Ratan Tata : लोककल्याणकारी उद्योगपती

Successful Businessman : यशस्वी आणि संपन्न कारकीर्द असलेल्या रतन टाटा या उद्योगपतीने स्वतःचे प्रस्थ कधी निर्माण होऊ दिले नाही.
Ratan Tata
Ratan Tata Agrowon
Published on
Updated on

Businessman Story : काही व्यक्ती अशा असतात, की त्या अनेक उपाध्या मिरवतात; पण त्यांना पूर्ण न्याय देत नाहीत. याउलट काही व्यक्ती अशा असतात, की त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना लाभलेल्या उपाधीमध्येही पूर्ण मावत नाही. ‘उद्योगपती’ रतन टाटा हे असेच उपाधीत न मावणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी टाटा समूहाची उज्ज्वल परंपरा पुढे नेली. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी अगदी कोवळ्या वयात असलेले रतन टाटा यांनी पुढच्या काळात उद्योग चालवले, समूहाचा पसारा वाढवला आणि नावलौकिक सातासमुद्रापारही नेला.

देश उभारणीच्या ध्येयाशी ते पूर्णपणे समरस झाले होते. स्वतंत्र, आधुनिक आणि विकासोन्मुख भारताची वाटचाल आणि त्यांची कारकीर्द यांना वेगळे करताच येणार नाही. अर्थात, ते टाटा घराण्याचेच वैशिष्ट्य होते; अगदी जमशेटजी टाटा यांच्यापासून. स्वातंत्र्यानंतर देशाची गरज होती, ती मोठ्या पायाभूत उद्योगांसाठी भांडवली गुंतवणुकीची. टाटांचा पोलादाचा कारखाना, हे त्याचे ठळक उदाहरण!

Ratan Tata
Ratan Tata Death : उद्योग 'रतन' हरपलं; उद्योगपती रतन टाटांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

देशाच्या प्रवासात १९९१चा उदारीकरणाचा टप्पा हे मोठे स्थित्यंतर होते. रतन टाटा यांचा उद्योग क्षेत्रातील बहराचा काळ उदारीकरणाच्या या टप्प्यावर सुरू होणे हा एक विलक्षण योगच म्हटला पाहिजे. परकी कंपन्यांना आपली दारे सताड उघडी करून देणे म्हणजेच केवळ जागतिकीकरण नव्हे. आपल्यालाही आकाश मोकळे झाले आहे, हे जाणून त्यांनी जॅग्वार, लॅंडरोव्हर ही वाहने उद्योगातील ब्रॅण्ड, तर ‘टेटली’ ही चहाच्या क्षेत्रातील कंपनी विकत घेतली. जगभरात टाटा हे नाव दुमदुमते ठेवले.

सिमेंट, कापड, सौंदर्यप्रसाधने, औषधे याऐवजी सॉफ्टवेअर, दूरसंचार, प्रवासी वाहने, वित्तसेवा, विमा, हवाई वाहतूक अशा उत्पादन-सेवांवर लक्ष केंद्रित केले. टाटा समूहातील वेगवेगळ्या कंपन्यांकडून नाममुद्रेचे स्वामित्वशुल्क घेण्याची कल्पना त्यांचीच. त्या सगळ्यांना नाममुद्रेच्या एका छत्राखाली आणताना ‘ब्रॅण्ड’चे माहात्म्य त्यांनी अधोरेखित केले. ते नुसते शब्दांपुरते नव्हते, त्यामागे कार्यसंस्कृती होती. व्यवस्थापनातील नीतिमूल्ये होती. एक लाखात मोटार निर्माण करण्याची कल्पना साकारत अनेक मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचे रतन टाटा आनंदाने भागीदार बनले.

Ratan Tata
Agriculture Success Story : एकीच्या बळातून फुलले शिवार...

आपल्या उद्योगसमूहाची उलाढाल त्यांच्या काळात चार अब्ज डॉलरवरून शंभर अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. या सगळ्याची जंत्री मोठी आहे, पण त्या पलीकडे होते ते त्यांचे माणूस म्हणून मोठेपण. पिंपरी-चिंचवडमधील टेल्कोच्या फॅक्टरीत आले असताना जेवणाची वेळ झाल्यावर ते कॅण्टीनमध्ये कामगारांबरोबर रांगेत उभे राहिल्याची आणि त्यांच्याबरोबरच जेवल्याची आठवण आजही कामगारांच्या मनात ताजी आहे.

टाटांचा यातला सहजपणा जास्त महत्त्वाचा. २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उद्‍ध्वस्त झालेले ‘ताज’ हॉटेल त्यांनी उभे केलेच; पण या भीषण घटनेत सापडलेल्यांना मदत करताना ‘गेटवे ऑफ इंडिया’जवळ चणे-फुटाणे विकणाऱ्या गरीब मुलांनाही मदत करायला ते विसरले नाहीत. रतन टाटांसारखी माणसे पुन्हा पुन्हा आठवायची याचे कारण, यश मिळविण्यासाठी नीतिमूल्ये सोडण्याची गरज नसते, हे त्यांच्याकडून शिकायला मिळते.

यशाच्या श्रेयाचा वाटा सहकाऱ्यांना दिल्याने तुमचे महत्त्व कमी होत नाही, उलट वाढते, याचे उदाहरण ते घालून देतात. उद्योगधंद्यांना परवानग्या मिळविण्यासाठी राजकारण्यांची खुशामत करण्याची गरज नसते, याची ग्वाही त्यांच्याकडून मिळते. संपत्तीनिर्माण हेही कर्तृत्व गाजविण्याचे एक चांगले, उदात्त आणि महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे, हे तर ते मनावर बिंबवतातच; पण मिळालेल्या संपत्तीचा विनियोग करण्यातही तेवढीच कल्पकता आणि सर्जनशीलता असावी लागते, याचाही वस्तुपाठ देतात.

श्रीमंती आपल्यावर स्वार होऊ न देता आपण तिच्यावर स्वार होत आपले माणूसपण समृद्ध करू शकतो, हा विचारही आपल्या कृतीतून अशी माणसे देत असतात. रतन टाटांनी तो दिला. या ‘समृद्ध महामार्गा’ने वाटचाल करणे, निदान तसा प्रयत्न करणे हेच त्यांचे सर्वांत सार्थ स्मरण ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com