Exportable Grape : अभ्यासूपणासोबतच जपले काटेकोर आर्थिक नियोजन

Grape Farming : सांगली जिल्ह्यातील पळशी (ता. खानापूर) येथील अमित गुरव यांनी जिद्द, सचोटी, अनुभवी बागायतदारांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर निर्यातक्षम द्राक्षशेतीमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : कऱ्हाड -गुहागर राष्ट्रीय मार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर पळशी (ता. खानापूर) हे दुष्काळाशी सामना करणारे गाव. सांगली सर्वांत उंचीवरील हे गाव चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. या गावातील शेतीही डोंगर उतारावरील. येथे पावसाचे प्रमाणही कमी आणि पाण्याची कमतरता पाचवीला पुजलेली.

खरीप आणि जास्तीत जास्त रब्बी हंगामातील पिकावर समाधान मानण्याऐवजी फळबाग त्यातही द्राक्षशेतीकडे वळले. गावात १९८५-८६ च्या दरम्यान गावात आलेल्या द्राक्ष पिकाबाबत अन्य शेतकरीही कुतूहलाने माहिती घेत अभ्यास करू लागले. १९९१-९२ पासून गावात द्राक्ष लागवड वेगाने वाढली.

वातावरणाबाबत अनुकूल असले तपी पाण्याबाबत प्रतिकूल स्थिती आहे. अशा स्थितीत वेळप्रसंगी शेतकरी टॅंकरने पाणी आणून द्राक्ष बागा केवळ टिकवताच असे नाही, तर युरोपमध्ये निर्यातही करतात. त्यामुळे पळशी हे २० वर्षांहून अधिक काळापासून द्राक्ष निर्यातीतील महत्त्वाचे गाव ठरले आहे. या वर्षी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले आहे.

वडिलांचा खडतर प्रवास ः

अर्जुन गुरव यांचे वडील आनंदा गुरव हे गावचे सरपंच होते. पण अर्जुन हे सातवीला असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे शिक्षण सुटले. आर्थिक परिस्थिती कमजोर झाले. गुरव कुटुंबाची साडेदहा एकर शेती असली, तरी प्रामुख्याने हंगामी पिकातूनच कुटुंबाचा गाडा चालायचा. त्यातच दुष्काळी स्थितीमध्ये केवळ शेतीतून निभावणार नाही, हे लक्षात आल्याने अर्जुन यांनी चेन्नई येथे गलाई (सोने-चांदी शुद्धीकरण प्रक्रिया) कामगार म्हणून गेले.

तिथे काम करताना पगारातून शिलकीच्या रकमेतून शेतातील सुधारणा केल्या. पाण्याची सोय करण्यासाठी अकरा कूपनलिका घेतल्या. सन १९९२ मध्ये सतरा खांब उभारून विजेचे ‘कनेक्शन’ घेतले. नोकरी न सोडता १९९८ मध्ये पाऊण एकरामध्ये पहिली द्राक्ष बाग लावली. पहिल्या हंगामापासून निर्यातक्षम द्राक्षाचे नियोजन केले.

युरोपात निर्यातही झाली. पहिल्यांदा द्राक्षाला २२ रुपये किलो असा दर मिळाला. द्राक्ष शेती आणि नोकरीतील पैशातून डोंगर उतारावरील शेती सपाट करून वहितीखाली आणली. आपले शिक्षण मध्येच सुटले, तरी मुलांना शिक्षण दिले. त्यांचा मुलगा अमित याने बी. ए. डी. एड.पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

Grape Farming
Grape Research Center : द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशींची अंमलबजावणी गरजेची

अमितही द्राक्ष शेतीत रुळले...

अमित सांगत होते, ‘‘मी डीएडची पदविका घेतली. आता शिक्षकाची नोकरी करत शेती करायची, असे ठरवले होते. पण शिक्षक भरतीच बंद असल्यामुळे नोकरी मिळाली नाही. मग नोकरीच्या मागे फिरत राहण्यापेक्षा घरच्या शेतीतच अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. दर्जेदार उत्पादन घेतले, की चांगले पैसे मिळतात, हे डोळ्यांना दिसत होते.

