Indian Politics : ‘आप’मधील बेबनावाचे कारण अन् राजकारण

Political Party Update : ‘आप’कडे आता कार्यकर्त्यांची गर्दी आहे. अनेकजण पदे मिळवित गेलेत. मात्र, त्यातील काहींना ‘आम आदमी’ म्हणून राहता आले नाही. ते ‘खास’ झालेत. अशा पक्षाने कॉँग्रेसशी हातमिळवणी करत भाजपला आव्हान दिल्याने दिल्लीच्या सात जागांची उत्सुकता वाढली आहे.
Indian Politics
Indian PoliticsAgrowon

Policy of 'AAP' Political Party : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी केजरीवालांचे स्वीय सहायक बिभवकुमार यांनी मारहाण केल्याचे आरोप लावले. त्यासाठी बिभवकुमार यांना अटक झाली आहे. अधिकृतपणे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रकरणाची सत्यता उघडकीस येईल तेव्हा खरे कारण आणि त्यामागे दडलेले राजकारणही स्पष्ट होईल.

मात्र, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार ‘आप’ला डागाळणारा ठरतो. गेल्या काही महिन्यांत अरविंद केजरीवालांची अडवणूक केली जात आहे. पदे मिळवून घेणारे ‘आप’चे काही नेते आता केजरीवालांपासून पाठ फिरवायला लागले. दुसरीकडे भर प्रचाररॅलीत कॉंग्रेसचे उमेदवार कन्हैय्याकुमार यांच्या मुखात हाणली जाते. या सगळ्याच कृत्यांमागे भाजप असल्याची टीका होत आहे. हे सत्य असेल तर भाजप इतके हादरले आहे का, हा प्रश्‍न निर्माण होतो.

केवळ अकरा वर्षांत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीवर ‘राष्ट्रीय पक्षाचा’ मुकूट चढला. ‘आप’चे धोरण मतदारांना भावते. विकासाची कास धरत प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा पक्ष असल्याचे मतदारांना दिसते, म्हणूनच या पक्षाचा चढता आलेख कौतुकास्पद आहे. आता ‘आप’कडे कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.

अनेकजण पदे मिळवित गेलेत. मात्र, त्यातील काहींना ‘आम आदमी’ म्हणून राहता आले नाही. ते ‘खास’ झालेत. येत्या २५ मे ला दिल्लीतील सातही लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. भाजप २०१४ पासून भक्कम पाय रोवून आहे. २०१९ मध्ये भाजपने ५६ टक्के मते घेतली, तर कॉंग्रेसने २२ आणि ‘आप’ने १८ टक्के मते घेतली होती. यावेळी भाजपसमोर कॉँग्रेस आणि ‘आप’ची आघाडी दंड थोपटून आहे. परंतु या दोन्ही पक्षाच्या मतांची बेरीज ४१ टक्क्यांच्या वर जात नाही.

Indian Politics
Politics Update : ‘जय जवान, जय किसान’ घोषणेचा भाजपला सोयीने विसर पडलाय

तिसऱ्यांदा सर्वच जागा जिंकण्यासाठी भाजपने नवीन उमेदवार दिले आहेत. विद्यमान खासदारांचे प्रगतिपुस्तक खूप चांगले नाही हे पक्षाला जाणवले. तशातून ‘आप’-कॉंग्रेस ‘इंडिया’च्या निमित्ताने एकत्रित आल्याने काही जागा गमवाव्या लागणार असल्याची भीती भाजपला आहे. ईशान्य दिल्लीतून कॉँग्रेसचे उमेदवार कन्हैय्याकुमार आणि भाजपचे खासदार अभिनेता मनोज तिवारी रिंगणात आहेत. शुक्रवारी कन्हैय्याकुमार यांच्या प्रचार रॅलीत दक्ष चौधरी नावाच्या तरुण पुष्पहार घेऊन कन्हैय्याकुमार पुढे येतो, हार घालतो आणि त्यांच्या गालावर हाणतो.

अशा दक्ष चौधरींचा सध्या सुळसुळाट झाला आहे. हाच चौधरी नंतर एक व्हिडीओ जारी करतो. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्याला धडा शिकवला असे सांगत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत शेखी मिरवतो. या तरुणाला हेही माहिती नाही की, जेएनयू मधील त्या व्हिडिओशी संबंधित असणारे कोण होते? धार्मिक सौहार्द बिघडविण्याच्या कारणावरून याच चौधरीवर गुन्हे दाखल आहेत. गाझियाबाद पोलिसांनी त्याला अटक केली होती. अलिकडेच तो मनोज तिवारी यांच्या प्रचार सभेत व्यासपीठावर अतिथी रांगेत बसला होता. भाजप म्हणेल आमचा संबंध नाही. कदाचित नसेलही. परंतु राजकारण अत्यंत खालच्या स्तराला गेले याचे हे उदाहरण.

