
आॅस्कर वाइल्ड (Oscar Wild) छंदीफंदी आयुष्य जगला आणि त्याचं समर्थन करणारं जबरी तत्त्वज्ञान त्यानं मांडलं. त्याच्या समग्र साहित्यात ते इतस्ततः पसरलेलं आढळतं. आयुष्य क्षणभंगुर आहे, उद्याची कसलीच शाश्वती नाही. त्यामुळं नीती-अनीतीची गाठोडी सोडत न बसता ते रसरसून जगावं, असं आपल्यापुरतं तयार केलेलं साधं तत्त्वज्ञान त्यानं जन्मभर अंगीकारलं.
- आदिनाथ चव्हाण
भोग दुःखाचा असतो, तसा सुखाचाही असतो. आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला याचं मिश्रण येतं. कोणाच्या वाट्याला दुःखच फार, तर कोणा भाग्यवंताच्या पारड्यात सुखाचं माप अधिक. पाठीशी सत्ता, संपत्ती असेल तर भोगाच्या मर्यादा संपुष्टात येतात. अशा वेळी वाहवत जाण्याचा धोका अधिक. निरीश्वरवादी तत्त्वज्ञान खुलेपणानं भोगाला सामोरं जाण्याचं समर्थन करतं. कोणाला न दुखवता,
कोणाचं नुकसान न करता घेतलेले भोग ग्राह्य आणि नैतिक मानले जातात. आपल्या चार्वाकाचं तत्त्वज्ञान कोणताही अपराधीभाव न बाळगता भौतिक सुखांचा मोकळेपणानं आस्वाद घ्यावा, असं सांगतं. आॅस्कर वाइल्ड या प्रख्यात आंग्ल साहित्यिकानं हीच भूमिका आजन्म पत्करली
आणि सुखाचा वारेमाप उपभोग घेतला. ते करत असताना या जगण्याचं समर्थन करणारं अभिजात वाङ्मयही त्यानं रचलं आणि त्याला पूरक तत्त्वज्ञानाची जोडही दिली, हे त्याचं थोरपण!जागतिक अभिजात साहित्याच्या रत्नखचित भांडारात अव्वल स्थान राखून असलेल्या आॅस्कर वाइल्डनं काव्य, नाट्य, कथा आणि कादंबरी लेखन क्षेत्रात अजोड कामगिरी करून ठेवली आहे.
सव्वासहा फूट उंची आणि अप्रतिम देखणेपण लाभलेल्या या लेखकानं आपलं अखंड आयुष्य रसरशीतपणानं व्यतीत केलं. भव्य कपाळ, उभट चेहरा आणि खांद्यापर्यंत रुळणारे केस असं त्याचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व सर्वांना मोहवून टाकायचं. आपल्याकडं संगीत रंगभूमी गाजवणारे कोल्हापूरचे संगीतसूर्य केशवराव भोसले यांची याद यावी असं त्याचं रुपडं.
त्याच्या लिखाणानं प्रभावित झालेल्या जगभरातील अनेक साहित्यिकांमध्ये आपल्या आचार्य प्र. के. अत्र्यांचाही समावेश आहे. आॅस्कर छंदीफंदी आयुष्य जगला आणि त्याचं समर्थन करणारं जबरी तत्त्वज्ञान त्यानं मांडलं. त्याच्या समग्र साहित्यात ते इतस्ततः पसरलेलं आढळतं. अर्थातच, ते निरीश्वरवादी धाटणीचं आहे. आयुष्य क्षणभंगुर आहे,
उद्याची कसलीच शाश्वती नाही. त्यामुळं नीती-अनीतीची गाठोडी सोडत न बसता ते रसरसून जगावं, असं आपल्यापुरतं तयार केलेलं साधं तत्त्वज्ञान त्यानं अंगीकारलं आणि ते अमलात आणण्यात आयुष्यभर कसलीही हयगय केली नाही. या बहादराची जिव्हा समशेरीसारखी तळपायची. त्यानं विनोद, सुभाषितं आणि तत्त्वज्ञानाचा पेटारा खोलला, की सारे जण लोहचुंबकासारखे त्याच्याकडं आकर्षिले जायचे.
