Book Review : मरेंगे तो वहीं जाकर जहाँ पर ज़िंदगी है !

अपरिहार्य सक्तीमुळं गावाकडून परदेशात नशीब आजमावायला निघालेल्यांची कथा आणि व्यथा जाणून घ्यायची असेल तर ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’सारख्या अभिजात कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, आपल्या १९४७ च्या फाळणीवरचं वाङ्‍मय वाचलं पाहिजे. सुस्थिर जगण्याला सोकावलेल्यांना माणुसकीचा गहिवर जाणून घ्यायचा असेल, तर गरिबांची ही जीवघेणी तंगडतोड समजून घ्यावी लागेल.
The Grapes of wrath
The Grapes of wrathAgrowon
Published on
Updated on

या पृथ्वीतलावर शिक्षणासाठी, प्रगतीसाठी, कौटुंबिक विकासासाठी आजवर अब्जावधी स्थलांतरं झाली असतील. त्यात गैर काहीच नाही. सातत्यानं नव्या जागेच्या, नव्या जगाच्या, अधिक मोठ्या संधीच्या शोधात असणं हे जिवंतपणाचंच लक्षण. नवं काही करण्याच्या मिषानं आदिम काळापासून माणूस रस्ता शोधू लागला, वाट तुडवू लागला, नवनवे प्रदेश धुंडाळू लागला. अशीही काही विस्थापनं झाली ज्यामध्ये सक्ती होती, हिंसा होती, कोणाचा तरी स्वार्थ होता. युद्धं, भूराजकीय वादही स्थलांतराचे कारण ठरले. चेहरा नसलेला ‘नाही रे’ वर्ग या अत्याचाराचा नेहमीच हुकमी बळी ठरत आला. मग ती भारत-पाकिस्तानची फाळणी असो, धरणग्रस्तांना मुळासकट उपटून फेकणं असो, की कोरोना काळात सरकारनं लादलेल्या ठाणबंदीनं केलेलं गोरगरीब मजुरांचं स्थलांतर असो.

The Grapes of wrath
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

दुष्काळामुळं, रोजी-रोटीची साधनं हिरावल्यामुळं होणारी घाऊक स्थलांतरं तर जगाच्या पाठीवर अगणित आहेत. जगभरात त्यावर वाङ्‍मय निर्मिती झाली. त्यातल्या काही ग्रंथांचा अभिजात साहित्यात समावेश होतो. अमेरिकेत विसाव्या शतकाच्या प्रारंभी आलेली महामंदी, अवर्षण यांमुळं ओक्लाहोमा प्रांतातून हजारो शेतकऱ्यांचं स्थलांतर झालं. त्याची कहाणी सांगणारी जॉन स्टाइनबेक यांची ‘द ग्रेप्स आॅफ रॉथ’ ही दीर्घ कादंबरी जागतिक वाङ्‍मयातील अव्वल साहित्यकृती मानली जाते. जगाच्या पाठीवर कुठंही गेलं तरी शेतकरी आणि त्याच्या शोषणाच्या कहाण्या सारख्याच आहेत, याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना पदोपदी येतो.

अमेरिकेत सन १९३९ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी अगदी अलीकडं रोहन प्रकाशनानं देखण्या रूपात मराठीत आणली आहे. मिलिंद चंपानेरकर यांनी प्रभावीपणे या कादंबरीचा अनुवाद केला आहे. त्यासाठी अमेरिकेत जाऊन या कादंबरीचं कथानक घडलं तो भाग त्यांनी फिरून पाहिला. त्यामुळं भाषा आणि आकारामुळं थोडी अवजड भासणारी कादंबरी मराठीत अगदी सहजशैलीत अवतरली आहे. विज्ञानाच्या साह्यानं झालेली भौतिक साधनांची रेलचेल, त्यातून साकारलेली ऐषआरामी जीवनशैली जगणारे नागरिक अशी अमेरिकेची आपल्या मनात असणारी प्रतिमा ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ वाचल्यावर भंगून जाते. कादंबरीत घडणाऱ्या विस्थापनाच्या घटनांना १९३० च्या दशकाची पार्श्‍वभूमी आहे. तेव्हा तिथं सामान्यजनांना आर्थिक महामंदीसह विविध संकटांना सामोरं जावं लागलं.