नीडर लीडर

गेल्या काही वर्षांत चर्चा होते ती नीडर लीडर कोण आहे याची. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे संजय राऊत, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, खा. संजय सिंग, सत्येंद्र जैन हे तपास यंत्रणांना न घाबरता किंवा भाजपच्या दबावतंत्राला बळी न पडता तुरुंगात गेल्याचा उल्लेख होतो. परंतु तुरुंगाच्या भीतीने भाजपशी मैत्री करणाऱ्या नेत्यांची संख्या अधिक आहे. ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चढ्डा हे सुद्धा तपास यंत्रणांच्या सावटात आहेत.

त्यांना केजरीवालांचा हनुमान संबोधले जाते. त्यांनी संसदेत असो वा पक्षाच्या व्यासपीठावरून भाजपवर प्रहार केलेत. परंतु जेव्हा त्यांना ‘अब तो जेल में जाना पडेगा...’ची अनुभूती झाली तेव्हापासून त्यांची दातखीळ बसली आहे. ‘डोळ्यांच्या उपचाराच्या निमित्ताने ते मार्चमध्ये लंडनला रवाना झाले. हा हनुमान केजरीवाल किंवा पक्षावर आलेल्या संकटावर गप्प आहे. राघव शनिवारी भारतात आले. त्यांनी केजरीवालांची भेटही घेतली. भविष्यात ते भाजपच्या व्यासपीठावर दिसू शकतात.

Indian Politics
Indian Politics : भाजपच्या पराभवासाठी दिंडोरीतून ‘माकप’ची माघार

याच श्रृंखलेत ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल आहेत का? याबाबत तर्क लावले जात आहेत. मालिवाल या केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या सुरुवातीच्या ‘परिवर्तन’ सामाजिक संस्थेशी जुळल्या होत्या. केजरीवालांनी २०१५ मध्ये त्यांना दिल्ली महिला आयोगाचे अध्यक्ष दिले. १९ जानेवारी २०२४ पर्यंत त्या या पदावर आरुढ होत्या. त्यांनी या काळात महिलांना न्याय देणारे अनेक निर्णय घेतले. लढवय्या म्हणून त्यांची ख्याती आहे. लहान असताना वडिलांनीच माझे लैंगिक शोषण केले हे सांगण्याचे धाडस त्यांच्यात आहे.

केजरीवालांनी त्यांना राज्यसभेचे खासदार केले. अलिकडे ‘आप’च्या नेत्यांवर संकटे आली तेव्हा ही रणरागिणी मैदानात दिसत नव्हती. १३ मे रोजीची घटना मात्र मनस्ताप देणारी आहे. स्वाती मालिवाल यांना बिभवकुमारांनी लाथा बुक्यांनी मारल्याचा आरोप झाला. विनम्र व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु मालिवाल म्हणतात तसे कृत्य बिभवकडून घडले असेल तर ते क्षम्य नाही. निवडणुकीत केजरीवाल व पक्षाला डागाळण्यासाठी भाजपने मालिवालांचा वापर केल्याचे दिल्लीच्या मंत्री आतिशी सांगतात. आता मालिवालांना केजरीवाल राजकीय ‘हिटमॅन’ वाटायला लागले आहेत.

‘आप’ला आयतीच संधी

दिल्ली महिला आयोगाशी संबंधित भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या प्रकरणाचा ससेमिरा मालिवालांच्या मागे आहे. यातून सुटण्यासाठी त्यांचा भाजपकडून वापर होतोय, अशी टीका करायला ‘आप’ला आयतीच संधी मिळाली आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. या निमित्ताने पुन्हा एक गोष्ट पाहायला मिळाली. मालिवालांनी आयोगाकडे तक्रार न करताही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर चौकशी समिती नेमली. बिभवकुमार यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली.

आयोगाची तत्परता अशीच असायला हवी. प. बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी दोन महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप झालेत, मणिपूरला महिलांची नग्न धिंड काढली गेली, जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंना फरफटत नेण्यात आले, त्यावेळी रेखा शर्मा यांनी अशीच तत्परता दाखवली असती, तर त्यांच्याबाबतचा आदर वाढला असता. दोन हजारांवर महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर आयोगाकडून साधी नोटीस नाही. मालिवाल प्रकरणात केजरीवालांना बांगड्या भरा म्हणणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या या सगळ्याच प्रकरणात गप्प कशा? कोणत्या पक्षाचा आरोपी आहे, यावरुन महिला आयोगाकडून कारवाईचे चक्र फिरविले जात असेल, तर यात कुठेतरी पाणी मुरते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com