Sea Biodiversity : वैविध्यपूर्ण सागरी दुनिया...

Article by Satish Khade : सागराची दुनिया खूपच मोहक, रंजक असून, त्यात रंगबिरंगी हजारो जीव आपले स्वतःचे एक वेगळे रूप, वैशिष्ट्ये घेऊन जगत असतात. बरेचसे अद्‌भुत, अविश्‍वसनीय असेच हे सारे विश्‍व!
Sea World
Sea WorldAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Sea Diversity : सागरी दुनियेची सुरुवात होते वनस्पती आणि प्राणी प्लवंगापासून. ‘प्लवंग’ हे एक पेशीय जीव. त्यांच्या वैशिष्ट्यावरून काही प्राणी तर काही वनस्पती वर्गातले. वनस्पती प्लवंगांचे प्रकार ते प्रकाश संश्‍लेषणासाठी सूर्यप्रकाशातील अतिनिल, गडद लाल, जांभळा इ. पैकी कोणत्या रंगाच्या लहरी वापरतात. त्यानुसार ठरतात. प्राणी व वनस्पती प्लवंगामध्ये खूप विषमता असून,

त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमताही असतात. समुद्रात रात्रीच्या वेळी काही ठिकाणी पाण्यामध्ये चकचकीत उजेड दिसून येतो, ज्यास ‘जीव दीप्ती’ असे म्हणतात. कधी निळा तर कधी हिरवा उजेड तिथे दिसतो. या एकपेशीय सजीवांमध्ये ‘ल्युसिफेरेन’ नावाचा जैवरेणू असतो. त्या रेणूचा ऑक्सिजनबरोबर संयोग झाला की हा प्रकाश पसरतो.

सागरी शैवाळ :

या परिसंस्थेत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या शेवाळाना ‘सी वीड’ म्हणून ओळखले जात असले तरी सागरी शेवाळ व सागरी गवत वेगवेगळे आहे. सूर्यप्रकाश पोहोचू शकणाऱ्या खोलीपर्यंतच शेवाळ वाढत असले, तरी लाटा आदळणाऱ्या खडकाळ भागावर त्यांचे वास्तव्य अधिक असते. भारताच्या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर या शेवाळांच्या ८०० पेक्षा अधिक जाती सापडतात.

त्यांचे वर्गीकरण सामान्यपणे हिरवे, तपकिरी आणि लाल शेवाळ या तीन गटांत करतात. सागरी शेवाळ हे स्वयंपोषी, जलद वाढणारे आणि वाढीसाठी वेगळी जमीन न लागणारे अक्षय अन्नाचे स्रोत आहेत. जमिनीवरील वनस्पतींच्या तुलनेत यांच्या वाढीचा वेग काही पट जास्त असतो. कोरिया, जपान आणि चीन येथील लोकांनी याची शेती करण्याचे तंत्रज्ञान खूप पिढ्या आधीपासूनच आत्मसात केले आहे. अन्नाबरोबरच यातील अनेक शेवाळ हे खते, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने यांच्या निर्मितीतही वापरली जातात.

तपकिरी शेवाळ आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे, कारण त्याचा वापर आइस्क्रीम, जेली निर्मितीत व जखमांच्या मलमांमध्ये केल जातो. लाल शैवालात मोठ्या प्रमाणात प्रथिने असून, भविष्यामध्ये हे मांसाहाराला उत्तम पर्याय ठरू शकतात. अनेक शेवाळ उतिसंवर्धनासाठी ही सर्वांत उत्तम माध्यम मानले जाते. ठरते. समुद्राचे सर्वांत मोठे महत्त्व म्हणजे पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनपैकी ४० ते ६० टक्के ऑक्सिजनची निर्मिती समुद्रातच होते. त्याचबरोबर तितकाच हवेतला कार्बन-डायऑक्साइड शोषून घेतो. ऑक्सिजन निर्मिती बरोबरच अन्नसाखळीतील खूप महत्त्वाचा दुवा म्हणूनही समुद्र शेवाळ कार्यरत आहेत.

Sea World
Cotton Market : ‘सीसीआय’कडून कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू

सागरी गवत :

सगळे जीवनचक्र सागराच्या पाण्याखालीच पूर्ण करणारी ही गवतासारखी दिसणारी व वाढणारी वनस्पती सागराचा तळावर जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो ते सर्व व्यापून टाकते. सागरात अनेक ठिकाणी गवताची कुरणे व महाकुरणे आहेत. समुद्रामध्ये सागरी गवताच्या कुरणावर अवलंबून असलेले प्राणीही बरेच आहेत.

अनेक जलचरांच्या अन्नाबरोबरच हे गवत माशांसाठी मोठा निवारा प्रदान करतात. हे गवत आडवे आणि उभेही वाढते. २०१३ मध्ये केलेल्या एका अभ्यासात काही सागरी गवताच्या प्रजाती या जमिनीवरील पर्जन्य वनांपेक्षा ३५ पट अधिक कार्यक्षमतेने वातावरणातील कार्बन शोषून घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विविध उपयुक्ततेमुळे व्यापारी मूल्यही मोठे आहे. अनेक गंभीर आजारांवरील औषधांची निर्मिती त्यापासून होते. त्यात मेंदूज्वरावरील औषध सर्वांत महत्त्वाचे आहे.