दक्षिण व मध्य अमेरिकेत आलेल्या धुळीच्या वादळामुळं (Dust Bowl) शेतजमिनींची नासाडी झाली. शिवाय मोठ्या प्रमाणावरील भांडवलकेंद्री शेतीचा व शेतीच्या यांत्रिकीकरणाचा पुरस्कार केल्यामुळं छोट्या शेतकऱ्यांवर विस्थापनाची कुऱ्हाड पडली. त्या काळात पश्‍चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियात नव्यानं द्राक्ष-संत्र्यांची, बागायती कापसाची लागवड सुरू झाली होती तिथं तुम्हाला काम मिळेल, नवजीवन लाभेल, असं स्वप्न प्रस्थापितांनी ओक्लाहोमातील या भाबड्या शेतकऱ्यांना दाखवून त्यांच्या जमिनी लाटल्या.

The Grapes of wrath
Indian Economy : भारत खरेच सोने की चिडिया होता का?

त्यांच्या सांगण्यावर विश्‍वास ठेवून मध्य-दक्षिण अमेरिकेतील लाखो शेतकऱ्यांनी कॅलिफोर्नियाला स्थलांतर करण्यासाठी ‘रूट ६६’ या जुन्या व्यापारी महामार्गावरून केलेला दोन हजार मैलांचा खडतर आणि संघर्षमय प्रवास, प्रत्यक्षात वाट्याला आलेली उद्ध्वस्तता आणि त्या प्रक्रियेत त्यांच्या जाणिवेत झालेले सूक्ष्म बदल असा विशाल पट या कादंबरीत उलगडला जातो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्‍वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, याचं प्रभावी चित्रण लेखकानं केलं आहे.

१९३० च्या दशकात ओक्लाहोमातील पाच लाख लोकांनी, मुख्यतः शेतकऱ्यांनी स्थलांतर केलं. त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या या महाकादंबरीच्या केंद्रस्थानी आहे ‘जोड कुटुंब.’ या कुटुंबांतील सदस्य, त्यांच्यातील प्रेम, संघर्ष याभोवती ही कादंबरी फिरत राहते. शेतकऱ्याला, शेतीला नामोहरम करणारे निसर्गातील बदल, अन्न मिळवण्यासाठीचा फाटक्या माणसांचा झगडा आणि कॅलिफोर्नियातील शेतीचं आभासी सुखचित्र प्राप्त करण्यासाठी सुरू असलेली पायपीट हा कादंबरीचा गाभा. त्याबाबत लेखकानं केलेलं रोकडं भाष्य आपल्याला अस्वस्थ करतं.

सुरुवातीला बॅंका आणि बड्या शेतकऱ्यांकडून ओक्लाहोमातील छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, नंतर कॅलिफोर्नियातील श्रीमंत मळेवाल्यांकडून मजुरीसाठी या स्थलांतरितांचं झालेलं शोषण, त्यांना उन्मत्तपणानं वारंवार झिडकारणं केवळ मानवातील अवनतीचं दर्शन घडवतं. आपल्याकडं शेतकऱ्याला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करणारे काही दीडशहाणे शहरांत आहेत, तसेच ते अमेरिकेतही आहेत. स्थलांतरित शेतकरी हा आपल्यासाठी धोका आहे अशी त्यांची धारणा.