२०१४ पासून पूर्णवेळ शेतीत लक्ष दिले. पहिल्यापासून द्राक्ष पीक घरी असले, तरी आता त्यातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास सुरू केला. कामाला प्राधान्य देताना द्राक्षाच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही, हे तत्त्व कायम ठेवले. पूर्वीच्या पाऊण एकर शेतीच्या जोडीला आणखी तीन एकरांवर द्राक्ष बागेची लागवड केली.

रोज शिकतो काही नवे...

अमित सांगत होते, ‘‘मी स्वतः डीएड झाल्यामुळे शिक्षणाने शिक्षक असलो तरी द्राक्ष शेतीमध्ये कायम विद्यार्थीच आहे. एखाद्या नोकरदाराइतका (आठ ते दहा तास) वेळ या शेतीमध्ये मी देतोच. द्राक्षामध्ये सतत नवे तंत्रज्ञान येत असते. आमचा पंकज पिसे, सुशीलकुमार पाटील, अरविंद पाटील, संपतराव जाधव, रमेश जाधव यांच्यासह द्राक्षातील उत्तम मित्र परिवार आहे. आम्ही वर्षभर उत्तम द्राक्ष शेतकऱ्याकडे जाणे, त्यांच्याकडून नव्या गोष्टी, बारकावे शिकणे यावर भर देतो. ही निरीक्षणे आपल्या द्राक्ष शेतीत कशी अमलात आणता येतील, याकडे लक्ष देतो.’’

Grape Farming
Grape Covering Subsidy : प्लॅस्टिक कव्हरसाठी ५० टक्के अनुदान द्या

अपेक्षित दर्जा, अपेक्षित दर...

द्राक्षाच्या दर्जाशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. त्यामुळे अपेक्षित असा दर मिळतो. सन २०२२ मध्ये ८२ रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. गेल्या हंगामात ६५ ते ८५ रुपये असा दर मिळाला. देशांतर्गत बाजारामध्ये एक ते दोन टन विक्री होतो.

द्राक्ष शेती तशी सोपी तशी जोखीमही तितकीच असते. पण अभ्यासातून ती विस्तारली. द्राक्ष शेतीतून येणाऱ्या पैशात वडिलोपार्जित असलेल्या शेतीचा विस्तार आणि काही अंशी नवी शेती खरेदी असे नियोजन सुरू असते.

द्राक्ष विक्रीतून आलेल्या पैशातून भाग भांडवल बाजूला काढले जाते. त्यातून विस्ताराचे नियोजन केले जाते. गेल्या वर्षी ३० गुंठे नवीन शेती खरेदी केली, तर दोन एकर शेतीमध्ये सुधारणा केली. त्यात येत्या वर्षभरात या अडीच एकरवर द्राक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

* निर्यातक्षम द्राक्षाचे नियोजन उन्हाळ्यापासूनच सुरू केले जाते

* एप्रिलमध्ये खरड छाटणी

* खरड छाटणीपासून वेलीमध्ये दर्जेदार गर्भधारणा होण्यासाठी काटेकोर नियोजन केले जाते.

* उन्हाळ्यात तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वेलीच्या वाढीचा टप्पा यानुसार पाणी व्यवस्थापन केले जाते

* यामुळे पाने दर्जेदार होतात. वेलीत अन्नसाठा तयार होतो.

* पीकछाटणीवेळी घड जिरणे, वेलीचा जोम कमी होत नाही

* पान, देठ परीक्षण केल्याने अतिरिक्त खताचा वापर टाळला जातो. यामुळे जमिनीचे आरोग्य टिकते.

फळ छाटणीचे नियोजन

* सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फळछाटणी

* फळछाटणी घेण्यापूर्वी मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्न द्रव्यांचा भेसळ डोस.

* या फुटवा आणि सशक्त घड तयार होण्यास मदत होते.

* कमजोर काडी आणि वेळेत वांझ काढली जाते.

