Jalgaon News ः खानदेशात वर्षागणिक इल्लाकी केळीखालील क्षेत्र वाढत आहे. यंदा लागवड ३०० ते ३५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात होईल, असे संकेत आहेत.
इल्लाकी केळीसाठी धुळ्यातील शिरपूरमधील तरडी, बभळाज भाग प्रसिद्ध आहे. तसेच चोपड्यातील वढोदा भागातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली होती.
जामनेर तालुक्यातही इल्लाकीचे क्षेत्र वाढत आहे. जामनेरात सुमारे ५० हेक्टरवर इल्लाकी केळी आहे. चोपड्यात यंदा हे क्षेत्र ८० ते ८५ हेक्टरवर पोचेल, असाही अंदाज आहे. शिरपुरातील क्षेत्रही ९० ते ११०० हेक्टरवर जाईल. तसेच नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील जळगाव भागातही इल्लाकीस काही शेतकरी पसंती देत आहेत.
२०२१ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी इल्लाकी केळी लागवडीचा प्रयोग केला. त्यातील जीवनसत्त्वे व बाजारातील अधिकचे दर यामुळे या केळीस मोठा उठाव होता. नाशिक, पुणे भागातील काही कंपन्यांनी या केळीची थेट खरेदी शेतकऱ्यांकडून केली.
मागील दोन वर्षे पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर इल्लाकीस मिळाला आहे. १४ महिन्यांत केळीचे पीक काढणी होऊन क्षेत्र रिकामे होते. एकरी दोन ते तीन लाख रुपये निव्वळ नफा अनेकांना मिळाला.
मॉल, सुपर मार्केटमध्ये उठाव
काही कंपन्या इल्लाकी केळीची रोपे शेतकऱ्यांना पोच करू लागल्या आहेत. इल्लाकी हा दाक्षिणात्य वाण असून, तेथे त्याची लागवड अधिक असते.
या केळीला मॉल, सुपर मार्केटमध्ये मोठा उठाव आहे. राज्यात मुंबई, नाशिक, पुणे भागात खरेदीदार या केळीची निर्यात करतात. यंदा क्षेत्र सुमारे ६० ते ७० हेक्टरने वाढेल, असा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.