The Grapes of wrath
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

या स्थलांतरितांची कुचेष्टाही ते करत राहतात. स्टाइनबेकनं या हावरट, स्वार्थी आणि दांभिक लोकांच्या विकृत मनोवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकला आहे. बदलत्या निसर्गाची वर्णनं, शेतीतील विविध पिकं, त्यांच्या वाढीच्या अवस्थेची वर्णनं, कीड-रोगांचा प्रादुर्भाव याची नेटकी वर्णनं लेखकानं केली आहेत. त्यामुळं या साहित्यकृतीच्या अस्सलपणात मोलाची भर पडली आहे. जोड कुटुंबात ग्रॅम्पा आणि ग्रॅन्मा हे वयोवृद्ध जोडपं, त्यांचा मुलगा पा आणि सून मा, त्यांची मुलं टॉम, नोहा आणि रोझ ऑफ शेरॉन ही तरुण मुलगी, तिचा पती कॉनी आणि पा यांचे बंधू अंकल जॉन अशी मुख्य पात्रं आहेत.

एका जुन्या छोट्या ट्रकवर आपलं किडूकमिडूक लादून ते कॅलिफोर्नियाच्या दिशेनं प्रवास सुरू करतात. दोन हजार मैलांचा दुष्काळी प्रदेशातील हा प्रवास तसा सोपा नाही. टॉम हा जोड कुटुंबातला तरुण पोरगा या कादंबरीचा नायक. मनानं चांगला, पण परिस्थितीवश गुन्हेगारीकडं वळलेला. त्याचा मित्र धर्मोपदेशक जिम कॅसी हे पात्रंही तसं महत्त्वाचं. कॅलिफोर्नियाकडं निघालेल्या काफिल्यातले हे शिलेदार. हे दीर्घ आणि गुंतागुंतीचं कथानक आहे. ते समजून घेण्यासाठी कादंबरी वाचणंच श्रेयस्कर. आशा ही जीवनाची ऊर्जा आहे आणि दुःख वाटून घेण्यासाठी आपलं असं कोणीतरी आपल्याबरोबर असावं लागतं. मग काळ कितीही कठीण आला तरी जगणं सुसह्य होऊ शकतं, असा संदेश लेखक देतो.

The Grapes of wrath
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

रोझ ऑफ शेरॉनचा पती कॉनी नंतर जोड कुटुंबाला सोडून जातो, तेव्हा ती गर्भवती असते. शेवटी जोड कुटुंब राहत असलेल्या विस्थापितांच्या वसाहतीमध्ये अतिवृष्टी होते. त्यामुळे या फाटक्या लोकांचे संसार भिजून जातात. रोगराई पसरते. रोझ आॅफ शेरॉनचं मूलही दगावतं. कादंबरीचा शेवट स्टाइनबेकनं फारच धक्कादायक केला आहे. त्यामुळं या कादंबरीवर अश्‍लीलतेला उत्तेजन दिल्याची टीका झाली.

वाढत्या जनरेट्यामुळं प्रकाशकानं हा शेवट बदलण्याची विनंती स्टाइनबेकला केली, पण त्यानं ती पार धुडकावून लावली. यथावकाश लोकांनीही हा शेवट स्वीकारला. विस्थापितांच्या या वसाहतीमध्ये एक मुलगा आपल्या प्रौढ पित्यासह दाखल होतो. आठवडाभर काहीच खायला न मिळाल्यामुळं त्याचे वडील गलितगात्र झालेले असतात. खायला काहीच उरलेलं नसतानाही त्यांना मदत करायचा निर्णय जोड कुटुंबाची प्रमुख सदस्य मा घेते. ही मदत काय ते सांगणारा कादंबरीतला हा उतारा...

अचानक तो मुलगा हमसाहमशी रडू लागला. ‘‘ते मरून जातीन ... भुकेनं मरनाऽर तेऽऽ.’’

“हुश्श!’’ मा म्हणाली, “कायजी नोको करू. आपन इचार करू, काय कराचं ते.”

