Banana Orchard : देशी केळी बागेने दिला आर्थिक आधार

Success Story of Ghorpade family : निसराळे (ता.जि. सातारा) येथील वर्षा नवनाथ घोरपडे यांनी सासूबाई सुलोचना यांच्या मदतीने गेल्या सहा वर्षांपासून देशी केळीचे चांगले उत्पादन घेतले आहे.
Banana Farming
Banana FarmingAgrowon

Banana Cultivation : सातारा जिल्ह्यातील उरमोडी नदीच्या काठावर निसराळे हे गाव आहे. नदीकाठाला गाव असल्याने बहुतांशी शेती बागायती असून, सर्वाधिक ऊस लागवडीखाली क्षेत्र आहे. या गावातील नवनाथ हणमंत घोरपडे यांचे कुटुंब पहिल्यापासून शेतीमध्ये आहे. घरची अवघी दोन एकर बागायत शेती आहे.

सुरुवातीपासून शेतीमध्ये ऊस लागवडीवर घोरपडे यांचा भर होता. शेतीच्या बरोबरीने त्यांनी दूध संकलनासाठी डेअरी सुरू केली. सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर करणे शक्य नसल्याने घोरपडे कुटुंबाने सहा वर्षांपूर्वी निसराळे-खो़डद फाट्यावर इलेक्ट्रिक सामान विक्री व दुरुस्तीचे दुकान सुरू केले. वर्षाताईंचे सासरे हणमंत हे दुकान सांभाळतात आणि पती नवनाथ हे विविध गावात जाऊन विद्युत जोडणी आणि उपकरणे दुरुस्तीचे काम बघतात.

यामुळे २००९ पासून शेतीची संपूर्ण जबाबदारी वर्षाताई आणि त्यांच्या सासूबाई सुलोचना यांच्याकडे आली आहे. इलेक्ट्रिक दुकानामुळे नवनाथ यांना शेती व्यवस्थापनात पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याने शेतीच्या बरोबरीने वर्षाताईंनी सुरुवातीच्या काळात दूध डेअरीच्या व्यवस्थापनातही लक्ष देण्यास सुरुवात केली. परंतु गावात दूध संकलन केंद्रांची संख्या वाढल्याने त्यांनी डेअरी बंद केली.

भाजीपाला लागवडीस सुरुवात

लागवड क्षेत्र कमी असल्याने वर्षाताईंनी केवळ ऊस लागवड करण्यापेक्षा भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. प्रत्येकी दहा गुंठे या पद्धतीने ३० गुंठे क्षेत्रावर टोमॅटो, काकडी, झुकेनी, वाल लागवडीस सुरुवात केली. भाजीपाला विक्रीतून दररोज आर्थिक उत्पन्नास सुरुवात झाली. यातून कुटुंबाचे आर्थिक नियोजन करणे सोपे झाले.

सकाळी डेअरीमध्ये दूध संकलन आणि दिवसभर शेतातील कामांचे नियोजन सोपे झाले. गेली दहा वर्षे विविध भाजीपाला पिकांची लागवड वर्षाताई करत आहेत. यातील बहुतांश भाजीपाल्याची थेट विक्री करण्यावर त्यांचा भर होता. थेट विक्रीमुळे मार्केटपेक्षा चांगले अर्थार्जन होऊ लागले. मात्र आता मजूरटंचाईमुळे त्यांनी भाजीपाला लागवड कमी केली. या दरम्यान पाडळी (जि. सातारा) येथील प्रगतिशील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांनी घोरपडे यांना केळी लागवड करण्याचा सल्ला दिला.

सध्या दहा गुंठे क्षेत्रावर केळी, एक एकर क्षेत्रात उसाच्या को-८६०३२ जातीची लागवड आहे. उसाचे सरासरी एकरी ६० ते ७० टन उत्पादन मिळते. शेतीपूरक उद्योग म्हणून दोन गाई व एका म्हशीचे संगोपन घोरपडे कुटुंबीयांनी केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी कूपनलिका खोदलेली आहे. केळी आणि ऊस पिकाला ठिबक सिंचन केले आहे.