इंग्लडमधील उमराव, श्रीमंत, त्यांच्या मडमा त्याच्याभोवती अक्षरशः पिंगा घालायच्या. वाणी इतकी रसाळ, की तत्कालीन बर्नार्ड शॉ, एडवर्ड कार्सन यांसारख्या पट्टीच्या वक्त्यांचाही त्याच्यापुढं निभाव लागत नसे. या वाक्चातुर्याच्या बळावर त्यानं अमेरिकेची व्याख्यांनांची निमंत्रणं स्वीकारली.
अमेरिकेत बोटीतून उतरताना कस्टम अधिकाऱ्यानं, ‘आपल्याकडं डिक्लेअर करण्यासारखं काही आहे का,’ असा प्रश्न विचारला. त्यावर हजरजबाबी वाइल्डनं, ‘आय हॅव नथिंग टू डिक्लेअर बट माय जीनिअस’ (माझ्या प्रतिभेखेरीज माझ्याकडं करपात्र चीज कोणतीच नाही) असे उद्गार काढले.
त्याच्या या चमकदार विधानाचा जगभराच्या साहित्यविश्वात आजही कौतुकानं उल्लेख केला जातो. दीर्घ दौरा करून त्यानं अमेरिकी साहित्य रसिकांना वेड लावलं. तिथं मिळालेला बख्खळ पैसा युरोपात परतल्यावर लगोलग चैनी करून उडवूनही टाकला.
आॅस्कर वाइल्डची मांडणी आजच्या काळातही बंडखोर ठरावी. तेव्हाची त्याची अनेक अवतरणं (कोट्स) आजही धक्कादायक वाटत असली, तरी मुक्त जीवनशैलीचा अंगीकार करणाऱ्या अनेकांनी ती दिलखुलासपणे स्वीकारली. वानगीदाखल त्याची ही काही मतं...‘जे काम परवा करता येईल ते उद्या करू नका,’
(उद्या करायचं ते आज करा, या सुविचाराचं हे विडंबन) ‘मोहाखेरीज मी कशाचाही प्रतिकार करू शकतो,’ ‘रात्री स्वतःच्या दुर्गुणांची आठवण झाली, की मला तात्काळ झोप लागते,’ ‘मित्र हा सुंदर असावा, चारित्र्यवान माणसाशी आपण फक्त परिचय करावा आणि शत्रू बुद्धिवान निवडावा.’
आॅस्कर वाइल्डची ‘द पिक्चर आॅफ डोरियन ग्रे’ ही कादंबरी जागतिक वाङ्मयातली एक अद्वितीय कृती मानली जाते. पुत्रांकडून यौवन उसनं घेऊन हजार वर्षं भोगात रमलेल्या, तरीही वासनातृप्ती न झालेल्या ययातीची कहाणी आपल्याला माहिती आहे. प्रख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी या विषयावर लिहिलेली ‘ययाती’ कादंबरी भारतीय अभिजात वाङ्मयात अव्वल स्थान बाळगून आहे.
डोरियन ग्रेची कथा याच जातकुळीतली. वार्धक्य आपल्या चित्रावर आरोपीत करून तो भोगविलासात रममाण होतो. त्यासाठी हिंसा आणि कुटिल कारवायांचाही आधार घेतो. हे कथानक एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्लडमध्ये घडतं.
त्यामध्ये वाइल्डच्या शैलीला साजेसं वास्तव आणि अद्भुताचं अजब मिश्रण केलेलं आढळतं. पॅरिसमधला वीस वर्षांचा हा देखणा युवक आपल्या नुकत्याच मरण पावलेल्या आजोबांच्या गडगंज संपत्तीचा वारस म्हणून लंडनमध्ये दाखल होतो.
देखणेपणामुळं तिथल्या अमीर उमरावांच्या वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरतो. बेसिल हा चित्रकार त्याचं अप्रतिम चित्र रेखाटतो. त्याच वेळी लॉर्ड हेन्री त्याला जीवन रसरसून जगण्याचा सल्ला देतो. बेसिलनं रेखाटलेलं चित्र असंच देखणेपण मिरवत राहील, आपण मात्र वृद्धत्वाकडं वाटचाल करीत राहू, अशी धास्ती डोरियनला वाटते.