The Grapes of wrath
Indian Agriculture : आपल्याला तारणारी शेती पद्धती

माने रोझ ऑफ शेरॉनकडे पाहिलं. ती पांघरुणात अंग आक्रसून घेऊन सुशेगात पडली होती.. माची आणि तिची ओझरती, पण अर्थपूर्ण नजरानजर झाली आणि मग माने त्या पुरुषांकडे पाहिलं. पुन्हा त्या दोन स्त्रियांनी एकमेकींच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं. रोझ ऑफ शेरॉनला श्‍वास रोधल्यागत झालं आणि मग तिला धाप लागली. ‘होव,’ माच्या नजरेचा अर्थ समजून रोझ ऑफ शेरॉन म्हणाली. त्या धान्यकोठारात इतका वेळ पडून राहिलेली रोझ ऑफ शेरॉन आता उठली आणि शांतचित्त होऊन अगदी निश्‍चल बसली. मग तिने अंगावरची रजई बाजूला सारून आपलं थकलेलं शरीर सावरून घेतलं आणि रजई अंगाभोवती लपेटून घेतली.

ती हळूहळू त्या कोपऱ्यापर्यंत चालत गेली आणि तिने त्या माणसाच्या भकास चेहऱ्याकडे पाहिलं; त्याच्या विस्फारलेल्या, भयभीत डोळ्यांमध्ये पाहिलं. आणि मग ती अगदी हळूच त्याच्या बाजूला झोपली. त्याने आपलं डोकं डावी- उजवीकडे हलवलं. रोझ ऑफ शेरॉनने लपेटून घेतलेली रजई थोडी सैलावली आणि आपले स्तन अनावृत केले. ‘‘तुमाले प्या लागंन,’’ ती म्हणाली. ती पुढे झाली आणि तिनं त्याचं डोकं जवळ घेतलं. तिचे हात त्याच्या केसात हळुवार फिरू लागले. तिनं वर पाहिलं आणि मग त्या कोठारावर सर्वत्र नजर फिरवली. आपले विलगसे ओठ तिने मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित विलसलं.

The Grapes of wrath
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

कोणी कल्पनासुद्धा करू शकणार नाही असा हा कादंबरीचा शेवट एकदम अंगावर येतो. नुकतंच आपलं अपत्य गमावलेली तरुण स्तनदा माता एका परक्या माणसाची भूक भागवण्यासाठी त्याला स्तन्यपान कशी काय करू देते, हे आकलनाच्या पलीकडचंच. स्टाइनबेकनं समाजमानाला दिलेला हा धक्का जबर ठरला, कादंबरीची परिणामकारकता वाढवून गेला.

तत्कालीन अमेरिकी समाजामध्ये त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच होतं. घडलंही तसंच. पण स्टाइनबेक बधला नाही. टोकाचा विरोध होऊनही त्यानं शेवट बदलायला नकार दिला आणि त्यावर तो ठाम राहिला. माणसं कितीही फाटकी, कफल्लक असली तरी त्यांच्यातील दानत खूप मोठी असते. कद्रू वृत्तीच्या तथाकथित श्रीमंतांपेक्षा तर अशी माणसं खूपच मोठी असतात, हे सांगणारा हा प्रसंग कादंबरीत खूपच प्रत्ययकारकरीत्या उतरला आहे.

सन १९०२ मध्ये जन्मलेला स्टाइनबेक तसा पेशानं पत्रकार. पुढं तो ललित लेखनाकडं वळला. त्यानं तब्बल १७ कादंबऱ्या, एक कथासंग्रह, चार अनुवादित पुस्तकं, अनेक लेख असं विपुल लिखाण केलं. ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’साठी त्याला प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. पुढं सर्वोच्च नोबल पुरस्कारानंही त्याचा सन्मान झाला. सन १९४० मध्ये ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’वर कृष्णधवल चित्रपट आला आणि गाजलाही. त्याला ऑस्करसाठी पाच नामांकनं मिळाली. जॉन फोर्ड (उत्कृष्ट दिग्दर्शन) आणि जेन डार्वेल (उत्कृष्ट सहायक अभिनेत्री) आॅस्करचे मानकरी ठरले.