Banana Farming
Banana Cultivation : खानदेशात इल्लाकी केळी लागवड वाढू लागली

देशी केळी लागवडीचे नियोजन

२०१९ मध्ये वर्षाताईंनी दहा गुंठे क्षेत्रावर केळी लागवडीचे नियोजन केले. जमिनीत पुरेशा प्रमाणात शेणखत मिसळून केळी लागवडीच्या दृष्टीने मशागत केली. कोल्हापूर जिल्ह्यातील रोपवाटिकेतून देशी जातीची २८० उतिसंवर्धीत रोपे आणली. सात फूट बाय आठ फूट अंतरावर खड्डे घेऊन त्यामध्ये सेंद्रिय खतांची मात्रा देऊन रोपांची लागवड केली. प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांनी पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवले. साधारणपणे १२ महिन्यांनी केळी घडाचे उत्पादन सुरू झाले.

थेट विक्रीच्या दृष्टीने त्यांनी केळी पक्व झाल्यावर विक्रीस सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कमी उत्पादन मिळत होते. टप्प्याटप्प्याने केळीचे उत्पादन वाढू लागले. विक्री करताना परिसरात बाजारपेठेतील केळी विक्रीचा दर आणि आवक लक्षात घेऊन त्यांनी घडाच्या काढणीचे नियोजन ठेवले आहे. यामुळे केळी शिल्लक राहण्याचा धोका कमी झाला. भाजीपाल्याच्या थेट विक्रीचा अनुभव असल्याने त्यांनी पहिल्यापासून केळीच्या थेट विक्रीवर भर दिला आहे. वर्षाताईंच्या सासूबाई सुलोचना यांची केळी विक्रीसाठी चांगली मदत होते. परिसरातील चार गावांच्या आठवडी बाजारात केळी विक्री केली जाते. बागेतील केळी घडाचे उत्पादन आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विक्रीचे नियोजन वर्षाताईंनी बसविले आहे.

- वर्षा घोरपडे ७०६६१७१७३८

Banana Farming
Banana Cultivation : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीत वाढ

केळी बागेचे व्यवस्थापन

दहा गुंठे क्षेत्रामध्ये देशी केळीची लागवड.

वर्षातून एकदा पुरेशा प्रमाणात बागेला शेणखताची मात्रा दिली जाते. पीकवाढीच्या टप्प्यानुसार सेंद्रिय खतांचा वापर. दर सहा महिन्यांनी शेणखताचा वापर.

वर्षातून एकदा केळी झाडांना मातीची भर. गेली सहा वर्षे उत्पादनक्षम बाग.

वाळलेला पाला बागेमध्ये कुजविला जातो. यातून जमीन सुपीकता वाढीस चालना.

पिकाच्या गरजेनुसार आठ ते दहा दिवसांनी पाण्याचे नियोजन.

परिसरातील बाजारपेठ मागणीनुसार बागेतील घड काढणीचे नियोजन. नैसर्गिकरीत्या केळीची पिकवण.

नागठाणे, उंब्रज, अतीत, काशीळ येथील आठवडे बाजार आणि नियमितपणे निसराळे-खोडद फाट्यावर केळीची विक्री.

थेट ग्राहकांना विक्रीवर भर :

बागेत दर आठवड्याला आठ ते दहा घड तयार होतात. सरासरी ५० रुपये डझन या दराने केळीची विक्री होते. थेट विक्रीमुळे किफायतशीर दर मिळतो. यातून खर्च वजा जाता दर महिन्यास दहा हजार रुपये मिळतात. बागेतील मशागतीची कामे कुटुंबातील सदस्य करत असल्याने मजूर खर्चात बचत होते. शेतीमधील खर्च आणि केळी विक्रीची नोंद ठेवण्यात येत असल्यामुळे शेतातील नफा तोटा समजण्यास मदत होते.

केळीच्या विक्रीतून नियमित पैसे येत असल्याने दैनंदिन खर्चाची सोय होते असे वर्षाताई सांगतात. बागेचे दैनंदिन नियोजन वर्षाताई पाहतात, केळी विक्रीचे नियोजन सासूबाईंकडे आहे. शेतीमधील कामकाजाच्या गरजेनुसार पती आणि सासऱ्यांची मदत होते. याचबरोबरीने पीक व्यवस्थापनासाठी कृषी सहायक अकुंश सोनावले, प्रगतिशील शेतकरी ऋषिकेश ढाणे यांचे मार्गदर्शन मिळते. पुढील काळात बागेचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन वर्षाताईंनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com