आपलं चित्र वृद्ध व्हावं, आपण मात्र सदासतेज जवान राहावं अशी कामना तो करतो. होतंही तसंच. त्याच्या जवानीतील्या प्रत्येक भोगाबरोबर, दुष्कृत्याबरोबर ते चित्र कुरूप बनत जातं. डोरियन मात्र आहे तसं तारुण्य मिरवत, उपभोगत राहतो. शेक्सपिअरच्या नाटकांमध्ये नायिकेची भूमिका करणाऱ्या सिबिल व्हेन या सुंदर शोडषेच्या प्रेमात तो पडतो आणि नंतर तिला नाकारतो.
प्रेमभंग झालेली सिबिल आत्महत्या करते. त्या धक्क्यातून सावरून डोरियन पुन्हा मदिरा, मदिराक्षी यांच्या सहवासात रमतो. अनेक वळणं घेत जाणाऱ्या कथानकाअंती डोरियन मृत्यू पावतो, तेव्हा तो तारुण्य गमावून अचानक जख्खड म्हातारा बनलेला असतो, तर ते चित्र पुन्हा आहे तसं विशितल्या डोरियनचं देखणं रुपडं धारण करतं.
‘इंद्रियांच्या समाधानातच आत्म्याचे कल्याण आहे. मोहाचा प्रतिकार करण्यासाठी मोहाला शरण जावे. सदसद्विवेकबुद्धी आणि भेकडपणा यांत काहीच फरक नाही,’ अशा आशयाचे बंडखोर विचार कादंबरीत येतात.
विशेषतः लॉर्ड हेन्री हा डोरियनला सतत भोगवादाच्या मार्गावर ओढत राहतो. हे पात्र आपल्या तोंडातून आॅस्करचं भोगाचं तत्त्वज्ञान सांगत राहतं. पुस्तकातील सर्वाधिक संवाद या हेन्रीला मिळाले आहेत, तेही बहुतेक डोरियनला उद्देशून असणारे. त्यातीलच हा एक...
“मला वाटतं, की एक जरी माणूस जीवन पूर्णत्वानं जगला, एका जरी माणसानं आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार उघड केला, आपल्या प्रत्येक स्वप्नाला सत्य स्वरूप दिलं, तरी जग मध्ययुगीन अनिष्ट गोष्टींपासून मुक्त होईल. पण आपल्यातला सर्वांत शूर माणूसही स्वत:ला घाबरत असतो. आपण रानटी माणसाला भूतकाळात गाडून टाकलं आहे.
नेमक्या त्याच पद्धतीने आपण आपल्या स्वाभाविक उर्मींना दडपून ठेवीत असतो. त्यामुळंच आज आपली आयुष्यं गढूळ होत आहेत. आपण स्वत:ला दिलेल्या प्रत्येक नकाराबद्दल आपल्याला शिक्षा होत असते. आपल्या ज्या ज्या प्रबळ इच्छेला मारून टाकण्याचा आपण प्रयत्न करतो, ती ती प्रत्येक इच्छा आपल्या मनात घर करून बसते, आणि तीच विष होऊन ते आपल्या अंगभर पसरतं.
पाप करून शरीर पापमुक्त होतं; कारण कर्म करणं हा शुद्ध होण्याचा एकच मार्गच आहे. कर्म केल्यावर शेवटी उरते ती केवळ सुखाची आठवण, किंवा पश्चात्तापाची चैन. मोहापासून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे... मोहाला वश होणं. मोहाचा प्रतिकार करा, मग स्वतःच स्वत:ला मनाई केलेल्या गोष्टींसाठी तुमचा आत्मा तरसत राहील.
स्वत: तयार केलेल्या अघोरी नियमांनी तुम्ही कित्येक गोष्टींना अघोरी, नियमबाह्य ठरवाल; पण त्या गोष्टींसाठीची लालसा तुमच्या मनात तशीच पेटलेली राहून तुम्हाला विकृत करील. जगातल्या सर्वश्रेष्ठ घटना माणसाच्या मेंदूत आकार घेतात, असं म्हणतात. त्या मेंदूतच जगातली मोठी पापंही जन्म घेतात.’’