* एका वेलीस पानांची संख्या ८०० ते ८५० इतकी ठेवल्याने प्रकाश संश्‍लेषण चांगले होते.

* प्रति दीड स्क्वेअर फुटात ५०० ग्रॅम वजनाचे दोन घड. एका घडाला सुमारे ८० ते ९० मण्यांची संख्या असते.

* एका सुमारे वेलीस ३५ ते ३६ फुटवे ठेवून, त्यावर २३ ते २४ घड ठेवले जातात. त्यामुळे मण्यांचा आकार आणि दर्जेदार मणी तयार होतात.

* मण्यांच्या वाढीचा कालावधी महत्त्वाचा असल्याने त्यानुसार कामाचे प्रयोजन केले जाते.

* प्रत्येक दिवसात काय काम केले, याच्या नोंदी ठेवल्या जातात.

* द्राक्षाची गोडी - १८ ब्रिक्स

* द्राक्षाची जाडी - २२ ते २३ एमएमपर्यंत मिळते.

* द्राक्षाचा रंग एकसारखा असतो.

* युरोपीय देशात द्राक्षाची निर्यात.

एकूण शेती ः दहा एकर

निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्र ः तीन एकर

द्राक्षाचे वाण ः थॉमसन, २ ए क्लोन

लागवड पद्धती ः ८ बाय ४ फूट, ७ बाय साडेचार फूट.

* एकरी उत्पादन ः सुमारे १२ टन

* दर : प्रति किलोस ६५ ते ८५ रुपये

* एकूण उत्पन्न ः साडेसात लाख ते आठ लाख रु.

* निर्यातक्षम द्राक्षासाठी ः एकरी साडेतीन ते चार लाख रु. उत्पादन खर्च.

* निव्वळ नफा ः एकरी ४ लाख रु.

शेतीतील निव्वळ नफ्याची विभागणी

* पुढील वर्षाच्या द्राक्ष पिकासाठी ः ४० टक्के

* शिक्षण, घरखर्च आणि आरोग्यासाठी ः २० टक्के रक्कम

* आणीबाणीच्या प्रसंगासाठी शिल्लक ः १० टक्के

* घरची शेती सुधारणा आणि पीककर्ज परत फेड ः १५ टक्के

* वैयक्तिक विमा ः ५ टक्के

* नवीन तंत्रज्ञान, अवजारे इ. साठी ः १० टक्के

वैशिष्ट्ये ः

-गेल्या चार वर्षांमध्ये जमिनीच्या सुपीकतेसाठी बागेच्या विश्रांतीच्या काळात तणे वाढू देतो. ती कापून जमिनीत गाडली जातात.

- पान देठ अहवालाच्या आधारेच खतांचे नियोजन. ऑक्टोबर हंगामामध्ये तीन ते चार वेळा आणि उन्हाळ्यामध्ये दोन वेळा अहवाल परीक्षण केले जाते. ३५० रुपये अहवाल २१०० रुपये एवढा खर्च होत असला तरी खतांची अचूकता वाढते. आणि एकूण खत खर्चात किमान २० हजार रुपयांची बचत होते. सर्वसामान्य शेतकरी अनेक वेळा अनावश्यक खते (फवारणी व जमिनीतून) देत असतो. ते यामुळे टाळता येते.

- ब्रॅण्डेड रसायने घेण्याऐवजी सेमी ब्रॅण्डेड रसायनांना प्राधान्य देतो. त्यामुळे समान मॉलेक्युल घेऊनही खर्चात वार्षिक २० ते २५ हजारांची बचत होते.

- पानांच्या आकारमानानुसार कॅनॉपी व्यवस्थापन केल्यास पाने सूर्यप्रकाशात राहतात. त्यांची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांचा साठा चांगल्या प्रकारे होतो. यासाठी सी वीड एक्स्ट्रॅक्ट आणि फल्विक ॲसिड अधिक उपयुक्त ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

अमित अर्जुन गुरव, ९०११८९६७६७, ८६००७००५५५

(पळशी, ता. खानापूर. जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com