : खेकड्यांची कोशिंबीर, काळ्या खेकड्यांचे भरीत, बोंबीलची चटणी, वांग्याच्या भाजीत सुकट, मांदेली, मुऱ्हे, चिंगळ्या, कोळंबी, हलवा, बांगडा, सुरमई, पापलेट, शिंगाडा... ही एक अनोखी दुनिया आहे.
Sea Foods
Sea FoodsAgrowon
Published on
Updated on

नीलिमा जोरवर

Indian Wild Sea Foods : खेकड्यांची कोशिंबीर, काळ्या खेकड्यांचे भरीत, बोंबीलची चटणी, वांग्याच्या भाजीत सुकट, मांदेली, मुऱ्हे, चिंगळ्या, कोळंबी, हलवा, बांगडा, सुरमई, पापलेट, शिंगाडा... ही एक अनोखी दुनिया आहे. रानभाज्यांप्रमाणे समुद्री अन्न अर्थात Wild Seafood समजून घेणे मोठे रोचक आहे. फार पूर्वीपासून मुख्य अन्न म्हणून त्यांचे सेवन केले जाते. मासेमारी ही समुद्रकिनारे, तळ्याकाठी, नदीकाठी, इतकेच काय तर अतिपावसाच्या भूभागातही केली जाते. विविध गावांत फिरताना आलेले अनुभव व माझ्या मानवी बुद्धीत साठवलेली माहिती यांचा कोलाज म्हणजे आजचा लेख.

समाज माध्यमांमुळे अगदी कमी वेळात माहितीचे तुकडे आपल्यासमोर येत राहतात. त्यातून समोर येतो तो विषय नुकताच आपण कुणाशी बोललेलो असतो, चर्चा केलेली असते किंवा स्वतःच शोधलेली असते. कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) हे हेरलेले असते व आपल्याला हवी ती माहिती पुढ्यात आणली जाते. तर असाच एक माहितीचा तुकडा माझ्यासमोर आला, ज्यात एक प्रसिद्ध शेफ ‘खेकड्यांची कोशिंबीर’ बनवत होता.

काकडीची किंवा इतर भाज्यांची कोशिंबीर आपण ऐकलेली असते पण खेकड्यांची कोशिंबीर ही कल्पनाच भन्नाट वाटते. बघितले तर पारंपरिक कोकणी पद्धतीने थोडासा आधुनिक पदार्थांचा ‘ट्विस्ट’ देत त्याने खेकड्यांची कोशिंबीर बनवलेली. कृत्रिम बुद्धिमत्तेने समोर आणलेल्या या माहितीच्या तुकड्याने माझ्या मानवी बुद्धिमत्तेत साठवलेले असेच माहितीचे तुकडे अर्थात आठवणी जाग्या झाल्या. वेगवेगळ्या राज्यांत फिरताना, जंगलात तर कधी विविध आदिवासींसोबत हिंडताना अनुभवलेले क्षण समोर आले. त्यावर मी कधी लिहिले नव्हते.

‘समुद्री अन्ना’बद्दल पाककृती भरपूर मिळतात; पण त्याच्या भूगोलाविषयी, सांस्कृतिकतेविषयी फारसे संदर्भ इंटरनेटवर दिसत नाहीत. पुस्तके उपलब्ध असावीत; पण मी ती अजून शोधली नाहीत. रानभाज्यांप्रमाणे (Wild Vegetables) समुद्री अन्न अर्थात Wild Seafood समजून घेणे मोठे रोचक आहे. फार पूर्वीपासून मुख्य अन्न म्हणून त्यांचे सेवन केले जाते. मासेमारी ही समुद्रकिनारे, तळ्याकाठी, नदीकाठी, इतकेच काय तर अतिपावसाच्या भूभागातही केली जाते. विविध गावांत फिरताना आलेले अनुभव व माझ्या मानवी बुद्धीत साठवलेली माहिती यांचा कोलाज म्हणजे आजचा लेख.