आॅस्कर हयात असताना या कादंबरीला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही, उलट त्याबद्दल त्याची हेटाळणीच झाली. समीक्षकांनी तर त्याला झोडपून काढलं. नंतर मात्र तिची लोकप्रियता आणि खप वाढत गेला. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रानं इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट शंभर कादंबरींच्या यादीत ‘द पिक्चर आॅफ डोरियन ग्रे’चा समावेश केला.
सन १८९० ला एका अमेरिकी नियतकालिकात ही कादंबरी संपादित स्वरूपात पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. नंतर १८९१ मध्ये ती पूर्ण कादंबरी स्वरूपात प्रसिद्ध झाली. टीकेचा सूर तीव्र झाल्यावर स्टॉलवरील या नियतकालिकाचे सारे अंक वितरकांना मागे घ्यावे लागले. वाइल्डनं मात्र आपल्या लिखाणाचं जोरदार समर्थन केलं. साहित्य आणि कला विश्वानं यथावकाश या कादंबरीची दखल घेतली. सन १९१३ मध्ये तिचं नाट्यरूपांतर केलं गेलं.
या कथानकावर काही मूकपटही आले. तो काळ मूकपटांचाच होता. पुढं सिनेमा बोलायला लागल्यावर सन १९४५ मध्ये ‘द पिक्चर आॅफ डोरियन ग्रे’ हा चित्रपट आला आणि गाजलाही. त्याला त्या वर्षीचा उत्कृष्ट कृष्ण-धवल छायाचित्रणासाठीचा आॅस्कर पुरस्कार लाभला. अलीकडे सन २००९ मध्ये ‘डोरियन ग्रे’ या नावानं नवा चित्रपट आला. तो रंगीत होता, पण इतका गाजला नाही. इंटरनेटवर शोध घेतलात तर तो मिळू शकेल. त्याचा ट्रेलर यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.
नैतिकतेच्या चौकटीतूनच प्रत्येक गोष्ट जोखण्याची आपली खोड. वास्तव आणि अद्भुताचं अजोड मिश्रण असणारी ही कादंबरी वाचताना मात्र नीतीमार्गावरून घसरण्याचं आॅस्करनं केलेलं सज्जड समर्थन आपल्याला थक्क करून सोडतं. ‘अरेच्चा, याकडं असंही पाहता येऊ शकतं तर,’ असं आजपर्यंत न झालेलं आकलन आपले जुने समज खोडून काढत राहतं.
तत्त्वज्ञानाची डूब लाभलेल्या पल्लेदार संवादांनी भरलेली ही कादंबरी मोठा बौद्धिक आनंद देते. आॅस्कर वाइल्डनं लॉर्ड हेन्री या पात्राच्या माध्यमातून मुक्त जीवनाबाबतची आपली भूमिका ताकदीनं मांडली आहे. ती मुळातून वाचणं म्हणजे बौद्धिक मेजवानीच! हा सारा ऐवज आपली दृष्टी बदलवून टाकण्याची क्षमता बाळगून आहे.
अर्थात, नीती-अनीतीचं ओझं न घेता तितक्या संवेदनशीलतेनं आणि खुलेपणानं आपण हे सारं पचवू शकलो तरच! मेहता पब्लिशिंग हाऊसनं मराठीत ही कादंबरी प्रकाशित केली आहे. वि. शं. ठकार यांनी उत्तम अनुवाद केला आहे.
एका तरुणाशी समलिंगी संबंध ठेवल्याबद्दल सन १८९५ मध्ये वाइल्डवर खटला चालवला गेला. त्या वेळी या पुस्तकातील उतारे त्याच्याविरुद्ध पुरावे म्हणून वापरले गेले. या खटल्यात त्याला दोन वर्षं सक्तमजुरीची शिक्षा झाली. रेडिंग इतल्या तुरुंगात त्यानं ती भोगली. तिथं कष्टाची कामं करावी लागल्यानं त्याची प्रकृती तोळामासा झाली. या अनुभवावर त्यानं ‘बॅलड आॅफ द रेडिंग जेल’ हे प्रभावी काव्य लिहिलं.
