Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याची गरज

Financial Management : कुटुंब आणि समाजात योग्य स्थान आणि आदर मिळवून एक चांगली ओळख निर्माण करायची असेल, आनंदाने जगायचे असेल तर आर्थिक साक्षरता, ज्ञान आणि आर्थिक स्वातंत्र्य गरजेचे आहे.
Financial Freedom
Financial Freedom Agrowon
Published on
Updated on

दीपा क्षीरसागर

Financial Plan : अजूनही ग्रामीण भागात स्त्रियांना म्हणावे तसे शिक्षण, व्यवहारज्ञान, आर्थिक ज्ञान दिले जात नाही किंवा सुविधांच्या अभावी ते मिळत नाही. त्यामुळे बौद्धिक कुवत असून देखील स्त्रियांना आर्थिक व व्यवहारिक बाबतीत सतत पुरुषांवर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचे व गरजांचे निर्णय घरातील पुरुषच घेतात.

आपण काही कमावत नाही किंवा आपल्याला काही कळत नाही या भावनेखाली सतत दबून असल्याने, काही वेळा स्त्रिया आपल्या मनाविरुद्ध जगत असतात. कुठे ना कुठे, केव्हा ना केव्हा त्यांच्या मनाची कुचंबणा होत असते, बऱ्याच स्त्रियांनी हे असंच असतं किंवा हेच योग्य आहे असे स्वीकारलेले असते त्यामुळे बरेच वय होईपर्यंत त्यांच्या हे लक्षात ही येत नाही आणि ज्यांच्या लक्षात येते त्या काही करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे आर्थिक ज्ञान, आर्थिक स्वातंत्र्य व निर्णय क्षमता यांची कमतरता असते.

आजकालच्या भाषेत बोलायचं झालं, तर सत्तेसोबत माणसाला सामर्थ्य मिळते. सत्ता ही ज्ञान आणि अर्थ या दोन गोष्टी मजबूत असल्याशिवाय मिळत नाही. ज्ञानामुळे अर्थार्जनासाठी वाव मिळतो. अर्थार्जनामुळे माणूस समर्थ बनतो, आणि हेच सामर्थ्य त्याला सत्ता मिळवून देते.

ज्याच्या हाती सत्ता त्याला समाजाकडून व कुटुंबाकडून आदर मिळतो. याच आदरामुळे माणसाचा स्वाभिमान मजबूत बनून त्याला जगण्यातील निखळ आनंद मिळवता येतो तसेच दुसऱ्याची प्रेरणा बनून त्याला मार्गदर्शन देण्याची कुवत निर्माण होते.

Financial Freedom
Financial literacy : बना आर्थिक साक्षर

कुटुंब आणि समाजात योग्य ते स्थान आणि आदर मिळवून एक चांगली ओळख निर्माण करायची असेल, आनंदाने जगायचे असेल तर आर्थिक साक्षरता, ज्ञान आणि आर्थिक स्वातंत्र्य खूप गरजेचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचे हे सूत्र शहरी स्त्रियांनी बऱ्यापैकी अवलंबिलेले आहे. परंतु ग्रामीण भागातील स्त्रिया या बाबतीत खूप मागे आहेत, त्यांच्यात खूप मोठी तफावत दिसून येते.

ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या गरजेला अजून एक खूप महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे स्त्रियांकडे निसर्गतःच असलेली काटकसर, चोखंदळपणे व व्यवहारकुशलतेने अर्थशास्त्र सांभाळण्याची बौद्धिक क्षमता. स्त्रीला योग्य ज्ञान आणि मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ती एक उत्तम आर्थिक प्रबंधक होऊ शकते.

जुन्या काळातील आजी, पणजी फार कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असायच्या. परंतु तरीही त्यांना पैशाचा हिशेब अगदी काटेकोर कळायचा, त्यांच्याकडून कधीही पैसे मोजताना किंवा देवाण घेवाण करताना चूक होत नसे. घर खर्चाला मिळालेला किंवा शेती उत्पन्नातून आलेला पैसा त्या अगदी काळजीपूर्वक खर्च करून जपून वापरत असत.