Sea World
Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी परभणीत आंदोलन

स्पंज : जैविक रसायनांचा कारखाना :

पूर्ण स्पंजासारखा सच्छिद्र शरीराचा हा रंगीबेरंगी प्राणी गोड्या पाण्यातही आढळत असला, तरी त्याचे प्रमाण खाऱ्या पाण्यात जास्त असते. शरीरावरील लाखो छिद्रावाटे पाणी व त्यासोबत पाण्यातले प्लवंगही आत घेतात. त्यातील खाद्यकण गाळून घेतात. त्याचे पचन केल्यानंतर शिल्लक घटक उत्सर्जित करतात. छिद्राभोवती असलेल्या काही विशिष्ट पेशी प्राणवायू शोषण्याचे, कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनाचे काम करतात. जगभरात स्पंजांच्या पाच हजारांपेक्षा अधिक जाती असून, त्यांच्या आकारात विविधता आहे. काही गोल्फ किंवा फुटबॉलच्या चेंडूच्या आकाराचे, काही उंच मनोऱ्यासारखे, इतकेच काय पूर्ण माणूसही मावेल इतक्या मोठ्या आकाराचे स्पंज समुद्रामध्ये आढळतात.

स्पंज भरती-ओहोटीच्या क्षेत्रात असतात. समुद्रात उघड्या पडलेल्या खडकांवर, खोल समुद्रात दगडांना किंवा प्रवाळांच्या खडकांना चिकटून वाढताना दिसतात. या अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या बहुपेशीय प्राण्यामध्ये स्वसंरक्षणासाठी काही विशेष शरीररचना नसते. मात्र आपल्या सच्छिद्र शरीरात ते जिवाणू व शेवाळ यांना आसरा देतात. या जिवाणू, शेवाळ यांनी बनविलेल्या जैविक रसायनांवर ते जगतात. ही जैविक रसायने कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत अनेक आजारांच्या उपचारामध्ये महत्त्वाची असल्याचे ताज्या संशोधनातून पुढे येत आहे. तीनशे ते चारशे प्रकारची जैविक रसायने तयार करणाऱ्या या स्पंजांना ‘जैविक रसायनांचा कारखाना’ म्हणूनही ओळखले जाते.

- सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

जमिनीपेक्षाही अधिक वैविध्य हे सागरी प्राणी विश्‍वात आहे. सागरी सस्तन, सरिसृप प्राणी, सरपटणारे पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेले), मृदूकाय, कठीण कवचधारी, कंटकचर्मी (काटे असलेले) कीटक, रंध्री (छिद्रे) असलेले, अंतगृही अशा सर्व वर्गीकरणातील प्राणी सागरी आश्रयस्थानामध्ये खूप समृद्धतेने नांदत असतात. त्यांच्या परस्परांवर आधारित जीवन, अन्नसाखळ्या, अन्न मनोरे विकसित झालेले आहेत. लेखाची शब्द मर्यादा लक्षात घेता आपल्याला फारच कमी प्राण्यांचा आढावा घेता येईल.

देवमासा : हा सर्वांत मोठा जलचर आहे. हा ब्ल्यू व्हेल अंदाजे १०० फूट लांब आणि २०० टन वजन एवढा अवाढव्य असतो. ३३ हत्तींच्या एकत्रित वजनाइतका अवाढव्य. डायनोसॉर युगात याच्याही काही पट मोठे सस्तन जलचर होते.

पाणमांजर : मासे, कालव, खेकडे या आणि अशा प्राण्यांना खाऊन जगणारे पाणमांजर जलीय परिसंस्थेतील खूप महत्त्वाचा दुवा आहे. खाऱ्या पाण्याबरोबरच गोड्या पाण्यातही पाणमांजरांच्या प्रजाती आहेत. प्रवाहाला आडवे बाहेरून बंधारा वाटावा आणि आत मोठे भुयार असे काटक्यांपासून घर बांधून त्यात राहतात. अन्य जलचरांपेक्षा घर बांधणीचे त्याचे वैशिष्ट्य वेगळे ठरते.

डॉल्फिन, सागरी सिंह, सील, समुद्री गाय हे आणि अशा प्रकारचे अनेक सस्तन जलचर आहेत. व्हेल, डॉल्फिन हे सस्तनच्या एका गटात मोडतात. मध्यभागी फुगीर आणि दोन्ही टोकांकडे निमुळती अशी शरीर रचना. नाकपुड्या टाळूजवळ डोळ्यांवरती अशी रचना असते. स्वरयंत्र आणि कान अत्यंत विकसित असतात. त्यामुळे खूप दूरवरूनही हे एकमेकांशी संवाद करतात, संपर्कात राहतात. सील, समुद्री सिंह (सी लायन), वालरस या आणि अशा तीन जातींचा एक वेगळा समूह सस्तन जलचरांमध्ये आहे.

बहुतांशी वेळ पाण्यात पोहण्यात व्यतीत करणारे हे प्राणी प्रजनन व पिलांची काळजी घेण्यासाठी जमिनीवर पाण्याबाहेर काही काळ वास्तव्य करतात. समुद्री सिंहाला बाह्यकर्ण असून, नराच्या मानेवर सिंहासारखी आयाळ असते. ते कळपाच्या रक्षणासाठी गुरगुरतात किंवा आवाज काढतात. हे सस्तन व मांसाहारी प्राणी आहेत. पाण्याखाली संथपणे वावरणाऱ्या मॅन्येटी या सस्तन जलचरलाच खलाशी पूर्वीच्या ‘काळी जलपरी’ समजायचे. यांच्यातल्याच काही उपप्रजाती समुद्र तळाशी उगवलेले गवत व पाणवनस्पती खातात म्हणून यांना समुद्रगायी असेही म्हणतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com