Financial literacy : बना आर्थिक साक्षर

Finance Management : मुलींसाठी लहान वयापासूनच सरकारच्या बँक खाते, सुकन्या समृद्धी योजना, रिकरिंग डिपॉझिट योजना, शैक्षणिक कर्जाची सोय, पोस्टाच्या बचत योजना उपलब्ध आहेत. या आर्थिक योजना लहान वयातच मुलींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
Finance Management
Finance ManagementAgrowon
Published on
Updated on

दीपा क्षीरसागर

Finance Plannings :

नमस्कार मैत्रिणींनो...

आज आपण पाहिले तर शहरात ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात, त्या प्रमाणात ग्रामीण पातळीवर होत नाहीत. शहरातील मोकळे वातावरण आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लहान वयात घ्याव्या लागत असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे, शहरातील मुलींना व्यवहार ज्ञान आलेले असते.

बाजारहाट, बँक तसेच पोस्टाचे व्यवहार करणे, विविध आर्थिक तसेच उपयुक्तता सेवा केंद्रांची कामे करणे, इत्यादी ज्ञान शहरातील मुलींना लवकर मिळते. परंतु हेच ग्रामीण भागातील मुलींच्या बाबतीत दिसून येत नाही. बऱ्याच कौटुंबिक आणि सामाजिक बंधनामुळे मुलींना योग्य तितकी व्याप्ती मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक व व्यावहारिक ज्ञानात भर पडत नाही.

मुलींसाठी लहान वयापासूनच सरकारच्या बऱ्याच आर्थिक योजना उपलब्ध आहेत, जसे की बँक खाते, सुकन्या समृद्धी योजना, रिकरिंग डिपॉझिट योजना, शैक्षणिक कर्जाची सोय, पोस्टल विमा किंवा पोस्टाच्या बचत योजना. अशा अनेक आर्थिक योजना लहान वयातच मुलींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पालकांनी त्या बद्दलचे योग्य ते ज्ञान मुलींपर्यंत पोहोचवून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

पोस्ट तसेच बँकांचे मूलभूत व्यवहार शिकवणे, बचतीचे धडे देणे, डिजिटल माध्यमांचा व्यावहारिक कामांसाठी योग्य प्रकारे व सुरक्षितपणे वापर करणे, अशा अनेक गोष्टी घरातील मोठी मंडळी, पालकांनी आपल्या मुलींना शिकवणे गरजेचे आहे, जेणेकरून लहान वयातच मुलींचा आत्मविश्वास विकसित होईल. त्यांना लहान वयामध्ये पैशाचे आणि बचतीचे महत्त्व समजेल, त्याची सवय लागेल. जेणेकरून भविष्यात त्यांचा आर्थिक विकास लवकर होईल.

Finance Management
Financial Planning : पैसा योग्य ठिकाणी वापरूया, गैरवापर टाळूया

ग्रामीण पातळीवरील मुलींना अशा प्रकारे विविध क्षेत्रात शिक्षित करणे, जाणकार बनवणे ही पालकांची जबाबदारी आहे. आजही ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे, किंवा शिकल्या तरी व्यवहार ज्ञानाच्या अभावामुळे, तसेच जगाशी फारसा संपर्क न आल्यामुळे, बुद्धिमत्ता असून देखील त्यांचा म्हणावा तितका व्यक्तिमत्त्व विकास होत नाही.

त्यांच्यातील बुजरेपणा जात नाही. स्वतःमधील क्षमता न ओळखल्यामुळे आणि आत्मविश्‍वासाच्या कमतरतेमुळे, स्वतःच्या आयुष्याच्या दोऱ्या सतत कुणाच्या तरी हातात देऊन परावलंबी जीवन जगत असतात. सध्या जी पिढी पौगंडावस्थेतील मुलींच्या पालकांच्या भूमिकेत आहे, ती शिकली सवरलेली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना सर्व बाबतीत साक्षर, सक्षम व ज्ञानी बनवणे ही या पिढीची नैतिक जबाबदारी आहे.

Finance Management
Financial Management : स्वतःचे पैसे कशावर उधळायचे?

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे म्हणतात. त्यामुळे जेव्हा ग्रामीण भागातील मुली या सर्व आघाडीवर प्रगती करतील, सजग होतील तेव्हाच त्यांच्या सर्व बाजूंनी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील स्त्रियांच्या कुवतीला वाव न मिळाल्यामुळे, कुवतीचा योग्य तो विकास न झाल्यामुळे किंवा त्यांना कमी लेखल्यामुळे, अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आचरणात आहे.

त्यामुळे या भागातील स्त्रियांच्या कला गुणांना, कुवतीला, ज्ञानाला वाव मिळणे, चालना मिळणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून थोडेफार तरी पुरुषप्रधान संस्कृतीला मर्यादा येऊन समानतेचे वारे वाहू लागतील.

स्त्रियांच्या सर्जनशील कला गुणांमुळे व कौशल्यामुळे नवनवीन प्रक्रिया व पद्धती अस्तित्वात येऊन सर्व समाजाचाच जगण्याचा दर्जा सुधारेल. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी आता आपल्या मुलींना आर्थिक आणि व्यवहारिक पातळीवर सक्षम बनवणे हे खूप गरजेचे आहे, नव्हे तर ती त्यांची मुख्य जबाबदारी आहे.

अनुभवातून शिक्षण

एक यशस्वी बँकर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून माझी जी ओळख निर्माण झाली आहे, त्यामागे कुठेतरी माझ्या वडिलांचा कळत नकळत हात आहे असे मला वाटते. मला आज ही आठवते, की साधारणपणे दहा बारा वर्षांची असल्यापासून माझे बाबा मला बँकेत जाताना किंवा बाजारात जाताना, सोबत तसेच मला फिरायला मिळावे म्हणून घेऊन जात असत. यातूनच मी बँक खात्याचे पुस्तक भरून घेणे, चेक जमा करणे, फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग खाते उघडणे, अशी काही जुजबी कामे करायला मी हळू हळू शिकत गेले.

त्याचप्रमाणे घरात लागणारे किराणा सामान, भाजीपाला, फळे इत्यादी बाजारहाट करायला जाताना देखील बाबा मला सोबत नेत असत. एखादी वस्तू ज्या ठिकाणी चांगली, वाजवी दरात तसेच विश्‍वासाने मिळते, ती वस्तू वेळ काढून तिथूनच खरेदी केली पाहिजे, ज्या गोष्टीची जितकी गरज व खप असेल ती तितक्याच प्रमाणात घेतली पाहिजे, असे अनेक व्यवहाराचे धडे मला माझ्या बाबांकडून शिकायला मिळाले.

त्या वेळी पोस्ट ऑफिसचे सुद्धा खूप चलन होते, पोस्टात जाऊन पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्र, तिकिटे विकत घेणे, ती लिहून पेटीत टाकणे, आजीला मनी ऑर्डर करणे, आदी कामेदेखील मी हळू हळू शिकत गेले, त्यामुळे माझे आर्थिक तसेच व्यवहार ज्ञान लहान वयातच बऱ्यापैकी विकसित झाले. या सर्व ज्ञानाचा उपयोग मुख्यत्वे मला लग्नानंतर झाला, शून्यातून सर्व उभे करताना, स्वतःला सिद्ध करताना, मला माझ्या व्यवहारिक, चोखंदळ व काटकसरीच्या स्वभावाचा खूप उपयोग झाला.

: kshirsagardp@yahoo.com

(लेखिका मुंबई येथे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये व्यवस्थापिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com