Rajdhani Mumbai: बिनकामाच्या गोंधळानेच गाजले अधिवेशन

Maharashtra Assembly Session: अर्थसंकल्पी अधिवेशन काळात नऊ विधेयके मंजूर झाली. लक्षवेधी सूचनांचा पाऊस पडला. प्रश्‍नोत्तराच्या तासाला सदस्यच गैरहजर, असा काहीसा प्रकार होता. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाच्या गोंधळाने सुरू झालेला चर्चेचा प्रवास दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यू प्रकरणापर्यंत पोहोचला.
Maharashtra Vidhan Bhavan
Maharashtra Vidhan BhavanAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics: सर्व काही मनाप्रमाणे घडण्याच्या काळात विधिमंडळाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी केवळ राजकारणासाठी होत असल्याच्या अनेक घटना प्रकर्षाने समोर आल्या. मार्च संपत आला असून, ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटत आहेत. सोयाबीन, कापूस, तूर खरेदीचा घोळ सुरू आहे. कायदा असतानाही उसाची एकरकमी एफआरपी द्यावी, असा निर्णय न्यायालयाला द्यावा लागला.

खरीप हंगाम जवळ आला तरी निविष्ठांमधून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीला चाप लावावा, असे कुणालाच वाटत नाही. सध्या सर्वच विभागांचे मंत्री आपल्या अख्यत्यारित येणाऱ्या इमारतींची डागडुजी आणि नव्या बांधकामांकडे वळत आहेत. असे या बांधकामांत आहे तरी काय, असा प्रश्‍न आता पडू लागला आहे.

प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पी अधिवेशन असल्याने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती होणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते. मात्र झाले असे, की आम्ही देणार हे सांगितले पण कधी देणार, हे नाही सांगितले असे सांगत थेट जनतेलाच कात्रजचा घाट दाखवत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला. राज्यातील नोकरशाही इतकी बळकट आहे की सत्ताधारी आमदारांना साधे साधे प्रश्‍न सभागृहात मांडावे लागत आहेत.

जिथे आमदारांची कामे होत नाहीत तिथे सामान्य जनतेचे काय हाल होत असतील, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळेच अधिवेशन काळात आशेने विधिमंडळाबाहेर अनेक लोक येत होते. अधिवेशन संपता संपता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना लावण्यासाठी सत्ताधारी आमदारच अधिकाऱ्यांना पैसे देऊ इच्छितात असे सांगून खळबळ उडवून दिली.

Maharashtra Vidhan Bhavan
Maharashtra Assembly: नियमबाह्य पद्धतीने अध्यक्ष, सभापती कामकाज करतात

मुळात लक्षवेधी सूचना या तारांकित प्रश्‍न विधिमंडळाकडे देण्याची मुदत संपल्यानंतर मतदारसंघात किंवा अन्यत्र घडलेल्या घटनांसंबंधी असते. पण एका दिवशी ३० ते ३५ लक्षवेधी सूचना आणि त्याही मतदारसंघातील तीन-चार वर्षे जुन्या विषयांच्या असल्याचे समोर आले. विधिमंडळाच्या एकूण कामकाजात अध्यक्ष आणि सभापती हे सार्वभौम आहेत. तेथे त्यांचाच शब्द नियमानुसार अंतिम मानला जातो. मात्र अध्यक्ष आणि सभापती पक्षपातीपणा करतात, असा खुलेआम आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी दाताच्या कण्या केल्या तरी त्यांच्या तक्रारी अरण्यरुदन ठरल्या.

या अधिवेशनात विधानसभेत केवळ ९ विधेयके संमत झाली तर एकही खासगी विधेयक मांडून ते मंजूर करून घेता आले नाही. २९३ अन्वये आलेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या ५ प्रस्तावांवर स्वतंत्र चर्चा अपेक्षित असताना बहुतांश वेळ हा लक्षवेधी सूचनांसाठी होता. परिणामी, सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रस्ताव एकत्र करून त्यावरच चर्चा घेण्यात आली. वेगवेगळ्या विभागांवरील चर्चेला संबंधित खात्याचे मंत्री उत्तर देणे अपेक्षित होते.