पैशाला पैसा जोडून सर्व घरखर्च भागवून गाठीला पैसा बाळगून असत. कुणाचे लग्न, बारसे, वास्तुशांती, डोहाळे जेवण इत्यादी वेळी आहेर-माहेर बघणे, तसेच घरी आलेल्या लहान मुलांच्या हाती आपल्या गुपित बँकेतून एखादी नोट हळूच टेकवणे, अचानक आलेले पाहुणे रावळे, लेकीसुनांची बाळंतपणे, घरातील वृद्ध सदस्यांची आजारपण हे सर्व त्या अगदी सहज सांभाळून घेत असत.

Financial Freedom
Financial Planning : पैसा योग्य ठिकाणी वापरूया, गैरवापर टाळूया

स्त्रीला निसर्गतःच श्रेष्ठ बुद्धिमत्ता मिळालेली आहे, फक्त त्याला योग्य ज्ञान व मार्गदर्शनाची जोड मिळाली, तिच्या नेतृत्वाला संधी आणि वाव मिळाला तर ती त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.

योग्य ज्ञानासोबत योग्य ते आर्थिक नियोजन केल्यामुळे स्त्री स्वतःसोबत संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करू शकते. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळवू शकते. यातून मिळालेल्या आर्थिक स्वातंत्र्यातून स्वतःसोबत सर्व कुटुंबाला आनंदी ठेवू शकते.

कर्तव्य, जबाबदारी आणि भावनांचा ताळमेळ राखण्याची पुरुषांची कुवत स्त्रियांपेक्षा कमी असते, त्यामुळे मिळालेल्या आर्थिक स्वातंत्र्याचा पुरुष कधी कधी गैरवापर करतात किंवा व्यसनाधीन होऊन संपूर्ण कुटुंबाला त्रासात घेऊन जातात. परंतु स्त्रियांच्या बाबतीत असे होत नाही, त्यांना जरी अबला नारी म्हटले जात असले तरी त्यांचे भावनिक नियंत्रण खूप मजबूत असते.

त्या कर्तव्य, जबाबदारी ठामपणे आणि कौशल्याने पार पाडतात. त्यामुळे शिक्षण आणि आर्थिक ज्ञानाचा अभाव असलेली स्त्रीसुद्धा जर आपल्या कुटुंबाचा कणा बनू शकते. त्याच स्त्रीला योग्य ज्ञान, मार्गदर्शन व आर्थिक स्वातंत्र्य मिळाले तर ती स्वतःसोबत आपल्या कुटुंबाला उच्च स्तरावर घेऊन जाईल यात दुमत नाही.

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे का म्हणतात? कारण जेव्हा स्त्री शिकते तेव्हा ती तिच्या मिळवलेल्या ज्ञानाचा योग्य तो वापर करते. कुटुंब आणि समाजातील लोकांना तिचे ज्ञान वाटते. स्वतःसोबत सर्वांची प्रगती घडवून आणते, कारण निसर्गतःच स्त्री बोलकी व भाववाहक असते, त्यामुळे ती कोणतीही गोष्ट स्वतःपुरती मर्यादित ठेवू शकत नाही.

म्हणून स्त्रियांनी शिक्षण घेणे, आर्थिक साक्षर होणे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे, सत्तेत पुरुषांच्या बरोबरीने उभे राहणे हे खूप गरजेचे झाले आहे, विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी हे फार महत्त्वाचे आणि गरजेचे आहे, जेणेकरून त्या शहरी भागातील स्त्रियांसोबतची तफावत कमी करून त्यांच्याप्रमाणे प्रगतीच्या वाटेला लागून स्वाभिमानाने जगू शकतील.

: kshirsagardp@yahoo.com, (लेखिका मुंबई येथे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये व्यवस्थापिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com