Maharashtra Assembly Election 2024 : चार हजार उमेदवारांचे आज भवितव्य ठरणार

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) राज्यातील २८८ मतदार संघांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सत्ताधारी आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस झाली आहे.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) राज्यातील २८८ मतदार संघांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सत्ताधारी आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची मतमोजणी करून निकाल लागणार आहे. आज (ता. २०) सकाळी सकाळी ८ ते सायंकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने मोठा चोख बंदोबस्त ठेवला आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर छुप्या प्रचाराला जोर आला असून, राज्यात अनेक ठिकाणी पैशाचे वाटप होत असताना विरोधकांकडून एकमेकांवर नजर ठेवत पकडून दिल्याच्या घटनाही समोर आल्या.

सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचाराला उत आला. अनेक ठिकाणी गुप्त बैठकांबरोबर पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू असल्याचे समोर आले. ज्या ठिकाणी विरोधकांकडून पैसे वाटप करताना काहींना पकडले तेथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.

Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Election 2024 : पश्चिम विदर्भात अटीतटीच्या लढती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्य पिंजून काढत प्रचाराचा धुरळा उडविला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यात सर्वाधिक ७८ सभा घेतल्या. अनेक मतदार संघांत जाऊन फुटिरांना पाडा असा स्पष्ट संदेश देत अजित पवार यांच्या विरोधातील लढाईला धार आणली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात रणशिंग फुकत ठाकरी शैलीत जोरदार प्रहार केले तर काँग्रेसने विदर्भ आणि मराठवाड्यात लक्ष्य केंद्रित केले. अखेरच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलोख्यावर प्रहार करत १ लाख कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रचारांचा धडाका लावत बंडात साथ देणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या. या सभांमधून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत बंडाचे समर्थन केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वोट जिहादचा आरोप करत प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा तापवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ किंवा ‘एक हैं तो सेफ हैं’सारख्या घोषणा देऊन प्रचाराची दिशा स्पष्ट केली होती.

Maharashtra Assembly Election 2024
Election Voting : साडेचार लाख प्रौढांच्या मतांवर प्रशासनाचा ‘फोकस’

शेतीचे विषय तोंडी लावण्यापुरते

जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत १९३३ शेतक‍ऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या झालेल्या अमरावती विभागात शेतीचा मुद्दा कुठेही प्रचारात नसल्याचे समोर आले. सोयाबीन आणि कापसाचे दर सलग दोन वर्षे पडल्याने शेतकरी संकटात आहे. हमीभावाने खरेदीसाठी ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर आर्द्रतेचा मुद्दा समोर करून खरेदी केली जात नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे खुल्या बाजारात चार हजर ते चार हजार २०० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हा मुद्दा तापत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात भावांतर योजनेचे आश्‍वासन दिले. प्रचार संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना आर्द्रता निर्देशांकात बदल करत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून हमीभावात वाढ केल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या. एकूणच शेतीक्षेत्रातील गंभीर मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी तोंडी लावण्यापुरत्याच चर्चा झाल्याचे समोर आले.

९ कोटी ७० लाख मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ मतदार संघांत ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यामध्ये पाच कोटी २२ हजार ७३९, तर ४ कोटी ६९ लाख, ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. राज्यात सहा हजार १०१ तृतीयपंथी उमेदवार आहेत.

चार हजारांवर उमेदवार

विधानसभेच्या रिंगणात ४ हजार १३६ उमेदवार आहेत. यामध्ये ३ हजार ७७१ पुरुष, तर ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार रिंगणात आहेत.

१९५० क्रमांकाची हेल्पलाइन

निवडणुकीविषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. यावर मतदारांना सर्व माहिती मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com