मात्र मंत्र्यांनी प्रस्तावना करून सदस्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांना लेखी उत्तर देण्याची परंपरा सुरू केली आहे. विशेष म्हणजे सभागृहात उत्तर घेण्यातही सदस्यांना रस नाही. अनेकदा कोरम नसतानाही सभागृह चालवले जात होते, तर प्रश्‍नोत्तराच्या तासाला सदस्य गैरहजर असल्याने एक ते सात प्रश्‍नांपर्यंत प्रश्‍न पुढे ढकलावे लागत होते. जागतिक महिलादिनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष चर्चा घेण्याचे नियोजन होते.

मात्र ८ मार्च रोजी मतदारसंघातील कार्यक्रमांमुळे महिला सदस्यांनी ही चर्चा आधीच उरकून घ्यायला लावली. भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरील चर्चेला उत्तरादाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण अप्रतिम झाले. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ आणि मुत्सदी राजकारणी एकाच वेळी पाहायला मिळाला.

Maharashtra Vidhan Bhavan
Maharashtra Politics: विधान परिषदेत गदारोळ! निलम गोऱ्हेंच्या विश्वासदर्शक ठरावावरून विरोधक आक्रमक

एक परब सर्वांवर जरब

विधान परिषदेत सत्ताधारी बाकावर बसून डिवचण्यात गिरीश महाजन तरबेज आहेत. त्यातून अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सत्ताधाऱ्यांची रणनीती भेदण्यात शिवसेनेचे अनिल परब यांनी आपला अनुभव पणाला लावला. सभागृहात काही परवलीचे शब्द आहेत आणि ते इंग्रजीत वापरले जातात. त्यापैकी ‘पिजन होल’ असा एक शब्द आहे. विधिमंडळातील लिखित दस्तऐवज ज्या पेटीत टाकला जातो त्यास हा शब्द वापरला जातो.

मात्र भाजपच्या उतावळ्या सदस्यांनी त्यांचा मराठी अर्थ सांगून हसे करून घेतले. त्यानंतर संभाजी महाराजांवरून गोंधळ घातला, त्यास सडेतोड उत्तर देत या सभागृहातील एका सदस्याने आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवले आहे, असे सांगून भाजपची बोलती बंद केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी उदय सामंत यांची नेमणूक केली होती.

मात्र त्या वेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ सभागृहात उपस्थित असताना सामंत कसे काय उत्तर देत आहेत, असा आक्षेप घेऊन प्रश्‍न राखून ठेवण्यास भाग पाडले. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असताना विरोधी पक्षातील भाई जगताप, अभिजित वंजारी यांच्यासह अन्य घटकपक्षांनी त्यांना चांगली साथ दिली. त्याच वेळी विधानसभेत मात्र तिघांचे सवते सुभे प्रकर्षाने दिसत होते.

कामराचा वर्मी घाव

कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन वादग्रस्त ठरला असून, त्याने केलेल्या विडंबन कवितेवरून सत्ताधारी संतापले आहेत. ते इतके संतापलेत की पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आता कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देण्याची भाषा करत आहेत. शिवसेनेत सध्या शिंदे यांचे आपणच कसे जवळचे हे दाखविण्याची चढाओढ आहे. अखेरपर्यंत ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले अर्जुन खोतकर पक्षांतर करत असताना रडत होते.

मात्र दिशा सालियन, कुणाल कामरा प्रकरणात त्यांनी घेतलेला पुढाकार पाहून शिंदे गटातील अनेकांना धक्का बसला. कामराच्या विडंबनात कुठेही शिंदेंचा स्पष्ट उल्लेख नाही. पण भाजप, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे शिंदेंच्या आडून भाजपने कामराला चांगला धडा शिकवायचा चंग बांधलेला दिसतो.

माहिती गेली कुठे?

जनतेला जी माहिती हवी आहे आणि गोपनीय नाही, अशी माहिती आधीच उपलब्ध करून द्या, असे आदेश सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होती. मात्र बहुतांश विभागांनी भले मोठे टाळे विकत घेतले की काय, अशी अवस्था आहे. भक्कम तटबंदीतील ही माहिती खुद्द आमदारांनाही मिळत नाही.

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com