Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशी रंगत वाढू लागली आहे.
Raju Shetti Vs Eknath Shinde
Raju Shetti Vs Eknath Shindeagrowon

Hatkanangle Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशी रंगत वाढू लागली आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैऱ्या झाडल्या जात आहेत. अशातच कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात सभा घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर लोकसभेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. यावरून हातकणंगले लोकसभा मतदार संघात वातावरण जोरदार तापल्याचे दिसून येत आहे.

गाव पातळीवरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुका न्यायालयाकडून कारवाईच्या नोटिसा पाठवण्याचा धडका सुरु झाला आहे. मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असताना प्रशासनाकडून नोटीस आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गळीत हंगामाच्या सुरूवातील स्वाभिमानीच्यावतीने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस कारखान्याच्यां विरोधात आंदोलन केले होते. तसेच शिरोळपासून ते कागल, चंदगड, राधानगरी, कोल्हापूर, पन्हाळा,शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर वाळवा सांगली आणि पुन्हा शिरोळ अशी ५२२ किलोमीटरची पद यात्रा काढून ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळण्यासाठी आंदोलन केले होते. यानंतर आंदोलन चिघळल्याने तब्बल नऊ तास पुणे बेंगलोर महामार्ग रोखून धरला होता.

मागील हंगामातील उसाचे पैसे द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून विविध कारणे देत राजू शेट्टींच्या शिलेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आले. या घटनेला जवळपास चार महिने उलटल्यानंतरही प्रशासनाकडून शिराळा, शाहूवाडी, पन्हाळा आणि शिरोळमधील प्रमुख कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

याबाबत राजू शेट्टी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधल्यास ते म्हणाले की, पोलिसांना असं वाटत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघात आल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काहीतरी करतील. म्हणून प्रशासनाकडून नोटीस काढली आहे. मात्र प्रशासनाला इतकीच विनंती आहे की पोलीस स्टेशनमध्ये खुलेआम गोळीबार करणारा गणपत गायकवाड उजळ माथ्याने फिरत आहे.

Raju Shetti Vs Eknath Shinde
Raju Shetti : 'सरकारने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर साखर कारखान्यांची साखर अडवणार'

शेतकरी म्हणजे तुम्हाला अतिरेकी वाटले की काय? नक्षलवादी वाटले की काय? प्रत्येक वेळी त्यांना नोटीस का काढता. आम्ही प्रशासनाच्या या नोटिसीला उत्तर देणार नाही. आम्ही पोलीस स्टेशनला ही जाणार नाही. त्यांनी खुशाल काय करायचं ते करावे निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी इशारा दिला.

आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न

शिराळा तालुक्यातील शेतकरी मानसींग पाटील यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी काल (दि.२८) रविवारी सुट्टी दिवशी नोटीसद्वारे आज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत मानसींग पाटील यांच्याशी संपर्क साधल्यास म्हणाले की, शिराळा तालुक्यात शेतकरी संघटनेचा जोरदार प्रचार सुरू असताना अचानक काल मला नोटीस पाठवण्यात आली. मागच्या ४ महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनाबाबत मला अचानक नोटीस देण्यात आली. माझ्यासह अन्य काही शेतकऱ्यांना अशा नोटीसा देण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com