Sea Foods
Indian Foods : भाकरीने घडवलेली खाद्यसंस्कृती

परंपरागत शहाणपण

उम्भ्रांडे हे डोंगर पायथ्याशी असणारे एक छोटे गाव. अगदी १०-१५ उंबऱ्यांचे. गावाच्या एका बाजूला उंच वतवडचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला मोठा ओढा. डोंगरावरचा पडणारा पाऊस नाले-बांधातून खळखळत वाहतो, उंच डोंगरावरून खालच्या सपाटीवर पडणारा एक मोठा धबधबा पुढे मोठा ओढा बनतो व गावाला अर्धगोल वळसा घालत पुढे वाहत जातो. ओढ्याचे पाणी वाढले की गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. अगदी पलीकडे आपल्या शेतात आलेल्या शेतकऱ्यांना देखील ओढ्याचे पाणी ओसरेपर्यंत अलीकडेच थांबावे लागते. जंगलातून मिळणाऱ्या रानभाज्या इथे भरपूर आहेत. तसेच ओढ्या-नाल्यांतून मिळणारे मासे व खेकडे देखील आहेत. एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इथल्या आज्जीने काळे खेकडे आणलेले. खेकड्यामध्ये देखील पांढरा, तांबडा, काळा असे प्रकार असतात. काळे खेकडे हे खूप भारी असतात म्हणे! ते आकाराने मोठे असतात. खेकडे हे कंबरेवर उत्तम औषध मानले जाते. आज्जीने या खेकड्याचे उत्तम भरीत बनवले होते. हो, आपण जसे भरलेले वांगे बनवतो तसेच खेकड्याचे भरीत. जंगलातील अनेक भागांत खेकडा खाल्ला जातो; पण काहींच्या देव्हाऱ्यात किरवा हा देव असतो. किरवा म्हणजे खेकडा. ज्यांचा देव किरवा आहे, त्यांनी खेकडा खायचा नसतो. सर्वांनीच खेकडे खाल्ले तर ही प्रजातीच संपू शकते, त्यामुळे त्याचा शाश्‍वत वापर करावा, अशी त्यामागची भावना असू शकते.

डोंगर, ओढे, जंगल आणि आदिवासी हे सामान्यतः एकत्रच पाहावयास मिळतात. एकदा असेच एका गावात बसलेले होते. या वेळी शेतीची कामे नव्हती, त्यामुळे लोक ओटी-ओटीवर बसून गप्पा करत होते. तितक्यात पावसाची एक मोठी सर आली आणि गेली. दोन-तीन आज्ज्या लगबगीने एका नाल्याकडे पळाल्या. मला काही समजेना. अगदी काही वेळातच त्या परत आल्या. तेव्हा त्याचा उलगडा झाला. पावसाची सर जोरात येते आणि जाते तेव्हा नाल्यांमध्ये असलेले छोटे मासे पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत खाली वाहून येतात. आज्ज्यांनी एका छोट्या नाल्याला आडवा कपडा लावला तेव्हा त्यांना हे बारीक मासे मिळाले. त्या त्यांना ‘मुऱ्हे’ म्हणतात. ते अगदीच ओंजळभरच होते. एक आज्जी म्हटली, ‘‘एवढे आम्ही तीन कुटुंबं खाणार. जास्त खायचे नाहीत. जास्त खाल्ले की पोट खराब होणार!’’

Sea Foods
Sea Biodiversity : वैविध्यपूर्ण सागरी दुनिया...

जीवनदर्शन व अन्नसंस्कृती

जंगलात राहणाऱ्या माणसांकडे त्यांच्या पूर्वजांच्या अनुभवातून मिळालेला हा ज्ञानाचा वारसा त्यांची अन्नसुरक्षा अबाधित ठेवतो. आमच्या गावात तर मोठे धरण आहे. धरणात गोड्या पाण्यातील माशांची पैदास केली जाते. धरणाने अडवली असली तरी अढळा नदी मस्त वाहते. गावातील एक आजी नेहमी मळईचे (मळीचे) मासे विकायला आणायची. हे बहुतेक मुऱ्हे मासे असतात तसेच असायचे. कधी ती चिंगळ्या तर कधी वाम / वामबोट्या विकायला आणायची. कधी कधी केशरी रंगाचे झिंगे किंवा काळ्या रंगाचे इचू मासे देखील असायचे तिच्याकडे. एका नदीमुळे आणि धरणामुळे हे ‘पाण्यातील जंगली अन्न’ इथे मुबलक असले तरी सर्वांच्या खिशाला परवडेल असे नव्हते. त्यामुळे अतिप्रमाणात मासेमारी व्हायची नाही. अर्थात, हे पंचेवीस वर्षांपूर्वीचे चित्र होते. इथलीच माझी बालमैत्रीण डब्यात नेहमी बोंबीलची चटणी आणायची. ही चटणी कधीच माशांच्या वासाची नसायची. तिसरीच्या वर्गात खाल्लेल्या त्या चटणीची चव अजूनही आठवणीत ताजी आहे.