शिक्षा झाल्यावर तत्कालीन कर्मठ इंग्लिश समाजानं जवळ जवळ त्याला वाळीतच टाकलं. निर्मात्यांनी त्याची नाटकं बंद करून टाकली. प्रकाशकांनी पुस्तक विक्री बंद केली. रस्तोरस्ती त्याची अवहेलना सुरू झाली. आॅस्कर हा शब्द शिविसारखा वापरला जाऊ लागला.
तो अक्षरशः निष्कांचन झाला. काही मित्र त्याला आर्थिक मदत करीत होते. ही सारी दुर्दशा सुरू असतानाच त्याला मनोभावे साथ देणारी बायको निवर्तली. बदनामीच्या भीतीनं मुलांनी आपलं आडनाव बदलून घेतलं.
हे सारं पाहून आॅस्कर आणखी मद्याच्या आहारी गेला. तुरुंगातून सुटल्यावर नाव बदलून तो फ्रान्समध्ये राहू लागला. काही वेळा तर रस्त्यावर त्यानं अक्षरशः भीक मागितली. शेवटी पॅरिसमध्ये तो बेवारशासारखा मृत्यू पावला. एकेकाळी हजारो रसिकांना झुलवणारा हा शब्दांचा, विनोदाचा बादशहा भिकाऱ्याच्या मौतीनं खपावा, यापरतं दुर्दैव ते कोणतं?
पुढं सन १९५४ मध्ये इंग्रज सरकारला उपरती झाली. आॅस्करच्या जन्मशताब्दीनिमित्त लंडनमधील त्याच्या घरावर त्याच्या नावाचा फलक लावला गेला. त्याचं साहित्य नव्या जोमानं खपू लागलं. तिकिट बारीवर नाटकं पुन्हा गर्दी खेचू लागली. पण हे वैभव पाहायला आॅस्कर नव्हता.
आपण तसे ढोंगीच असतो. ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,’ हे काव्य बोलण्यापुरतं ठीक. आॅस्करसारखं आणि त्याच्या डोरियनसारखं तारुण्य आणि रंगीबेरंगी, रसरशीत जगणं प्रत्येकालाच हवं असतं. तारुण्य थांबवून ठेवता येत नाही आणि भोग ही तर निरंतर हवीहवीशी वाटणारी गोष्ट. तिला वयाचं बंधन नसतं. इंदीवर यांची ‘होठों से छू लो तुम’ ही जगजित सिंग यांनी गायलेली गझल तुम्ही ऐकली असेलच. तिच्यातला हा एक प्रत्ययकारी तुकडा...
ना उम्र की सीमा हो
ना जनम का हो बंधन
जब प्यार करे कोई
तो देखें केवल मन
नयी रीत चलाकर तुम
यह रीत अमर कर दो
प्रेमाचं ठीक आहे, पण भ्रमरवृत्तीचं करायचं तरी काय? डोरियनची आणि त्याच्या कर्त्याची कहाणी वाचल्यानंतर आपल्या मनात हाच प्रश्न उपस्थित होतो. शिवाय आपल्या भवतालात डोकावलं तर प्रेमिक कमी आणि भ्रमर जास्त आढळतील. डोरियनची कथा तर समाजाचाच आरसा आहे ना? मग तो समाज एकोणिसाव्या शतकातील इंग्लडचा असू द्या,
की एकविसाव्या शतकातील भारतीचा! ‘द पिक्चर आॅफ डोरियन ग्रे’मध्ये वाइल्डचं तत्त्वज्ञान कसलेही निर्बंध न जुमानता खुल्या जगण्याचं समर्थन करीत राहतं. ते योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न. ‘दूध का दूध और पानी का पानी’ करण्याइतकं हे सोपं नाहीच मुळी! निष्ठा महत्त्वाची की येणारा प्रत्येक क्षण रसरसून भोगायला सांगणारं तत्त्वज्ञान?
आपला चार्वाक त्याचंच तर समर्थन करतो. मुक्त लैंगिक संबंधांचं समर्थन करणारा विख्यात साहित्यिक, तत्त्वज्ञ बर्टार्ड रसेल आणि प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांची मांडणी तरी वेगळं काय सांगते? लोकहो, या प्रश्नांना समाजमान्य होईल असं उत्तर नाही. हा गुंता प्रत्येकानं आपापल्या धारणा, वकुब आणि आकलनानुसारच सोडवलेला बरा!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.