या कादंबरीनं अमेरिकी समाजमन हादरलं. खरंच आपण इतके असंवेदनशील आहोत का, आपल्या बांधवांवरचा अन्याय आपल्याला दिसला कसा नाही, असे प्रश्‍न त्यांना पडले. कादंबरीचं जसं स्वागत झालं, तसा तिचा निषेधही झाला. काही ठिकाणी तिच्या प्रति जाळण्यात आल्या. तिकडं आयर्लंड, तुर्कस्तानापर्यंत पडसाद उमटले. स्टाइनबेकचं हे पुस्तक अतिरंजित असल्याची टीका झाली. स्टाइनबेक मात्र ठाम राहिला. एका वर्षातच या पुस्तकाच्या चार लाख ३० हजार प्रति खपल्या. पुढं युरोप, अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या शंभर अव्वल पुस्तकांच्या यादीत या अभिजात कादंबरीला वरचं स्थान मिळालं.

चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं तेव्हाही स्थलांतरितांची अवस्था तशीच होती. चित्रपटाचा निर्माता डेरील झनूक याला कादंबरीतील चित्रण अतिरंजित आहे की काय, अशी धास्ती वाटत होती. त्यानं चित्रपटाच्या क्रूमधील कोणाला सुगावा न लागू देता काही जणांना हे वास्तव तपासण्यासाठी प्रत्यक्ष ‘रूट ६६’वर पाठवलं. काही दिवस पाहणी करून हे लोक परत आले. त्यांनी सांगितलं ते धक्कादायक होतं. स्टाइनबेकनं जे लिहिलं होतं ते खरंच होतं. ते अतिरंजित नव्हतं, उलट त्यानं ते थोडं सौम्य स्वरूपात मांडलं होतं. यावरून स्थलांतरितांना प्रत्यक्षात किती वाईट जिणं जगावं लागलं असेल याचा अंदाज यावा.

किडूकमिडूक घेऊन रस्ता तुडवणारी हतबल माणसं पाहून डोळे पाणावले नाहीत, असा सहृदय माणूस आढळणार नाही. तुम्ही सहृदय आहात की नाही हे तपासायचं असेल तर अशा कहाण्या सांगणारी पुस्तकं, चित्रपट पाहून आपला ‘सहृदयता बुद्ध्यांक’ तुम्हाला जोखता येईल. अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर कोरोनातील विस्थापनावर बनलेला ‘1232 KMs’ (किलोमीटर्स) हा दीड तासाचा माहितीपट ‘डिस्ने हॉटस्टार’वर जरूर पाहा. बिहारला आपल्या गावी सायकलवरून निघालेल्या काही तरुणांचा १२३२ किलोमीटरचा खडतर प्रवास दिग्दर्शक विनोद काप्री यांनी प्रत्ययकारककरीत्या दाखवला आहे.

घरांमध्ये आरामात राहून ‘फूड चॅलेंज’सारख्या पोटभरू उपक्रमात मग्न राहिलेल्या स्वार्थी सुखवस्तूंना खरं तर ही चपराक आहे. भारतात कोरोना ठाणबंदीच्या काळात अन्न-पाण्याविना जीवच जाण्याची भीती निर्माण झाल्यावर शहरवासीयांचं आयुष्य सुखकर करणाऱ्या तीन कोटी मजुरांनी झोपड्यांबाहेर पडून आपल्या मुलखाकडं पायपीट सुरू केली. पोलिसांच्या लाठ्या खात, मिळेल त्या वाहनानं, प्रसंगी सायकलनं हे अर्धपोटी लोक आपल्या गावचा रस्ता जवळ करीत होते. पोट जाळायला शहरांतील झोपडपट्ट्यांत वळवळणारं जिणं जगणाऱ्यांचे आई-वडील, बायका-मुलं, जमिनीचे तुकडे तिकडं गावाकडंच तर असतात. या मजुरांची व्यथा गुलजार यांनी संवेदनशीलपणानं एका कवितेत टिपली. नंतर ती ‘1232 KMs’ या चित्रपटाचा भाग बनली. विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेल्या या कवितेतला दर्द प्रख्यात गायक सुखविंदर सिंग यांनी ताकदीनं आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. यू-ट्यूबवरही तुम्हाला हे गाणं ऐकता येईल...