बोंबील, सुके मासे, मांदेली, सुकट असे सुक्या माशांचे अनेक प्रकार आजही अनेक गावांच्या आठवडी बाजारात विकत मिळतात. अनेक लोक, विशेषतः गावातील गरीब लोक, दर आठवड्याला ते खरेदी करतात आणि आपल्या जेवणाची लज्जत व पौष्टिकता वाढवतात. भाज्या चविष्ट बनवण्यासाठी जसा कांदा, लसून, शेंगदाणे, खोबरे असे जिन्नस आपण वापरतो तसे इथे भाज्यांना माशांचा फ्लेवर देऊन ‘टेस्ट एन्हान्सर’ म्हणून वापरतात. जसे की वांग्याच्या भाजीत एखादा बोंबील किंवा सुकट वगैरे.

जलअन्नाचा वापर समुद्रकिनारी जास्तच असणार, यात नवल ते काय! लहानपणी जेव्हा आम्ही सुट्ट्यांसाठी मुंबईला असणाऱ्या मावशीकडे जायचो. तेव्हा अनेकदा तिथे असणाऱ्या खारदांड्याच्या समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या खडकांवर लटकलेले ‘सोडे’ भाजीसाठी गोळा करायचो. कोळंबी, हलवा, बांगडा, सुरमई, पापलेट, शिंगाडा असे अनेक मासे असायचे. शहरातल्या मच्छीबाजारातला तो विशिष्ट वास, तिथल्या त्या घट्ट अंबाडा आणि लुगडे नेसलेल्या कोळिणी, अर्नाळ्याच्या किल्ल्यात शिरताना त्याआधी रस्ताभर वाळत घातलेले बोंबील, मांदेली आणि इतर मासे... या सर्व गोष्टी समुद्रावर निर्भर असलेल्या लोकांचे जीवनदर्शन व अन्नसंस्कृती सांगतात.

मानवी हस्तक्षेप

पृथ्वीचा मोठा भूभाग पाण्याने व्यापलेला आहे. आपल्याकडे जमिनीला मर्यादा आहे पण समुद्राला नाही. समुद्रात देखील मासे व इतर अन्न निसर्गतः निर्माण होते; जे एका मोठ्या समूहाला पोषण व अन्नसुरक्षा देते. परंतु इथेही मानवी हस्तक्षेपामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपण फेकलेल्या/निर्माण केलेल्या प्रत्येक रसायनाचा साठा शेवटी नद्यांद्वारे समुद्राकडेच जात असतो. त्यामुळे जलपर्णीसारख्या वनस्पतींची अतिरेकी वाढ होऊन पुरेसा ऑक्सिजन व सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाला पोहोचत नाही. त्याचा परिणाम जलचरांवर होतो. शिवाय समुद्री वाहतुक करताना होणाऱ्या विषारी रसायनांच्या गळतीमुळेदेखील मासे मरतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पूर्वी छोट्या होड्यांतून, बोटीतून होणारी मासेमारी आता यांत्रिक जाळ्यांतून होत असल्याने देखील माशांची संख्या कमी होत आहे.

परंपरागत मासेमारी करणाऱ्या लोकांना शाश्‍वत वापराचे पूर्ण ज्ञान आणि भान असते. कधी मासे, खेकडे पकडू नयेत अशा गोष्टींबद्दल ते ठाम असतात. जगभरात तापमान वाढीचे परिणाम शेतीवर होत आहेत, तसेच ते समुद्रातील अन्नावर देखील होत आहेत. आशिया खंडात सर्वात जास्त समुद्री अन्न खाल्ले जाते. परंतु चीन, जपान, थायलंड, मलेशिया हे देश त्यात अग्रेसर आहेत. चीन मासे खाण्यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच तिथे एकूण जगाच्या ६० टक्के माशांची पैदासही होते. दर माणशी सगळ्यात जास्त मासे खाण्याचे प्रमाण आहे पोर्तुगालमध्ये. इथला माणूस सरासरी दरवर्षी ५५.९ किलो समुद्री अन्न सेवन करतो. मी स्वतः शाकाहारी असले तरी निसर्गामध्ये उपलब्ध असलेले हे पाण्यातील अन्न, त्याविषयीचे पारंपरिक ज्ञान याबद्दल मानव म्हणून आपण जागरूक असावे, असे वाटते. म्हणूनच आहारभान राखताना, जास्त न बोलल्या जाणाऱ्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या, या विषयाकडे विशेष लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.

(लेखिका निसर्ग अभ्यासकआणि कार्यकर्त्या आहेत.)

ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com