Jalgaon News : खानदेशात यंदा कमी पाऊसमान असतानादेखील शेतकरी कांदेबाग (सप्टेंबर ते नोव्हेंबरदम्यान लागवडीच्या बागा) केळी पिकाकडे वळत आहेत. लागवडीत यंदा बऱ्यापैकी वाढ होईल, असेही दिसत आहे.
जून ते ऑगस्टदरम्यान लागवडीच्या (मृग बहर) केळी बागांत कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) येतो. यात केळी बागा काढून फेकाव्या लागतात. शिवाय या बागांमधील केळीला दरही हवे तसे मिळाले नाहीत.
दुसरीकडे कांदेबाग केळीचे दर मात्र मागील दोन हंगाम व यंदाही स्थिर आहेत. या केळीला सप्टेंबरच्या मध्यात ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सध्या सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. या केळीला उत्तरेकडेही मागणी आहे. सीएमव्हीमुळे कांदेबाग केळीचे नुकसान होत नाही, असेही शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.
यामुळे शेतकरी कांदेबाग केळीकडे वळले आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपुरात कांदेबाग केळीची लागवड अधिक असते. यंदा यावल, रावेर, जामनेर भागात कांदेबाग केळीची लागवड वाढत आहे. तसेच धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातही कांदेबाग केळीला अनेक शेतकरी पसंती देत आहेत.
कांदेबाग केळीची लागवड खानदेशात मृग बहर केळीच्या तुलनेत कमी असते. ही लागवड दरवर्षी जळगाव जिल्ह्यात १० ते ११ हजार हेक्टरवर केली जात होती. परंतु यंदा ही लागवड १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील. शिरपुरातही सुमारे २०० ते ३०० हेक्टरने कांदेबाग केळीखालील क्षेत्रात वाढ होईल, असे संकेत आहेत.
कांदेबाग केळीसाठी अनेक शेतकरी उतिसंवर्धित रोपे, कंद यांचा उपयोग करीत आहेत. तसेच सातमासी, आंबेमोहोर, श्रीमंती, ग्रॅण्ड नैन, महालक्ष्मी या वाणांचा किंवा कंदांचा उपयोगही करीत आहेत.
ही लागवड सप्टेंबरपासून सुरू असून, लागवड पुढे १० ते १२ दिवस सुरू राहणार आहे. सर्वाधिक लागवड चोपडा तालुक्यात होईल. चोपड्यातील तापी, अनेर नदीकाठी कांदेबाग केळीखालील क्षेत्र अधिक असते. तसेच जामनेर, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, यावल या भागांतही एकसारख्या किंवा समान क्षेत्रात लागवड होईल, असेही संकेत आहेत.
कंदांचे दरही स्थिर
कांदेबाग केळी लागवडीसाठी शेतकरी मध्य प्रदेश, नंदुरबार भागातूनही कंद आणत आहेत. हलक्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीतील कंद आणून त्याची लागवड केली जात आहे.
तर काळ्या कसदार जमिनीत लागवडीसाठी हलक्या, मध्यम जमिनीतील कंद लागवडीसाठी आणले जात आहेत. कंदांचे दरही स्थिर आहेत. प्रतिकंद चार रुपये दर (वाहतुकीसह) पडत आहे. तर रोपांचे दरही १२, १४ ते १६ रुपये प्रतिरोप असे आहेत. कमाल शेतकरी रोपे लागवडीसही पसंती देत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.