मरेंगे तो वहीं जाकर जहाँ पर ज़िंदगी है

यहाँ तो जिस्म लाकर प्लग लगाए थे

मशीनें बंद होने लग गई थीं शहर की सारी

उन्हीं से हाथ-पाँव चलते रहते थे

वरना ज़िंदगी तो गाँव ही में बो के आए थे

वो बँटवारे चचेरे और ममेरे भाइयों वाले

सगाई, शादियाँ, खलियान और सूखे

भले हर बार अपना आसमाँ बरसे या ना बरसे

मुक़दमे सारे लड़ते थे वहीं पे ज़िंदगी के

मरेंगे तो वहीं जाकर जहाँ पर ज़िंदगी है

ही झाली शहरांकडून गावांकडं परतणाऱ्यांची व्यथा. अपरिहार्य सक्तीमुळं गावाकडून परमुलखात नशीब आजमावायला निघालेल्यांची कथा आणि व्यथा जाणून घ्यायची असेल तर ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’सारख्या अभिजात कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, १९४७ च्या फाळणीवरचं वाङ्‍मय वाचलं पाहिजे. सुस्थिर जगण्याला सोकावलेल्यांना माणुसकीचा गहिवर जाणून घ्यायचा असेल तर गरिबांची ही जीवघेणी तंगडतोड समजून घ्यावी लागेल.

लोकहो, पृथ्वीतलावरली किंवा या देशातली गरिबी संपलेली नाही. बळजोरांकडून होणारं शक्तिहीनांचं शोषण थांबलेलं नाही. उलट गरिबी आणि गरिबाला आपणच आपल्या विषयपत्रिकेवरून हद्दपार केलं आहे. दारिद्र्यातून मध्यमवर्गात प्रवेश केलेल्यांना पूर्वी गरिबांविषयी आस्था वाटायची. अनेक थोर लोकांची चरित्रं म्हणजे दारिद्र्याशी केलेला संघर्षच असायचा. अशा पुस्तकांचा बोलबोला असणारा तो काळ होता. तेव्हा आपल्या चित्रपटांचे नायक गरीब असायचे. पराभव समोर दिसत असतानाही ते क्रांतीची भाषा बोलायचे. आठवा, ‘दो बिघा जमीन’, ‘मदर इंडिया’, ‘नया दौर’, ‘श्री ४२०’, ‘नमक हराम’. चित्रपटांत प्रेमगीतांबरोबरच क्रांतिगानही गायलं जायचं.

सुरेश भटांचं ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे गीत आशा भोसलेंच्या स्वरात ऐकताना अंगअंग चेतून उठायचं. एकविसाव्या शतकात हे चित्र बदललं. आता हिंदीच नव्हे तर अगदी भाषिक चित्रपटांतूनही गरिबी गायब झाली आहे. गरीब तिथेच आहेत. त्यांच्या कहाण्या सांगणारे, लिहिणारे, वाचणारे बेपत्ता झालेत. दररोज हातातोंडाची गाठ न पडणाऱ्यांचा लोकसंख्येतील वाटा मोठा आहे. विस्थापितांचे प्रश्‍नही सुटलेले नाहीत. अर्धशतक लोटलं तरी कोयना धरणग्रस्तांना अद्याप आपण न्याय देऊ शकलेलो नाही. शेतकऱ्यांच्या शोषणाला तर मर्यादाच नाही. ...आणि आपल्याला वाटतं या देशाचा खूप विकास झाला आहे. आभासी दुनियेत रमलेल्यांना, भ्रमात राहणाऱ्यांना कोण जागं करावं?

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com